एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक सिक्ससाठी धोनीला ५० रुपये बक्षीस म्हणून मिळायचे….

सिच्युएशन बघून खेळता आलं पाहिजे मित्रा….

हे वाक्य एकदम परफेक्ट कोणाला फिट बसत असेल तर ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी.

अजून कुठले विक्रम तोडायचे बाकी आहेत माहिती नाही पण धोनीने भारतीय क्रिकेटला स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी वास्तवात आणून दाखवल्या. म्हणजे धोनीबद्दल बरंच काही आपण ऐकत असतो,पाहत असतो. आज धोनीचा बड्डे.

काही काही गोष्टी या धोनीला अगदीच पाठ आहेत की काय अस वाटू शकतं, त्यापैकी म्हणजे डीआरएस ( DRS ). याला डीआरएस म्हणून ओळखलं जाण्यापेक्षा ते धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हणून ओळखलं गेलं. इतकं अचूक आणि खात्रीपूर्वक निर्णय घेणारा धोनी हा एकमेव कॅप्टन होता. 

2007 चा वर्ल्ड कप जिंकवून देऊन त्याने आपल्या भव्य दिव्य आगमनाचं बिगुल वाजवलं. सौरव गांगुलीने योग्य हातात भारतीय संघाची धुरा दिली होती.गांगुलीचा विश्वास धोनीने सार्थ ठरवत भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस आणले.

2011 चा विनिंग सिक्सर कोण विसरू शकतो. कपिल देव नंतर सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न धोनीने पूर्ण केलं. चॅम्पियन ट्रॉफी, आयपीएलमध्ये 3 वेळा चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजेतेपद मिळवून देणं असो, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताला कायम पहिल्या क्रमांकावर अबाधित राखणं असो अशा अनेक गोष्टी धोनीने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर करून दाखवल्या.

धोनीने संघात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिल्या, रैना,कोहली, युवराज,जहिर आणि इतर खेळाडूंच्या मदतीने धोनीने सचिन तेंडुलकरला वर्ल्ड कप जिंकवून देऊन सन्मानाने गुडबाय दिला.

या सगळ्या गोष्टी आपण धोनीच्या संबंधित बातम्या ऐकत ,पाहत असतो पण आजचा किस्सा धोनीच्या सुरवातीच्या क्रिकेट काळातला. अगोदर फुटबॉल आणि बॅडमिंटनची आवड असलेला धोनी क्रिकेटकडे कसा वळला हे आपण त्याच्या जीवनावर आलेल्या एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात पाहिलंच आहे.

धोनीने मारलेल्या सिक्सरचे लाखो करोडो लोकं फॅन आहेत पण एक काळ असा होता की धोनीला सिक्स मारल्यावर 50 रुपये बक्षीस म्हणून मिळायचे.

विनिंग सिक्स मारून मॅच संपवण्याचा एक वेगळा ट्रेंड धोनीने सुरू केला.

तो मैदानात बॅटिंगला येता क्षणीच लोकं धोनीकडून चौकार षटकाराची अपेक्षा करू लागतात. अगोदर पूर्ण वेळ घेऊन आणि मॅचचा मूड बघून तो आपला जुन्या अवतारात येऊन बॉलिंगची धुलाई सुरू करतो.

भारतीय संघात येण्याअगोदर धोनी सेंट्रल कोल फिल्ड लिमिटेड कडून क्रिकेट खेळायचा. त्यावेळी धोनीच्या बॅटिंगमध्ये अजून सुधारणा व्हायला हव्या असं त्यावेळचे कोच देवल सहाय यांना वाटायचं. ते नवीन नवीन आयडिया धोनीला सांगत असायचे. पण धोनीचा खेळ हा पूर्णतः नॅचरल होता.

यावर उपाय म्हणून काहितरी आयडिया केली पाहिजे असं देवल सहाय यांना वाटू लागलं. मग त्यांनी शिश महल स्पर्धेत मॅचच्या दरम्यान धोनीला चॅलेंज केलं की,

मॅचमध्ये तू जितके सिक्सर मारशील त्या प्रत्येक सिक्ससाठी तुला 50 रुपये मिळतील.

इथून पुढे धोनी षटकार मारणाऱ्यांच्या रांगेत जाऊन बसला. देवल सहाय यांच्या मदतीनेच बिहारच्या संघात निवड झाली होती. धोनीच्या बॅटिंगवर खुश झालेल्या देवल सहाय यांना धोनी भारतीय संघात खेळावा अशी प्रचंड इच्छा होती.

आज सुद्धा धोनीने मारलेला हेलिकॉप्टर शॉट आजही क्रिकेटप्रेमींचा फेवरेट आहे.

तिकीट कलेक्टर ते यशस्वी क्रिकेटर असा धोनीचा प्रवास आहे. आजही अनेक तरुण लोकांना धोनीचा हा प्रवास प्रेरणादायी वाटतो. सिक्सचे ५० रुपये बक्षीस हे तेव्हा धोनीचा आत्मविश्वास वाढवणारे होते.

आज धोनी जेव्हा मैदानात पाऊल टाकतो तेव्हा हजारो लोकांच्या तोंडून धोनी धोनी असा आवाज येतो. भारताला क्रिकेटमध्ये वर आणणारा धोनी आज जरी आयपीएल सोडून इतर क्रिकेट फॉरमॅट मधून रिटायर्ड झाला असला तरी तो अनेक लोकांचा आवडता खेळाडू आहे……

 हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.