संघाच काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुळचे नागपूरचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्मच तिथला. संघाचे मुख्यालय तिथे आहे. सरसंघचालक नागपूरमधून देशभरातील शाखांच्या हजारो स्वयंसेवकाच्या साहाह्याने संघचालवतात. नागपूरच्या मातीत संघाचे संस्कार आहेत अस म्हटल जातं.
देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर राव संघाचं काम आयुष्यभर करत राहिले. त्यांना भाजपने विधानपरिषदेचा आमदारही बनवलं होतं. शोभा फडणवीस म्हणजे देवेन्द्र्जींच्या काकू या देखील ४ वेळा आमदार राहिल्या आहेत.
अशा या राजकीय पार्श्वभूमीमुळे देवेंद्रने ही वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी राजकारणात पाउल टाकले पुढे ते नगरसेवक झाले. चांगलं काम करत राहिले अणि लोकांनी त्यांना वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी महापौर पदी बसवले.
त्यानंतर सलग तीन वेळा आमदार.
एके दिवशी काय झाले. देवेंद्र फडणवीस आपल्या आईला येऊन म्हणाले,
” आई मला संघाचा प्रचारक म्हणून पूर्णवेळ घराबाहेर पडायचे आहे.”
संघाचे प्रचारक हे आयुष्यभर अविवाहित असतात. त्यांनी आपल आयुष्य आपल्या कार्यासाठी वाहून घेतलेलं असत. देवेंद्र यांना देखील देश,देव आणि धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करायचा होता.
देवेंद्र यांच्या आईचे फार लाडके होते, आईला आपलं पोरगं इतक्या लहान वयात आपल्याला सोडून,घरदार सोडून जाणार हा विचारच पचनी पडला नाही. त्यांनी कसं बसं देवेंद्रची समजूत काढली. देवेंद्र पंधरा पंधरा दिवस घरातून बाहेर राहत. लग्नाचा कधी साधा विषय ही काढत नसत.
आईच्या लक्षात आले ह्या पोराच्या पायात संसाराची बेडी पडली की हा स्थिरावेल.
खरंतर राजकारणात यशाच्या पायर्या विक्रमी वेळेत सर करणार देवेंद्र लग्नाच्या बाबतीत बरेच मागे राहिले . वयाची पस्तिशी ओलांडली तरी देवेंद्रने लग्न केलं नाही. खरंतर देवेंद्रला लग्नंच करायचे नव्हते. त्यांना माहित होतं राजकारणातून कुटुंबाला वेळ देता येणार नाही त्यामुळे त्या भानगडीत आपण पडू नये असं त्यांना वाटे .
देवेंद्रच्या आई मात्र स्वस्थ बसल्या नव्हत्या त्या सून शोधण्यात व्यस्त होत्या. एक मुलगी सापडली बॅंकेत काम करायची.
अमृता रानडे तिचे नाव.
नागपुरातले प्रतिष्ठित डॉक्टर शरद रानडे यांची मुलगी. तिने पुण्यातील सिम्बोय्सिस कॉलेज मधून MBA केलं होतं. अमृता नेहमीच मेरीट मध्ये राहिलेल्या विद्यार्थिनी होत्या. आईने देवेंद्रला एकदा अमृताला भेटण्याची गळ घातली. शेवटी देवेंद्र तयार झाले.
पहिल्याच भेटीत देवेंद्र यांनी अमृताला आपल्याला भविष्यात राजकारणात काम करायचे आहे अणि मला संसाराला जास्ती वेळ देता येणार नाही असे स्पष्टचं सांगून टाकले. दोघांनीही परत थोडा वेळ घेतला. मध्ये तीन चार वेळेला ते परत भेटले .
या काळात अमृता देवेंद्रना सर म्हणून हाक मारीत हि सवय लग्न झाल्यावर पण बरेच दिवस होती नंतर त्या त्यांना “देवेन” अशी हाक मारू लागल्या.
देवेंद्र तेव्हा आमदार होते देवेंद्रना भेटण्या आधी अमृतांचे राजकारणी लोक बाबतीतच मत फार काही चांगले नव्हते. अमृता देवेंद्र यांची धावपळ पाहत होत्या. इतकं काम करूनही ह्या माणसाच्या चेहऱ्यावर सदैव एक हास्य असतं हि गोष्ट त्यांना भावली. पुढे मग दोघांची मने जुळली मते जुळली आणि दोघांनी हि लग्न करण्याचा निर्णय घेतला .
अणि मग २००६ साली डिसेंबर महिन्यात वयाच्या ३६ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस लग्न बेडीत अडकले.
त्यांचे लग्न अगदी धूम धडाक्यात झाले. पुढे जाऊन देवेंद्र मुख्यमंत्री झाले अणि या जोडप्याचे जीवनचं बदलून गेले. आज त्यांना एक मुलगी आहे. अमृता आजही बँकेत काम करतात त्याच बरोबर आपली संगीताची आवड हि त्या जोपासतात अनेक कार्यक्रमांमध्ये त्या गाताना दिसतात. त्यांचा अमिताभ बच्चन यांच्या सोबत एक म्युजिक अल्बम देखील आला होता. अनेक शासकीय योजनांच्या प्रमोशनसाठी देखील त्या गाताना दिसतात.
अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरून, त्यांच्या कपड्याच्या स्टाईलवरून, त्यांच्या मुलाखतीवरून देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी बऱ्याचदा टार्गेट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला हे शोभते का असे प्रश्न विचारण्यात आले. पण देवेन्द्र्जी आपल्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
संदर्भ- ‘देवेंद्र फडणवीस’ सुषमा नवलखे
हे ही वाच भिडू.
- अमृतावहिनी हम तुम्हारे साथ है !
- फडणवीसांना पाहताच वाजपेयी म्हणाले, “व्वा व्वा ! क्या स्मार्ट मॉडेल है ये…”
- दस का दम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहा गोष्टी.