एकदा नाही तर दोन वेळा चिन्ह गोठवूनही जयललितांच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव दोन्ही कायम राहिलं

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवण्याचा निर्णय दिला आहे. शिंदे विरुद्ध  संघर्षातील हा निर्णायक निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे. विशेषतः शिंदे गट पहिल्यापासून एकतर चिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हाला देण्यात यावं किंवा ते गोठवण्यात यावं याच्या बाजूने राहिला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या बाजूनं हा निर्णय गेला असं म्हटलं जातंय. मात्र उद्धव ठाकरे गटासाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

मात्र हा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या पूर्वी घेण्यात आला आहे.

भविष्यात जो गट आम्हीच ओरिजनल शिवसेना कशी आहोत हे प्रुव्ह करू शकेल त्यांना त्यानं पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील वापरता येइल. याआधी इतिहासात अनेक अशी उदहारण आहेत ज्यामध्ये पक्षात फूट पडल्यानंतर  काही काही काळासाठी चिन्ह गोठवण्यात आलं आणि मात्र नंतर ते चिन्ह पुन्हा एकला देण्यात आलं. यातला एक प्रमुख नाव म्हणजे अण्णा द्रमुक. आधी एमजीआर आणि नंतर जयललिता यांच्यामुळे या पक्षाला ओळख मिळाली.

मात्र या दोन्ही नेत्यांच्या जाण्यांनंतर पक्षात फूट पडली आणि पक्षाचं चिन्ह आणि नाव दोन्ही गोठवण्यात आलं होतं.

मात्र तरीही आज पक्षाचं दोन पाने हे चिन्ह आणि नाव अजूनही कायम आहे तेच बघुयात. तर अण्णा द्रमुकला पहिला सर्वात मोठा धक्का बसला तो पक्षाचे संस्थापक एम जी रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर. त्यांच्या मृत्यूनंतर, AIADMK दोन गटांमध्ये विभागला गेला. ज्यानुसार एका गटाचे नेतृत्व एमजीआर यांच्या विधवा पत्नी जानकी रामचंद्रन आणि दुसर्‍या गटाचे नेतृत्व जयललिता करत होत्या.

25 डिसेंबर 1987 रोजी जयललिता यांचा एम.जी. रामचंद्रन यांच्या अंतयात्रे दरम्यान जयललिता यांचा अपमान झाल्यानंतर हे प्रकरण अजूनच चिघळलं.

1 जानेवारी 1988 रोजी  जयललिता AIADMK चं सरचिटणीसपद स्वतःकडे घेतलं. दोन्ही गट पक्षावर आणि पक्षाच्या नावावर दावा ठोकू लागले आणि मग हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं. त्यातच विधासभेच्या निवडणुका तोंडावर होता. ही परिस्तिथी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना स्वतंत्र निवडणूक चिन्हे दिली. जानकी रामचंद्रन गटाला “दोन कबुतरे” आणि जयललिता यांच्या गटाला “कोंबडा” हे चिन्ह मिळाली .

मात्र विधानसभेच्या निवडणुकीत या फुटलेला अण्णा द्रमुकचा दारुण पराभव झाला आणि त्यांना सत्ता गमवावी लागली.  या निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वाखालील गटाने 27 जागा जिंकल्या, ज्यामुळे तो राज्य विधानसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला. मात्र पक्ष वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज ओळखून जानकी रामचंद्रन यांनी जयललिता यांचं नेतृत्व मान्य केलं आणि दोन्ही गट एकत्र झाले. त्यामुळे मग निवडणूक आयोगाने दोन पाने हे चिन्ह पुन्हा अण्णा द्रमुकला बहाल केलं.

त्यानंतर पक्ष पुन्हा रिकव्हर झाला आणि जयललिता तब्बल सहावेळा मुख्यमंत्री झाल्या.

मात्र सहाव्या  टर्म्सला मुख्यमंत्री असताना  ५ डिसेंबर २०१६ ला त्यांचा मृत्यू झाला आणि आणि पक्षात पुन्हा फूट पडली. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचे विश्वासू सहकारी ओ पन्नीरसेल्वम किंवा ओपीएस यांनी काही तासांतच मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकराला आणि जयललिता यांच्यामागे सावलीसारख्या वागणाऱ्या त्यांच्या अत्यंत विश्वासू शशिकला यांना पक्षातलं जनरल सेक्रेटरी हे सर्वोच्च पद देण्यात आलं. मात्र शशिकला यांची महत्वाकांक्षा मुख्यमंत्री होण्याची देखील होती. त्यामुळे त्यांनी ओपीएस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं.

सुरवातीला शशिकला यांचं सगळं म्हणणं ऐकणाऱ्या ओपीएस यांनी अचानक शशिकला यांच्या विरोधात बंड केलं.

शशिकला हे बंड थोपवण्याच्या तयारीत होत्या. मात्र त्याचवेळी त्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली अटक झाली आणि पुढील १० वर्षे त्यांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली. त्यावेळी मग शशिकला कॅम्पनं एडाप्पाडी के पलानीस्वामी किंवा ईपीएस यांची AIADMK विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली. ओ पनीरसेल्वम यांना इतर ‘बंडखोर’ नेत्यांसह पक्षातून काढून टाकण्यात आलं.

अशाप्रकारे पक्षात ओपीएस आणि ईपीएस असे दोन गट पडले.

एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली मात्र संघर्ष चालूच होता. त्याचवेळी आरके नगरची पोटनिवडणूक लागली. शशिकला यांच्या पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्तीविरोधात ओपीएस गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आणि आम्हीच ओरिजनल पक्ष असल्याचा दावा केला.

मग निवडणूक आयोगाने  पक्षाचे दोन पाने चिन्ह गोठवले आणि AIADMK मध्ये फूट पडल्याचे मान्य केले .

आरके नगर पोटनिवडणुकीत कोणताही पक्ष चिन्ह किंवा AIADMK हे नाव वापरू शकत नाही, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाने पलानीस्वामी कॅम्पला “टोपी” हे त्याचे नवीन चिन्ह दिले आहे. या गटाला AIADMK (अम्मा) असे नाव देण्यात आले. आणि त्याचवेळी ओ पनीरसेल्वम कॅम्पला त्याचे चिन्ह म्हणून ‘इलेक्ट्रिक पोल’ देण्यात आला आहे आणि त्याचे नाव AIADMK (पुराचिथलैवी अम्मा) असं ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

मात्र त्याचवेळी आरके पुरम च्या निवडणुकीत शशिकला यांच्या पुतण्या असणाऱ्या टी टी व्ही दिनकरन यांच्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्याचा आरोप झाला आणि यामुळे निवडणुक रद्द देखील झाली. त्याचवेळी पलानीस्वामी कॅम्पने शशिकला आणि त्यांच्या पुतण्याला डावलून ओपीएस यांच्याशी बॊलानी चालू केली आणि हे दोन्ही फॅक्शन एकत्र आले.

मात्र त्यावेळी शशिकला यांचे पुतणे टी टी व्ही दिनकरन यांनी या दोघांच्या विरोधात बंड केलं आणि पक्षावर दावा केला.

त्याचवेळी टी टी व्ही दिनकरन यांनी सध्या जेलमध्ये असलेला कॉनमॅन सुकेश याच्यामार्फत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दोन पानाचं चिन्ह मिळवण्यासाठी लाच देण्याचा देखील प्रयत्न केला होता.

मात्र शेवटी निवडणूक आयोगाने ओपीएस आणि ईपीएस गटाला खरी अण्णा द्रमुक मानत त्यांना दोन पानाचं चिन्ह दिलं होतं. या गटाकडे संघटेनच्या संसदस्यांची आणि पक्षतर्फे निवडून आलेल्या लोकसभा आणि विधानसभा सदस्यांची संख्या जास्त असल्याने हा निर्णय देण्यात आला आणि अशाप्रकारे अण्णा द्रमुकनं दुसऱ्यांदा त्यांचा चिन्ह मिळवलं.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.