देवानंदमुळे अमिताभ बच्चनला जंजीरसारखा सुपरहिट सिनेमा मिळाला…
बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आले जे कायमचे हिट झाले आणि त्यानंतर तसे त्या धाटणीचे सिनेमे आलेच नाहीत. त्यापैकीच एक असलेला तो म्हणजे जंजीर. जंजीरचं सगळं क्रेडिट जातं ते अमिताभ बच्चनला. या सिनेमामुळे बच्चनची बॉलिवूडमध्ये चलती आणि तो तिथून पुढे कधी मागे ह्टलाच नाही. जंजीरने अनेक रेकॉर्ड मोडले, बॉक्सऑफिसवर चांगली कमाई या सिनेमाने केली होती. पण या सिनेमामागचा एक भारी किस्साय.
जंजीर ज्यावेळी बनत होता तेव्हा सलीम-जावेद हि जोडी बॉलिवूडमध्ये एखाद्या हिरो किंवा डायरेक्टरपेक्षा मोठी मानली जायची. सलीम जावेद या जोडीने १९७१-१९८७ पर्यंत एकत्र काम केलं आणि यात त्यांनी भरपूर हिट सिनेमे दिले. यात त्यांनी जितके हिट सिनेमे लिहिले त्या सगळ्या सिनेमांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन होते. अमिताभला सलीम जावेदने खऱ्या अर्थाने मेगास्टार बनवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
देवानंद तेव्हा सगळ्यात टॉपचे हिरो होते आणि त्यांच्यासोबत काम करायला सगळेच उत्साही असायचे. त्यांची टोपीची स्टाईल तेव्हा चांगलीच गाजली होती. चॉकलेट हिरो म्हणून त्यांचा गवगवा होता. याच काळात त्यांच्याकडे जंजीरची स्क्रिप्ट आली पण त्यांनी सलीम जावेदला दिलेले शब्द जास्त महत्वाचे ठरले होते तेव्हाची हि गोष्ट.
तो काळ अमिताभ बच्चनचा सुवर्णकाळ होता. जंजीर सिनेमातसुद्धा सलीम जावेद जोडीने अमिताभला चान्स दिला होता. या सिनेमामुळे अमिताभचं नशीब पालटलं आणि तो बॉलिवूडचा बिग बी बनला. पण जंजीर अगोदर अमिताभकडे येण्याअगोदर अजून ४ मोठ्या सेलेब्रिटींकडे गेला होता. बऱ्याचदा स्टोरी चांगली असते, पात्रसुद्धा उत्तम असतात पण त्यात परफेक्ट बसेल असेहि कलाकार निवडणे हे मोठं जिकिरीचं असायचं.
सलीम जावेद जोडीने स्क्रिप्ट पूर्ण केल्यानंतर सगळ्यात आधी दिलीप कुमार यांना गाठलं. पण काही कारणास्तव दिलीप कुमारांनी जंजीरला नकार कळवला. सलीम जावेद जोडीने मग धर्मेंद्रला स्क्रिप्ट ऐकवली पण धर्मेंद्रने शूटिंगच्या तारखा फिक्स असल्याचं सांगून जंजीरला फाट्यावर मारलं. दोन मोठ्या हिरोंकडून रिजेक्शन मिळाल्याने सलीम जावेद जोडी निराश झाली होती.
मोठ्या आशेने ते गेले राजकुमार यांच्याकडे. राजकुमार यांचा थाटचं वेगळा होता, स्क्रिप्ट ऐकून ते म्हणाले जानी ए तो तुम हमारी कहानी लिखकर लाए हो..राजकुमार यांनीसुद्धा हि स्क्रिप्ट नाकारली शेवटी सलीम जावेद शेवटचा पर्याय म्हणून देव आनंद यांच्याकडे गेले. देवानंद तेव्हा यशाच्या शिखरावर होते. एकापाठोपाठ एक त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवत होते.
सलीम जावेद यांनी अभिनेते प्राण यांच्या घरी देवानंद यांना पूर्ण स्क्रिप्ट ऐकवली. आधीच रिजेक्शनने खचून गेलेले सलीम जावेद मोठ्या आशेने देवानंद यांच्याकडे आलेले होते. देवानंद यांनी सलीम जावेदच्या खांद्यावर हात ठेवत विनम्रपणे सांगितलं कि,
हि स्क्रिप्ट अतिशय उत्तम आहे, मी या स्क्रिप्टला नकार देतोय याचा अर्थ असा नाही कि स्क्रिप्ट खराब आहे. पण हा स्क्रिप्ट बॉक्सऑफिसवर चांगली चालेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या नकाराचा परिणाम स्क्रिप्टवर पडू देऊ नका. विश यु ऑल द बेस्ट…
अशा सगळ्या अडचणींमधून हि स्क्रिप्ट आली अमिताभ बच्चनकडे. बच्चनने तात्काळ होकार कळवला. १९७३ साली हा सिनेमा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. अमिताभ बच्चनची गाडी सुसाट सुटली. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राजकुमार आणि देवानंद यांनी नाकारलेला जंजीर अमिताभच्या पदरात पडला आणि तो हिट झाला.
देवानंद यांचा या स्क्रिप्टवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी सलीम जावेदची घालमेल ओळखली होती. पण त्यांनी अगदी समजावणीच्या सुरात त्यांना नकार दिला होता. देवानंद यांचा तो धीर आणि मनाचा मोठेपणा खूप भावला होता असं सलीम जावेद यांनी सांगितलं होतं.
हे हि वाच भिडू :
- सलीम खान मुख्याध्यापकांना म्हणाले,” सलमानला नाही तुम्ही मला शिक्षा द्या.”
- सलीम जावेदने जादूची कांडी फिरवली आणि फ्लॉप होणारा सिनेमा सुपरहिट झाला.
- सलीम जावेद वेगळे कशामुळे झाले ?
- जावेद अख्तर म्हणत होते यात फ्लॉप होण्याचे सगळे गुण आहेत पण लगान सुपरहिट झाला