तेव्हा देवेगौडा यांच्या ऐवजी एक मराठी माणूस पंतप्रधान झाला असता…

प्रो. मधु दंडवते. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणात जे मोजके आदर्श नेते होऊन गेले त्यात मधु दंडवते यांचा समावेश होतो. कोकण रेल्वेचं स्वप्न पूर्ण करणारे मधु दंडवते आपल्या शपथ विधी साठी स्कुटर वरून गेले होते, मंत्रिपद मिळाल्याची बातमी अली तेव्हा कपडे धूत होते, देशाचे अर्थमंत्री झाल्यावरही रिक्षाने फिरत होते.त्यांच्याबद्दलच्या कथा आजकालच्या पिढीला दंतकथा वाटाव्या इतक्या अविश्वसनीय अशा आहेत.

त्यांना एकदा नाही तर दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी चालून आली. दोन्ही वेळा त्यांनी तत्वानुसार चालायचं ठरवलं आणि हि संधी हुकली.

१९८९ साली पंतप्रधान होण्याचा त्यांना पहिला चान्स चालून आला होता. तेव्हा ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी पंतप्रधान पदावर दावा सांगितला असता तर कोणीही नकार दिला नसता पण मधु दंडवते यांनी तस केलं नाही.

दुसऱ्यांदा तसा चान्स १९९६ साली आला होता.

तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. नरसिंहराव पंतप्रधान होते. पण बाबरीची घटना, मुंबई दंगल, बॉम्बस्फोट, हवाला,हर्षद मेहता घोटाळा अशा अनेक कारणामुळे नरसिंहराव सरकारची लोकप्रियता ढासळली होती. काँग्रेस परत सत्तेत येत नाही हे सगळ्यांनाच कळालं होतं. तेव्हा विरोधी पक्ष दुप्पट मेहनत घेऊन निवडणुकीसाठी उतरले.

मधू दंडवते यांनी नेहमीप्रमाणे कोकणातल्या राजापूर मतदारसंघात तयारी सुरु केली.

राजापूर हा मधु दंडवते यांचा एकेकाळचा बालेकिल्ला. अगदी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेल्या काँग्रेस लाटेतही त्यांनी इथून विजय मिळवला होता. एकाच मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार बनण्याची किमया त्यांनी साकारली होती. पण १९९१ साली दुर्दैवाने त्यांचा पहिल्यांदा पराभव झाला. हा पराभव साधा नव्हता तर ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

कोकणात तेव्हा विरोधी पक्षाची जागा शिवसेना भरून काढत होती. शेकाप आणि जनता दलापेक्षा शिवसेनेचा आक्रमक पवित्रा कोकणवासीयांना भावत होता. बाळासाहेब ठाकरेंची भाषणं, मुंबईत शिवसेनेनं केलेली काम यामुळे अगदी तळकोकणातही शिवसेना जाऊन पोहचली. मधु दंडवते यांच्या वाटणीची मते मतदारांनी शिवसेनेच्या झोळीत टाकण्यास सुरवात केली.

१९९६ सालच्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव होणार असच वातावरण होतं.

मधु दंडवते तेव्हा जनता दलाचे सर्वात जेष्ठ नेते होते. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एच डी देवेगौडा त्यांना आपले राजकीय गुरु मानायचे. राजापूरमधून मधु दंडवते पडणार हे त्यांना देखील सूत्रांकडून कळालं होतं.

१९९६ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा मुख्य लढत काँग्रेस व भाजप यांच्या नेतृत्वाखालील आघाडय़ांमध्ये होईल हे उघड होते. तथापि, तिसऱ्या आघाडीलाही बरीच संधी आहे असे प्रतिपादन करणारा जनता दलाचे नेते मधू दंडवते यांचा लेख तेव्हा एका प्रमुख इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाला.

देवेगौडा यांनी तो लेख वाचला तेव्हा ते प्रचंड अस्वस्थ झाले. तिसरी आघाडी जर सत्तेत आली तर दोन मुख्य नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत आली असती. एक तर मधु दंडवते आणि दुसरे होते  रामकृष्ण हेगडे. रामकृष्ण हेगडे देखील जनता दलातील मोठे नेते होते पण ते कर्नाटकात देवेगौडा यांचे स्पर्धक मानले जायचे.  काहीही झालं तरी ते पंतप्रधान नाही झाले पाहिजेत असं देवेगौडांना वाटायचं.

हेगडे यांना रोखू शकणारं एकच नाव होतं, ते म्हणजे मधु दंडवते. 

देवेगौडांनी दंडवत्यांना कर्नाटकातील हसन मतदारसंघातून उभे राहण्याचा आग्रह केला. पण मधु दंडवते यांनी आपण राजापूरमधूनच उभे राहणार असा  हट्ट धरला. 

तुम्ही एकदा तेथून पराभूत झालेले आहात, तेथून विजयी होणे तुम्हाला फार कठीण आहे, हसनमधून नक्की निवडून याल आणि मग पंतप्रधान व्हाल असे देवेगौडांनी विनवून सांगितले. पण दंडवते काही ऐकेनाच. आपण इतकी वर्षे राजापूर मधून निवडणूक लढवली आता फक्त पराभवाच्या भीतीने आपला मतदारसंघ बदलणे हे तत्वाला धरून नाही असं त्यांचं म्हणणं पडलं. कार्यकर्त्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.

शेवटी दंडवते यांनी राजापूर मधूनच फॉर्म भरला.

सहाजिकच ते पुन्हा पराभूत झाले. यावेळी शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी राजापूरातून विजय मिळवला. दंडवते पुन्हा तिसऱ्या स्थानी राहिले. या पराभवामुळे त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. पण त्यांच्या अंदाजाप्रमाणे तिसऱ्या आघाडीचं सरकार सत्तेत आलं. मधु दंडवते यांच्या साठी जीवाचं रान करणाऱ्या देवेगौडा यांनी रामकृष्ण हेगडे यांना रोखण्यासाठी नवीन चाल खेळली. ते स्वतःच पंतप्रधान झाले.  मराठी माणूस त्या पदावर विराजमान होण्याची नामी संधी अशा प्रकारे हुकली.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.