मुघल गार्डन मुघलांनी बांधलेलंय असं वाटत असेल तर भावांनो, गंडु नका सत्य जाणून घ्या

राष्ट्रपती भवनातल्या ऐतिहासिक मुघल गार्डन चे नाव आता अमृत गार्डन करण्यात आलंय.

मुघलांशी छत्रपती शिवाजी महाराज शौर्याने लढले म्हणून मुघल गार्डनचं नाव छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ठेवायला पाहिजे अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्यक्त केल्या जात आहेत.  पण गंमत म्हणजे मुघल शैलीतलं असल्याने, मुघलांनी बांधल्यामुळे त्याला मुघल गार्डन हे नाव दिलं गेलं, खरं तर मुघल गार्डन मुघलांनी बांधलंच नाहीये. या गार्डनच्या नावावर गंडु नका त्याचा खरा इतिहास जाणून घ्या

मग कुणी बांधलं ? त्याचं उत्तर पुढं मिळेलच…वाचा वाचा… 

तर विषयाला सुरुवाट करतांना हे तर कॅन्फर्म आहे कि, भारतामध्ये तसे अनेक ऐतिहासिक वास्तू, शिल्प, आणि कलाकृती आहेत आणि या प्रत्येक वारशाला ज्याचा त्याचा इतिहास आहे. भारत सरकारने यातील अनेक वारशांचं जतन खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे, त्यामुळेच त्यांचं सौंदर्य आजही अनेक भारतीय तसंच परराष्ट्रीय पर्यटकांना भुरळ घालत असतं. अशा  ऐतिहासिक वारशांना भेटी देण्याअगोदर अनेकांची सवय असते की जागेच्या नावावरून त्यांचा कोणत्या काळाशी संबंध असेल, याचा अंदाज लावण्याची. 

मात्र अनेकदा तिथे गेल्यावर काही तरी वेगळंच सत्य आपल्यासमोर येतं. याचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण द्यायचं झालं तर ‘मुघल गार्डन’. दिल्लीतील राष्ट्रपती भवनासमोर असलेलं हे गार्डन वसंत ऋतू आला की सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जातं. या भव्य उद्यानात देशी-विदेशी फुले लोकांना पाहायला मिळतात. अगदी ठराविक वेळेसाठी हे गार्डन सौंदर्याने बहरत असल्याने ते बघण्यासाठी लोकांची जाम गर्दी होत असते.

मात्र याच्या नावावरून अनेकांचा असा समज आहे की हे गार्डन मुघलांच्या काळातील आहे आणि त्यांनी याची निर्मिती केली होती. तुम्हालाही असंच वाटत असेल तर भावांनो, असं नाहीये.

मुघल गार्डन खरं तर ब्रिटिश राजवटीत निर्माण केलं गेलं होतं. 

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा हा काळ. या काळात राष्ट्रपती भवनाला  ‘व्हाईसरॉय हाउस’ असं संबोधलं जायचं. शिवाय तेव्हा भारताची किंवा ब्रिटिशांची राजधानी दिल्ली नाही तर कोलकाता होती. मात्र १९११ मध्ये राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवण्याची घोषणा झाली, तेव्हा व्हाइसरॉय हाउसची रचना नवीन पद्धतीने करण्याचं ठरलं.

व्हाइसरॉय हाउस डिजाईन करण्यासाठी थेट इंग्लंडहून ब्रिटीश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांना दिल्लीत बोलावण्यात आलं. व्हाईसरॉय हाउस बांधण्यासाठी योग्य जागा शोधण्यास सुरुवात झाली. यावेळी त्यांना सापडली ‘रायसीना टेकडी’. ही जागा सर एडविन यांनी डिजाईन केलेल्या आकृतीच्या निर्मितीसाठी एकदम साजेशी होती. त्यामुळे रायसीना टेकडी  कापून व्हाईसरॉय हाउस (सध्याचे राष्ट्रपती भवन) बांधण्यात आलं.

सर एडविन यांनी व्हाईसरॉय हाउसमध्ये फुलांची खास बाग बांधण्याचीही प्लॅनिंग केली होती. त्यानुसार हे गार्डन बनवल्या गेलं. पण तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या पत्नी लेडी हार्डिंग यांना ही बाग आवडली नाही. मग त्याची पुनर्निर्मिती करण्याचं निश्चित झालं आणि त्यानुसार नवीन डिजाईन सर एडविन यांनी तयार केलं.

यावेळी एडविन यांनी भारतात हे गार्डन बनणार असल्याने इथल्या शैलींचा वापर करण्याचं निश्चित केलं. लुटियन्स यांनी गार्डनमध्ये भारतीय संस्कृती आणि मुघल शैली यांचा संगम घडवून आणला. त्यानुसार मुघल गार्डनचा नकाशा तयार केला. सर एडविन लुटियन्स यांनी १९१७ च्या सुरुवातीला मुघल गार्डनच्या डिझाइनला अंतिम रूप दिलं आणि ते १९२८ मध्ये मुघल गार्डन पूर्ण बनून तयार झालं. 

हे गार्डनची शैली मुघलाई असावी मात्र त्यात युरोपीय तडकाही असावा या विचाराने सर एडविन यांनी या बागेत मुघल नाले, चबुतरे, फुलांची झुडपे यांना युरोपियन लॉनसोबत खूपच सुंदर पद्धतीने एकरूप केलं. हे गार्डन चार विभागांत विभागलेलं आहे. चतुर्भुज बाग, उंच बाग, पडदा बाग आणि गोलाकार बाग.

मुघल शैलीने हे गार्डन निर्माण केलं असल्याने याला मुघल गार्डन असं नाव देण्यात आलं.

मुघल गार्डन हे अशा शैलीचं एकमेव उद्यान आहे, जिथे जगभरातील रंगीबेरंगी फुले पाहता मिळतात. मात्र हे उद्यान आधी सर्वसामान्यांसाठी खुलं नव्हतं. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ही बाग सर्वसामान्यांसाठी खुली केली होती. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी वसंत ऋतूमध्ये ही बाग सर्वसामान्यांसाठी खुली केली जाते.

यंदा १२ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान ही बाग खुली केली जाणार आहे. राष्ट्रपतींनी नुकताच त्यांचा या  बागेतील सपत्नीक फोटो त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. बाग खुली होणार असून सर्व कोव्हीड नियमांचं पालन करून पर्यटकांना बाग बघण्याची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी आणि पर्यटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.