देव आनंदनं गाणं पिक्चरमधून काढून टाकायचं ठरवलं होतं, पुढं त्याच गाण्यानं इतिहास लिहिला

काही गाणी चिरंजीव असतात.काळाचे प्रवाह त्याला जुनं करूच शकत नाही. असचं एक गाणं आहे ’कांटो से खीच के ये आंचल…’ गाईड सिनेमातील. आज हे गाणं असलेला ’गाईड’ या सिनेमाला पन्नास-पंचावन्न वर्ष झाली असली तरी या गीताचा ताजेपणा,त्यातील गोडवा आजही टिकून आहे. 

शैलेंद्रचे अर्थवाही शब्द सचिनदाची मिठ्ठास धुन पडद्यावर वहिदाचा फ्रेश चेहरा आणि लताचा सदाबहार स्वर याच बरोबर गोल्डी विजय आनंदच अनोखं चित्रीकरण यामुळे हे गीताला अमरत्व बहाल झालं. या गाण्याबाबतचा एक किस्सा वहिदाच्या अलिकडेच आलेल्या पुस्तकात वाचावयास मिळाला. इतके अप्रतिम गीत सुरूवातीला मात्र देव आनंदला अजिबात आवडले नव्हते. या गाण्याबाबत त्याच्या मनात तिटकाराच निर्माण झाला होता.

खरं तर या गाण्याचे सिनेमातील स्थान फार महत्वाचे होते.

आपल्या पतीच्या जाचातून मुक्त होत रोझी (वहिदा) पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत असते. तिच्या बंधनातील मुक्तीच्या क्षणाला व्यक्त करणारं हे गाणं होतं. शैलेन्द्र ने अतिशय समर्पक शब्दात या भावना मांडल्या होत्या. 

सचिनदांनी या गीताला चाल लावताना एक नैसर्गिक वेग दिला होता जो नायिकेच्या उत्साहाला, मनाच्या उधाणाला प्रेरीत करणारा होता.पण देवला काही केल्या ते गाणं आवडले नाही. तो गोल्डीला म्हणाला”ये बर्मन दादा को क्या हो गया है, ऐसा कैसा गाना बना दिया है, मज़ा नहीं आ रहा है। I just can’t take it. मुझे दादा से बात करनी पड़ेगी कि गाने में बिल्कुल मज़ा नहीं आ रहा है’.

यावर गोल्डीने सुचवले “आपको यह गाना बुरा लगा है, ठिक है पर कम से कम एक बार यह गाना हमको तो दुबारा सुनना चाहिये “यावर नाखुषीने देवने स्पूलवर ते गाणे पुन्हा ऐकवले. गाणे ऐकताच गोल्डीच्या डोळ्यात चमक आली. 

गाण्या्ची दृष्यात्मक त्याच्या मनात तयार झाली. पण देवला सांगणार कसे? सर्व युनिट सोबत विचार विमर्ष करून तो देवला म्हणाला “हम सब आपकी जज़्बात की इज़्ज़त करते हैं कि आपको गाना पसन्द नहीं आ रहा है, मगर फिर भी एक हमारी अनुरोध है कि गाना शूट कर लेते हैं, शूट करने के बाद जब आप देखेंगे कि गाना पसन्द नहीं आ रहा है, तो निकाल देंगे।”हि मात्रा मात्र देव वर लागू पडली. 

राजस्थानातील पाच लोकेशन्स चित्रीकरणासाठी निवडली गेली.

गाण्याच्या शूट बाबत  गोल्डीची कलात्मकता जबरदस्त होतीच. गाण्याचं शूटींग सुरू झालं.रोज संध्याकाळी देव पहात होता की क्रू वरील सर्व जण या गाण्याच्या सुरावटीने वेडावले होते.सारेच जण अखंडपणे गे गाणे गुणगुणत होते. देव सुध्दा हळूहळू या गाण्याच्या प्रेमात पडू लागला. आणि गाणे सिनेमात ठेवायचा निर्णय झाला.

या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याची ध्रुवपदाची चालच अंतर्‍याला वापरली आहे. म्हणजे कशी बघा ’’कांटो से खीच के ये आंचल’ हो ओळ गुणगुणून बघा आणि लगेच अंतर्‍याची ओळ ’ कल के अंधेरो से निकलके’ हि ओळ म्हणून बघा…चाल सारखीच होती! 

हा अभिनव प्रयोग सचिनदांनी पहिल्यांदा इथे केला होता. पुढे असाच प्रकार ’नीले गगन के तले’(हमराज) , ये मेरी जिंदगी बेजान लाश थी (बेताब) या गीतात देखील केलेला दिसतो. अशा प्रकारे देवला सुरूवातीला न आवडलेले गाणे आज पन्नास-पंचावन्न वर्षानंतरही तितकेच लोकप्रिय आहे.

‘गाईड’ चित्रपटातील संगीताने इतिहास घडवला.

सचिन देव बर्मन यांनी या चित्रपटाचे संगीत दिले होते ते गाणी लिहिली होती शैलेंद्र यांनी. या चित्रपटात मोहम्मद रफी यांच्या स्वरात तीन अप्रतिम सोलो गाणी होती. ‘दिन ढल जाये हाय रात न जाये’,’ तेरे मेरे सपने अब एक ही रंग’,’ क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में’. या चित्रपटात लता मंगेशकर यांच्या स्वरांमध्ये तीन अप्रतिम गाणी होती.

ज्या गाण्याचा  वर उल्लेख आला आहे ते ‘कांटो से खिचके आंचल’, ‘मोसे छल किये जाये हाय सैय्या बेईमान’ आणि सदाबहार ‘पिया तोसे नैना लागे रे’ या चित्रपटाच्या कालखंडात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर एकमेकांसोबत गाणी गात नव्हते. त्यामुळे या चित्रपटात एकमेव युगलगीत आहे जे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आहे.

‘गाता रहे मेरा दिल…’ या चित्रपटातील ‘वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां…’ हे सचिन देव बर्मन यांच्या स्वरातील गाणे देखील खूप लोकप्रिय झाले होते. तसेच त्यांच्याच  स्वरातील ‘अल्ला मेघ दे पानी दे…’ हे गीत देखील रसिकांच्या पसंतीस उतरले होते!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.