इंडियाला खऱ्या भारताची ओळख करुन देणारे – देऊळ, गावाकडच्या गोष्टी आणि गावकथा.
अस्सल ग्रामीण भाव–भावनांना, खेड्यातील लोकांना, त्यांच्या चढ उतारात अडकलेल्या हरेक भावनांच्या तीव्रतेला, त्या प्रखरतेला, विनोदाला, मार्मिकतेला, ज्वलंत वास्तवाला, असंख्य अनुत्तरित प्रश्नांना, प्रश्नचिन्ह असलेल्या उत्तरांना, तर कधी सहन न होणार्या रोजच्या रहाटगाड्याला..
या तीन ही कलाकृतींनी शेती, शेतकरी, ग्रामीण जीवन, गावे, खेडी, गावाकडची हवा, हिरवे हिरवे गार गालिचे वगैरे या टिपिकल शब्दप्रयोग व आत्तापर्यंत असच काहिसं दाखवलेल्या व पाहिलेल्या गोष्टींना..
या वरील तीन ही कलाकृतींनी आपापल्या परिने जरा हात मागे सारुन चपराक लगावली आहे.
देऊळ रिलीज होऊन सातेक वर्षे झाली. नी या सात वर्षात चित्रपटसृष्टीत ही बरच काही बदललं. पण देऊळने अनेक छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र करुन अख्खं गाव दोन तास पडद्यावर मांडलं. लोकं त्याच्याशी रिलेट होत गेली. लोकांना ते आवडलं. त्यातला संदेश ही आवडला. नी शहरी व ग्रामीण जीवनातल्या विरोधाभासाने अंतर्मुख ही केलं. देऊळ ची मांडणी त्यातले खुसखुशीत संवाद व नंतर विचार करण्यास भाग पाडणारं कथानक. यामुळे देऊळ ने आपली छाप आजतागायत सोडली आहे. सामाजिक, राजकिय व मानवी भावभावनांची सांगड, त्यातुन श्रद्धेचे होणारे राजकारण याची एक वेगळी छाप देऊळ ने आज ही उमटवली आहे.
वर्षभरापुर्वी ‘गावाकडच्या गोष्टी’ ही वेबसिरिज युट्युबवर प्रदर्शित झाली नी तिने ही धुमाकुळ घातला तो आजतागायत.
विनोद, रोजचे किस्से, गावाकडचे एक वातावरण, तो माहोल.. जे कुणालाही मांडायला जमलं नव्हतं. किंबहुना कुणी तो प्रयोग देऊळ नी वळु चित्रपट सोडुन इतका खोल विचार करुन केला नव्हता तो विचार नी ती खास अभ्यासपुर्ण मांडणी व शैली या गावाकडच्या गोष्टी वेबसरिज मधे दिसुन आली. आपल्या खास शैलीत या वेबसिरिज ने अनेक प्रश्नांवर बोट ठेवले. मग ते विनोदी प्रसंग असोत अगर प्रत्येकाच्या वास्तवाशी रिलेट होणारे असोत. कमी कालावधीत जगभर पोहोचलेली ही वेबसिरिज आवडण्याची कारण हीच की, त्यांनी सध्याचे खेड्यातील जीवन आहे असं युट्युबमार्फत जगभर पोहोचवलं.
कित्येक छोट्या छोट्या गोष्टीतुन या वेबसिरिजने लोकांना आपल्याकडे वळवलं व सध्याच्या ग्रामीण वास्तवाशी, तिथल्या प्रश्नांशी लोकांना एकरुप व्हायला लावलं, नी नकळत अंतर्मुख ही व्हायला लावलं. जगताना नुसतं मनोरंजन कामाचं नसतं तर कित्येक जाणिवा, वास्तवं, अनुत्तरित प्रश्न समोर उभे ठाकलेले असतात. त्यातुन मार्ग काढत पुढे जायचं, असतं हे या वेबसिरिजमधुन आता मांडलं जातय. एक कॅमेरा, गावाकडची लोकेशन्स, काहितरी करुन दाखवण्यासाठी धडपड करणारे तरुण, आणि जसं आहे तसं मांडण्याचे कौशल्य या महत्वाच्या बाबींनी गावाकडच्या गोष्टीला जगभर पोहोचवले, मिडियाने दखल घेतली नी राज ठाकरेंची ही कौतुकाची थाप यांना मिळाली.
देऊळ ते गावाकडच्या गोष्टी हा दृकश्राव्य प्रवास पडद्यावर,मोबाईलवर पाहत असतानाच ‘गावकथा’ हे नाटक पुण्यात पाहिलं तेव्हा दोन दिवस सुन्न होतो. इतकं जहरी वास्तव लेखणीतुन कोण कसं मांडु शकतं हा विचार कित्येक तास डोक्यात घोंघावत होता.
ते झाड कहानी सांगतं,
पावसाला संजीवक धर्म होता अन, मायमाती बेईमान नव्हती. त्या निष्कलंक दिवसाची ही कहानी.. अस म्हणत ही गावकथा बसलज्यागी तुम्हाला कधी गहन विचारात टाकते, कधी हसवते, स्तब्ध करते, तर कधी रडवते ही.
आहेत, गावं अाता अशीच आहेत.
त्यातल्या कित्येक जहाल प्रश्न, वास्तवं नी प्रसंगासह अंगावर येणारी. हेच या गावकथेत फार जबरदस्त मांडलय. मुळात बदलाच्या वार्यात सगळ्यात जास्त फटका जर कशाला बसला असेल या देशातल्या खेड्यांना..
आणि हे सगळं समोर दिसताना गावकथेत मांडलेले आसपासचे कित्येक प्रश्न, जळजळीत–ठसठशीत प्रसंग, तरुणांचे नैराश्य, राजकारण्यांकडुन होणारा युवापिढीचा वापर, शैक्षणिक क्षेत्राचा वाजलेला बोर्या नी त्यात फरपटत जाणारा शिक्षक, सोयाबीन जळलं म्हणुन त्याने आता जळकं सोयाबीन पहावं की त्यावर कविता लिहुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन द्यावी या विवंचनेत असलेला कवी असो, नाहीतर जशी गावावर सकाळची एक धुक्याची दुलई पसरते तशी प्रत्येकाच्या अवतीभवती पसरलेली अस्वस्थता असेल, गरगर फिरणारी छायडाबाई असेल, शहारे आणणार्या कविता असतील, आणि तरल व अबोल प्रेमाच्या अव्यक्त भावना, अन प्रत्येक गावात सापडणार्या त्या व्यक्तिरेखा..
अक्षरश: खडबडुन जागं करतात तुम्हाला.
या गावकथेतला हा जाणिवांचा गाव तुम्हाला गावची वेस ओलांडुन अगदी अातपर्यंत नेतो. नी तुम्हाला या सार्यांच्या मधे नेऊन बसवतो. आणि वर म्हटल्याप्रमाणं हे खडबडुन जागं करणं ना. कुणीतरी गरजेचं होतं.
अरे उठा आता. बास झालं तेच ते. किती दिवस कुणीतरी काहितरी दाखवतय म्हणुन तेच सत्य मानुन चालणार आहात, गृहीत धरणार आहात. या नी पहा..
हे असं ही आहे, जे आजवर कुणी मांडलं नाही नी मांडायचं धाडस ही केलं नाही.
देऊळ नंतर खरंतर पुलाखालुन बरच पाणी वाहुन गेलं. पण देऊळ मार्फत वेगळा बाज मांडायला सुरुवात झाली ह्याचं कौतुक नक्कीच वाटतं. गावाकडच्या गोष्टींनी विनोदामार्फत हळुहळु अंतर्मुख करायला लावलं. गावं तिथल्या माणसांसकट, प्रश्न उत्तरांसकट आहे अशी मांडणं फार अशक्यय हे. ते यांनी आपल्या वेबसिरिजमधुन करुन दाखवलं.
गावकथेने तर कुणी न केलेलं धाडसं करुन दाखवलं व जे जे म्हणुन आजपर्यंत कुणी मांडलं नाही त्यांनी ते लोकांसमोर आणलं. देऊळ – गावाकडच्या गोष्टी – आणि गावकथा. या तीन ही कलाकृती म्हणुन यासाठी अपिल होत राहतात कारण यांनी आजपर्यंतचा जुना साचा तोडुन लिखाणामार्फत व तितक्याच उत्कृष्ट मांडणीसह काळानुरुप केलेली बंडखोरी जी आता गरजेची वाटते आहे.
देऊळ(उमेश कुलकर्णी), गावाकडच्या गोष्टी (नितीन पवार) आणि गावकथा (बालाजी सुतार) या तिघांत साम्य एकच की यांना वास्तव मांडणं आवडतं. जसं आहे तसं. कुणाची, कशाची पर्वा न करता लिखाणामार्फत नवी बंडखोरी करुन यांनी त्याला उत्कृष्ट मांडणीचा साज चढवत या कलाकृती लोकांना दिल्या त्याबद्दल खरंच त्यांचे कौतुक करावं तेवढे थोडे आहे.
- विकी पिसाळ (9762511636)