देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये सभा घेतलेल्या ठिकाणी भाजप-जेडीयू उमेदवारांचे काय झाले?

बिहार विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्राशी संबंधित एक बातमी आली. ती होती देवेंद्र फडणवीस यांना बिहारचे प्रभारी बनवल्याची. महाराष्ट्रात सत्ता गमावल्यानंतर फडणवीस यांना पक्षनेतृत्वाकडून बिहारची जबाबदारी देण्यात आली.

यात ते आता कितपत यशस्वी ठरतील हे अंतिम निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईलच पण त्यांनी सभा घेतलेल्या ठिकाणी फडणवीस इफेक्ट झाला का हे पाहू.

बिहारसाठी फडणवीस यांनी  २ महिन्यांपूर्वीच सुरवात केली होती. ११ सप्टेंबरला ते बिहारसाठी रवाना झाले होते. मात्र सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या प्रत्यक्ष प्रचारसभांना मर्यादा असल्यामुळे त्यांनी ऑनलाईन प्रचारावर भर दिला होता. पण प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये म्हणजे १४ ते १८ ऑक्टोंबरला त्यांनी बिहारचा दौरा केला.

त्यानंतर राज्यात अतिवृष्टी झाल्याने त्यांनी दौरा आटोपता घेतल्याचे सांगण्यात आले. आणि नंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुढील प्रचारसभांना जाता आले नाही. मात्र त्या ४ दिवसात त्यांनी मधुबनी, सीतामढी, सीवान, मुंगेर, गया या जिल्ह्यांमध्ये फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या. या ५ जिल्ह्यामध्ये एकूण ३९ जागा येतात.

यात सीतामढी जिल्ह्यातील रीगा, बथनाहा, सुरसंड, रुन्नीसैदपुर, सीतामढ़ी, बाजपट्टी, परिहार, बेलसंड या या ८ जागांपैकी ६ जागांवर भाजप आणि जेडीयूचे उमेदवार पुढे आहेत. तर सुरसंड आणि बेलसंड जागांवर राजद निवडून येण्याची शक्याता आहे.

तर मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी, बेनीपट्टी, बिस्फी, मधुबनी, बाबूबरही, झंझारपुर, खजौली, लौकहा, फुलपरास, राजनगर या १० पैकी ८ जागांवर भाजप आणि जेडीयूचे उमेदवार ६ ते ७ हजार मतांनी पुढे आहेत. तर राजद १ जागेवर पुढे आहे. आणि १ जागा अद्याप तळ्यात मळ्यात आहे.

मुंगेर जिल्ह्यातील मुंगेर, तारापूर, जमालपूर या तीन पैकी १ जागेवर भाजपचा उमेदवार पुढे आहे. तर  १ जागेवर राजद आणि १ जागेवर कॉंग्रेस आघाडीवर आहे.

तर गया जिल्ह्यातील गया शहरी, बेलागंज, अतरी, वजीरगंज, इमामगंज, बाराचट्टी, गुरुआ, बोधगया या ८ जागांपैकी ४ जागांवर एनडीएचे उमदेवार विजयासमीप आहेत. तर २ जागांवर राजद पुढे आहे. तर २ जागा अद्याप तळ्यात मळ्यात आहे.

तर सिवान जिल्ह्यातील सिवान, जीरादेई, दरौली, रघुनाथपुर, दरौंदा, बड़हरिया, गोरियाकोठी या मतदारसंघांमध्ये ८ पैकी ३ जागांवर भाजप आणि जेडीयू आघाडीवर आहेत तर २ जागांवर राजद पुढे आहे. आणि ३ जागा अद्याप तळ्यात मळ्यात आहे.

म्हणजे ज्या ३९ जागांसाठी फडणवीस यांनी प्रत्यक्ष सभा घेतली त्यापैकी २२ ते २४ जागांवर भाजप निवडून येत आहे.

तर एकूणच आज जाहीर होत असलेल्या सगळ्या निवडणुकीचा विचार केला तर यात अंदाजित निकालानुसार एनडीए जवळपास १२९ जागा जिंकत असल्याचे दिसत आहे. बहुमतासाठी १२३ हा जादुई आकडा आहे. यात भाजपला सर्वाधिक ७३ जागा मिळत आहेत.

भाजपच्या विजयात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा कितपत फायदा झाला आहे नक्की माहित नाही मात्र या ऐतिहासिक जागा खेचून आणल्या यात भाजपच्या बिहार मधल्या कार्यकर्त्या नेत्यांबरोबरच बिहार भाजपचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील चांगली कामगिरी केली असंच म्हणावे लागेल यात शंका नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.