तब्बल ३२ वर्षे देना बँकवाले शोधत होते पण काही केल्या नरेंद्र मोदी सापडतच नव्हते….

भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी. असं म्हणतात कि त्यांनी देशाला डिजिटल केलं. आज आपण अगदी चहा प्यायला गेलो तरी टपरीवाल्याला गुगल पे करतो, किराणामालचा दुकानदार पेटीएमच्या स्वरूपात पैसे स्वीकारतो, एका क्षणात पैशांची देवाणघेवाण होते आणि ते सगळं बँकेच्या मार्फत होतं म्हणजे सगळं सुरक्षित, ब्लॅक मनी विरहित आहे.

भारतात आलेली लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि मोदीजींनी तिच केलेलं प्रमोशन यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यातच त्यांनी दिलेला नोटबंदीचा शॉक यामुळे देखील डिजिटल व्यवहार वाढला.

भारतात जास्तीत जास्त जनता बँकिंग क्षेत्राच्या खाली यावी व देशातील प्रत्येकाचे बँक अकाउंट असावे या साठी मोदी प्रयत्न करत आहेत. जनधन योजना व इतर योजना याचाच परिपाक आहेत. गेल्या काही वर्षात याचे फळ देखील दिसत आहे.

पण जे नरेंद्र मोदी आज लोकांना बँक अकाऊंट काढायला मागे लागत आहेत एकेकाळी बँक वाले मोदींच्या मागे लागले होते.

१७ सप्टेंबर १९५० ला गुजरातच्या वडनगरमध्ये दामोदरदास मूलचंद मोदी आणि हीराबेन मोदी यांच्या घरी नरेंद्र मोदींचा जन्म झाला. लहानपण अत्यंत गरिबीत जात असल्यामुळे त्यांच्या आयुष्याची सुरुवातच अत्यंत संघर्षमय झाली होती. आपल्या भावंडांसह मोदी एका मजल्याच्या छोट्याश्या घरात राहायचे. वडील स्थानिक रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे.

सुरुवातीच्या काळात मोदी देखील सर्वसामान्य मुलाप्रमाणे वडिलांना आपल्या कामात मदत करायचे. स्टेशनवर उभे राहून वडिलांसोबत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना चहा विकायचे. त्याच दरम्यान वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. बॉयज स्काऊट्स गट असं त्यांच्या गटाला म्हंटले जायचे. पुढे १९६० च्या आसपास ते संघाच्या शाखेत देखील जाऊ लागले. 

याच दरम्यान मोदींनी एका भाषणात जेष्ठ नेते लक्ष्मणराव इनामदार यांना ऐकले. लक्ष्मणरावांना देखील हा महत्वकांक्षी तरुण प्रचंड आवडला आणि त्यांनी मोदींना बालस्वयंसेवक बनवले. मोदी शाळेत देखील तेवढेच हुशार होते. त्यांच्या शाळेतील एक सहकारी सांगतात कि मोदी वाद-विवाद स्पर्धांमध्ये अव्वल होते. ते वडनगरच्या प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये होते.

सोबतच १२-१३ वर्षाच्या नरेंद्र मोदी यांचा देशभक्तीकडे ओढा वाढला होता.

मोदींनी या काळातील एक आठवण सांगितली आहे. शाळेत असताना त्यांच्या वर्गात एकदा देना बँकचे कर्मचारी आले होते. विद्यार्थ्यांमध्ये बँकिंगची सवय लागावी यासाठी बँकेने भिशीची योजना आखली होती. प्रत्येक मुलाचा बँक अकाउंट काढून त्यांना गुल्लक देण्यात आलं. यात आपले मोदीजी देखील होते.

ते सांगतात,

माझ्या प्रत्येक मित्राची भिशी भरली पण आमची परिस्थिती चांगली नसल्यामुळे कधी त्या गुल्लक मध्ये पैसे टाकण्याचे प्रसंग देखील आले नव्हते.  

पुढे मोदीजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले, प्रचारक बनले. एक प्रकारचं संन्यास स्विकारलं. घरदार सोडून राष्ट्रसेवेला वाहून घेतलं. मधल्या काळात त्यांचं शिक्षण देखील अपूर्ण राहिलं. आपली गुल्लक योजना आणि बँक अकाउंट याबद्दल ते विसरूनही गेले.

मधल्या काळात बरीच वर्षे उलटून गेली. मोदींनी घर संसारकडे परत फिरूनही पाहिलं नाही. त्यामुळे गावी येण्याचा प्रश्नच नव्हता.  पण त्यांचं देना बॅंकेतलं अकाउंट सुरूच होतं. त्यात काही पैसे देखील नव्हते. बँकेतील अधिकारी ते खातं बंद करण्यासाठी नरेंद्र मोदी कोण या शोधात होते. पण देशभर भ्रमंती करण्यासाठी निघून गेलेले मोदी काही केल्या त्यांच्या हाती लागत नव्हते.

मोदी सांगतात असं ३२ वर्षे चाललं. अखेर एकदा बँकेला मी वडनगर भागात आल्याचं कळलं. त्यांनी मला गाठलं आणि अकाउंट बंद करून घेतलं. त्यानंतर मी पुन्हा कधी बँक अकाउंट काढलच नाही.

मोदी पुढे राजकारणात आले. भारतीय जनता पक्षाचं काम सुरु केलं. रामरथ यात्रा, काश्मीर मध्ये तिरंगा फडकवणे अशा आंदोलनात अग्रभागी राहिले. पक्षाचे दिल्लीत प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळली. गुजरातमध्ये राजकीय उलथापालथीच्या केंद्र स्थानी राहिले. पण स्वतःच्या गरजा कमी व कुटूंबाची जबाबदारी नसल्यामुळे पैशांची विशेष आवश्यकता नसायची. त्यामुळे बँक अकाऊंटची आवश्यकता देखील भासली नाही.

पुढे २००१ साली अचानक अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पाठवलं. मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांना आमदार म्हणून पगार मिळण्यास सुरवात झाली. त्यावेळी मोदींनी आपलं नवीन बँक अकाउंट उघडलं. आजही ते चालू आहे. 

हे हि वाच भिडू

    

Leave A Reply

Your email address will not be published.