फडणवीसांच्या स्ट्रेटजीनं पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम झालायं….
काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणूका पार पडल्या, त्यानंतर सांगली महानगपालिकेची निवडणूक झाली होती. या दोन्ही निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला यश मिळालं. या पाठीमागे मंत्री जयंत पाटील यांची रणनीती यशस्वी ठरली होती. त्यानंतर सगळीकडे जयंत पाटील यांनी भाजपचा कसा करेक्ट केला याच्या पोस्ट फिरत होत्या.
कट टू १२ एप्रिल.
देवेंद्र फडणवीस मंगळवेढ्यात सभा घेत होते. यावेळी त्यांनी या करेक्ट कार्यक्रमचा पुन्हा उल्लेख केला. आणि त्यानुसार आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे.
स्व. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर इथं निवडणूक जाहीर झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालकेंचा मुलगा भगीरथ भालके यांना रिंगणात उतरवलं होतं, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात समाधान आवताडेंचा विजय झाला आहे. यामागे देवेंद्र फडणवीस यांचा ब्रेन आणि त्यांची रणनीती यशस्वी ठरली आहे.
फडणवीसांनी असा केला महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम….
१. पोट निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय :
सर्वसामान्यपणे भाजपकडून मृत्यू झाल्यानंतर जाहीर झालेल्या पोट निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जात नव्हती. यात काही उदाहरण बघायची म्हंटलं तर २०१५ आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावमध्ये भाजपनं उमदेवार दिला नव्हता. तिथून सुमनताई पाटील बिनविरोध निवडून आल्या होत्या.
त्यानंतर २०१८ मध्ये पलूस कडेगावमध्ये काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर निवडणूक जाहीर झाली होती. तिथं देखील भाजपनं आधी उमेदवार दिला आणि शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे ती पोट निवडणूक बिनविरोध झाली होती.
मात्र या निवडणुकीत भाजपनं उमेदवार दिला, आणि मुख्य म्हणजे पूर्ण ताकदीनं प्रचार करून ती प्रतिष्टेची बनवली आणि आता जिंकली देखील.
२. स्थानिक उमेदवाराला तिकीट :
यानंतरचा फडणवीसांचा निर्णय होता तो म्हणजे स्थानिक उमेदवाराला तिकीट देणं. या निवडणुकीत आधी कर्जत जामखेडचे राम शिंदे यांचं नाव चर्चेत होतं. पण भाजपकडून मात्र स्थानिक उमेदवारालाच तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची नाव चर्चेत आली.
३. परिचारिकांना थांबवण्यात यश आणि आवताडेंची साथ :
भाजपकडून प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची नाव चर्चेत होती, मात्र अखेरीस पक्षानं प्रशांत परिचारक यांना समजावण्यात यश मिळवलं. पक्षानं अभ्यास करून आवताडेंची उमेदवारी अंतिम केली. यानंतर परिचर यांच्याकडून बंडखोरी होण्याचा धोका होता, मात्र आमदार परिचारक गटाने समाधान अवताडे यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले.
सोबतच पंढरपुर शहरासह २२ गावांतून मताधिक्य देण्याचा शब्दही पक्षश्रेष्ठींना दिला. परिचारिकांच्या पांडुरंग परिवाराने देखील संपूर्ण ताकतीने आवताडेंचा प्रचार केल्याचं दिसून आलं. या सगळ्याचा फायदा आज भाजपला झालेला दिसत आहे.
४. फडणवीसांनी एका दिवसांच्या सभांनी मतदारसंघातील वातावरण बदलवलं
एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात तब्बल ५ दिवस तळ ठोकून संपूर्ण निवडणुकीची गोळाबेरीज केली, जयंत पाटील हे देखील सातत्यानं या ठिकाणी प्रचारासाठी येत होते, शिवसेना, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या नेत्यांकडून देखील भगीरथ भालकेंचा प्रचार करण्यात आला.
त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत ही निवडणूक राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्याकडे एकतर्फी झुकल्याचे चित्र होते. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एक दिवसाच्या दौऱ्यामुळे मतदारसंघातील संपूर्ण वातावरण बदल. त्यांनी १२ एप्रिल या एका दिवसात तब्बल ६ ठिकाणी सभा घेऊन भाजपला पुन्हा आघाडी मिळवून दिली.
५. प्रचारातील महत्वाचे मुद्दे
१. ३५ गावांचा प्रश्न कळीचा मुद्दा :
पंढरपूर मंगळवेढामध्ये प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा मुद्दा ठरतो तो मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न. याआधी भारत भालके यांनी ३ निवडणूक जिंकूनही हा प्रश्न सुटला नव्हता. नेमका तोच प्रश्न फडणवीस यांनी कळीचा बनवला. तालुक्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नेतृत्व पाणी देऊ शकला नाही हा प्रचार लोकांपर्यंत पोहचवण्यात भाजप यशस्वी ठरला.
त्यात पुन्हा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या भागाला पाणी देवू असे सांगितले.
मात्र याचवेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या भागात येवून केंद्र सरकारच्या निधीतून पुढील तीन वर्षात ही अपूर्ण योजना पूर्ण करु असे वचन दिले. हि गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडली.
२. कोरोनाबद्दल सरकार विरोधी वातावरण तयार करण्यात यशस्वी :
महाराष्ट्रातील बिघडलेली कोरोनाच्या परिस्थितीचे नकारात्मक चित्र उभं करण्यात फडणवीस यशस्वी झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यूही होत आहेत हे लोकांना पटवून देण्यात आलं. तसचं कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला हा मुद्दा देखील प्रचारात चांगलाच गाजला.
३. वीज कनेक्शन
ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून वीज बिन न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरु झाली. त्याच प्रमाणे या तालुक्यांमध्ये देखील वीज तोडणी झाली. हाच मुद्दा फडणवीस यांनी प्रचारात वापरला. एखाद्या गावात पाच लोकांनी वीज बिल भरले नाही, तर त्या गावचा ट्रान्सफार्मर काढला जात असून गावांना अंधारात लोटले जात आहे हे फडणवीसांनी लोकांपर्यंत पोहचवलं. यातून सरकार शेतकरी विरोधी असल्याचा मेसेज गेला.
यासोबतच मंगळवेढामार्गे प्रस्तावित असलेला पंढरपूर ते विजापूर रेल्वेमार्ग, बसवेश्वरांचे नियोजित स्मारक, या भागातील ज्वारीला राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न असे मुद्दे देखील भाजपकडून प्रचारात मांडण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी एका दिवसात केलेला हा सगळा प्रचार भाजपच्या पथ्यावर पडला असून भाजपचे समाधान आवताडे तब्बल ७ हजार ५०० मतांनी विजयी झाले आहेत.
हे हि वाच भिडू.
- महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि पंढरपूर-मंगळवेढा दुसरा न्याय असं कसं चालेल
- गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री घरात बसून राहिले तर फडणवीसांनी महाराष्ट्र पिंजून काढला..
- फडणवीसांनी आत्तापर्यन्त महाविकास आघाडीच्या दोन विकेटा पाडल्यात…