आज फडणवीसांनी दाखवून दिलं विरोधीपक्ष नेता असावा तर असा…

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरु आहे. पण या दोनच दिवसांमध्ये विरोधीपक्षाने सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे आणि यात आघाडीवर आहेत ते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस.ते सुधीर मुनगंटीवारांच्या जोडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरसह सरकारमधील एकाही मंत्र्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

फडणवीसांचं हे विधानसभेतलं आक्रमक रूप पाहता ते आता विरोधी पक्ष नेता कसा असावा हे सांगण्यासाठी ते परफेक्ट उदाहरण ठरतं आहेत.

अधिवेशनाच्या या काळात विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतून देवेंद्र फडणवीस यांनी खालील मुद्दे मांडलेले आहेत..

१. कोरोनाच्या मोहिमेचं अपयश : 

देवेंद्र फडणवीसांनी कोरोनाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करताना, ज्या मोहिमेचं राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात कौतुक केलं होतं त्यावरूनच सरकारवर टीका केली. ते म्हणाले,

आधी होतं माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता आलंय ‘मी जबाबदार’.

जर सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही जबाबदार असूत तर सरकार काय करत आहे. सरकारची काय जबाबदारी आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलायं.

तसचं देशात झालेल्या एकूण मृत्यूपैकी तब्बल ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहे. ४६ टक्के ऍक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मग नेमकी कशाबद्दल पाठ थोपटून घेत आहात? अशी आकडेवारी देत त्यांनी सरकारच्या मोहिमांचा अपयश दाखवण्याचा प्रयत्न केला.

२. कोरोनाकाळातील भ्रष्टाचाराची आकडेवारी : 

कोरोना काळात महाराष्ट्राने परिस्थितीची हाताळणी नीट केली असती तर ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते, त्यामुळे ३० हजार ९०० मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं?

आम्ही सगळ्यात मोठं रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचं सांगण्यात आलं, पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर ६० लाख रुपये खर्च केले. १२०० रुपयांचं थर्मामीटर ६५०० रुपयांत खरेदी केली. २ लाखांच्या बेडशीटसाठी ८.५ लाख भांड दिलं.

पंख्याचं ९० दिवसांचं भाडं ९ हजार दिलं. हजार प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं ४ लाख रुपये. लाकडाचे १५० टेबलचं भाडं सहा लाख ७५ हजार रुपये. अशी सगळी आकडेवारी मांडत जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला.

३. लहानग्यांच्या मृत्युवर सरकारला जाब : 

भंडाऱ्यातील लहान मुलांच्या मृत्यूवर केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं, लहान मुलांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायजर पाजण्यात आलं. यामुळे बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला पण सरकारनं पावलं उचलली नाहीत, अशी खंत फडणवीसांनी व्यक्त केली.

४. राज्यपाल आणि विमान प्रकरणावरील राजकारण :  

मध्यंतरीच्या काळात सरकार आणि राज्यपालांमध्ये विमान प्रकरणावरून झालेल्या राजकारणावरून त्यांनी टीका केली आहे. राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही तर पद महत्वाचं असतं. आपल्या प्रोटोकॉलमध्ये राज्यपाल पहिल्या क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात कोणाला विमान द्यायचं अशी वेळ आली तर राज्यापलांना द्यायचं असतं, असं सांगत सरकारला राजशिष्टाचार शिकवला आहे.

५. राज्यपालांना दिलेल्या भाषणावरून सरकारवर निशाणा

राज्यपालांच्या १२ पानांच्या भाषणात मला कुठेही यशोगाथा दिसत नाही, तर वेदना आणि व्यथा दिसतात. ‘राज्यपालांचं भाषण म्हणजे पुढील एक वर्षात काय करणार आहोत, आमची दिशा काय आहे यासंदर्भात असलं पाहिजे. पण त्यात काहीच पहायला मिळत नाही’, असं म्हणत फक्त शब्दांचे रत्न लावून लोककल्याण साधता येत नाही, असा टोला लगावला आहे.

६. धार्मिक स्थळांवरील सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह :

दारूची दुकान चालू असताना महाराष्ट्रात कोरोनाच्या नावाखाली देऊळ बंद ठेवण्यात आली, हि सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. त्यावेळी ते म्हणाले, सरकारने काहीतरी आकडेवारी द्यावी की कुठलं मंदिर उघडल्याने करोना वाढला.

देशभरातील धार्मिकस्थळं उघडली पण कुठही करोना वाढला नाही आणि महाराष्ट्रात कोरोना वाढला तर तो धार्मिकस्थळ उघडायला लावल्यामुळे वाढला? दुसरीकडे मात्र पब, दारूची दुकानं चालू शकतात, हॉटेल, सिनेमागृहे चालू शकतात, राजकीय मेळावे देखील चालू शकता यामुळे करोना होत नाही का? असा सवाल करत हे वारकरी परंपरा ही खूप मोठी परंपरा असल्याचे सांगितले.

७. अवैध दारू विक्रीवरून सरकारवर निशाणा

मेळघाटमध्ये महाकाली मुलींच्या वसतीगृहात मद्याचा कारखाना सापडला. हल्ली अवैध दारूचं कॉर्पोरेटायझेशन झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये अवैध दारूविक्री केली जात आहे. त्यांना कुणाचं पाठबळ आहे? अजितदादा, आता तुम्ही वैध दारूविक्री सुरू करायचं ठरवलं, तर त्याला तिथे मोठ्या प्रमाणावर विरोध होईल. दारूबंदी करण्यासाठी सगळे उभे राहतील. कारण अवैध दारूचे कारखानेच मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत’, असंही फडणवीस म्हणाले.

८. शिवजयंतीवरील निर्बंधांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

संत नामदेव महाराज यांचा सरकारला विसर पडला. कोणतेही कार्यक्रम सरकारने घेतले नाही. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. सरकारची वारकरी संप्रदायावर नाराजी का? शिवजयंती आणि मंदिर यामुळेच कोरोना वाढतो का?’, असा सवाल उपस्थित केला.

९. पूजा चव्हाण प्रकरणावरून सरकारवर टीका

पूजा चव्हाण प्रकरणात जितके पुरावे आहेत, तितके पुरावे कोणत्या प्रकरणात नसतील. तक्रार नाही म्हणून केस होत नाही असे कोण सांगते? खटला चालतो तेव्हा तो राज्य विरुद्ध आरोपी असा असतो. मेहबूब शेख केवळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कारवाई नाही. स्वतः डीसीपी बचावासाठी पुढे येतात. इतका पोलिसांवर दबाव’, असा म्हणत शक्ती कायदा.कशाला हवा असा सवाल त्यांनी खडा केला.

१०. परदेशी गुंतवणूकीचा पर्दाफाश 

महाविकास आघाडीच्या दाव्यांवर टिका करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र परदेशी गुंतवणूकीत ४ थ्या क्रमांकावर गेल्याचे निदर्शनास आणून दिले. गुजरात, कर्नाटक, दिल्ली नंतर महाराष्ट्राचा क्रम असल्याचे त्यांनी सांगितले. चीन बदनाम होत असताना त्याचा फायदा महाराष्ट्राने घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Pravinkumar Popat Thokal says

    Na jane konsa nasya karata hai… Corona fund central la… Devul ughada hi yachich bomb…. Devendra Fadnvis v BJP jababdar ahe corona count increase vhayla.

Leave A Reply

Your email address will not be published.