एक काळ असा होता जेव्हा नीरज गुंडेला शिवसेना-भाजप युतीच शिल्पकार म्हंटल जायचं.

आज सकाळपासूनच नीरज गुंडे नावाचं व्यक्तिमत्व चर्चेत आहे. कारण आहे नवाब मालिकांचे आरोप. मलिक म्हणतायत,

देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली. निरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतोय. गुंडेच्या माध्यमातूनच देवेंद्र फडणवीस यांचं मायाजाल चालायचं.

हे झाले नवाब मलिकांचे आरोप, यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली बाजू मांडत म्हंटल, नीरज गुंडे यांच्याशी आमचा १०० टक्के संबंध आहे. पण मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलोय, त्यापेक्षा जास्त वेळा गुंडे ‘मातोश्री’वर गेलेत. कदाचित माझ्या आधीपासून उद्धव ठाकरे व नीरज गुंडे यांचे संबंध आहेत.

कदाचित याचवरुन की काय, एक काळ असा होता जेव्हा नीरज गुंडेला शिवसेना-भाजप युतीच शिल्पकार म्हंटल जायचं. 

हे नीरज गुंडे म्हणजे राजकारणात फारसा प्रकाशझोतात नसलेला चेहरा, पण चर्चेच्या खलबतांमध्ये पडद्याआड सूत्र हलवणारे म्हणून त्यांची ओळख राजकीय वर्तुळात आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतील महापौर निवासाची जागा हस्तांतरण कार्यक्रमावेळी फडणवीस-ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चेवेळी उपस्थित राहिल्याने गुंडे पहिल्यांदा चर्चेत आले होते.

भाजप आणि शिवसेना २०१९ पासून एकमेकांपासून दुरावली असली तर नैसर्गिक हिंदुत्वाच्या विचारधारेवर एकत्र असणारे दोन्ही पक्ष ३० वर्षे एकत्र नांदत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेना सत्तेत आणि युतीत मोठा भाऊच राहीला होता.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या मधील दुवा म्हणुन कधी काळी प्रमोद महाजनांनी काम केलं होतं. २०१३ मध्ये उध्दव ठाकरेंनी शिवसेनेचं अध्यक्षपद स्विकारलं. २०१४ च्या सत्ताकारणात जागावाटपापासून सत्तेचा सारीपाट उभारण्यापर्यंत भाजप आणि मातोश्रीमधे असाच एक दुवा तयार झाला होता.

चेंबूरचे अभियंता असलेले निरज गुंडे हे सेना-भाजपमधील दुवा होते.

मुंबईतील चेंबूर परीसरात राहणारे निरज गुंडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यामधे मोठ्या पदांवर कामाचा अनुभव असलेल्या गुंडेंचा सध्या केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही उठबस असते. ठाकरे- फडणवीस भेटीचे सुत्रधार ते जागावाटप आणि सत्तास्थापनेपर्यंत गुंडेंचा सहभाग होता असे सांगितले जाते. मातोश्रीशी जवळीक असलेले निरज गु्ंडेंना मातोश्रीवर थेट प्रवेश होता.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती तुटल्याची घोषणा केली होती. त्यावेळी भाजपला १२२, तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती केली. शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली, तरी त्यांची भूमिका विरोधी पक्षासारखी दिसली. भाजप-शिवसेना युतीची बोलणी होण्यासाठी नीरज गुंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुंडेचा वावर नेहमीच हायप्रोफाईल वर्तुळात असतो.

गुंडे शेवटच्या वेळी प्रकाशझोतात आले होते ते वर्ष होतं २०१५.

ललित मोदींच्या गैरवर्तनादरम्यान बीसीसीआयचे तत्कालीन सचिव अनुराग ठाकूर यांची कथित बुकींसह छायाचित्रे समोर आली होती. ठाकूर यांनी तेव्हा आरोप केला होता की गुंडे हे लीकच्या मागे होते आणि ते माजी बोर्ड अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या सांगण्यावरून बदनामी करत आहेत. ठाकूरच्या आरोपानं गुंडे अस्वस्थ होते. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन हे प्रकरण थंड झाल्याचं सांगितले जाते.

भाजपमधील वादग्रस्त नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी सुद्धा नीरज गुंडेंचे घनिष्ठ संबध आहेत.

स्वामी पहिल्यांदा मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत नीरज गुंडेही होते. ही त्यांची मातोश्रीवरील पहिली भेट. त्यानंतर ते अनेक वेळा मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपाध्यक्ष अमित शाह, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याची घोषणा केली होती. या युतीमागे ही नीरज गुंडे यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. पण नंतर काय झालं ते सर्वांनाच माहित आहे.

हे नीरज गुंडे स्वतःला भ्रष्टाचार विरोधातील क्रुसेडर व्हिसल ब्लोअर म्हणतात, आणि त्याचमुळं ते महाविकास आघाडीच्या मागे हात धुवून लागले असल्याचं दिसत. भविष्यात राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे कधीच कोणाला माहित नसतं, अगदी त्याचप्रमाणे आता नीरज गुंडेंवरच महाविकास आघाडीतल्या नवाब मालिकांनी  आरोप केलाय की,

युती सरकारच्या काळात नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीसांचा दूत म्हणून काम करायचा. पोलिसांच्या बदल्यापासून ते सर्व सरकारी कामं मार्गी लावण्यात त्याची भूमिका होती. 

Leave A Reply

Your email address will not be published.