पिक्चर हिट असो फ्लॉप, देवेन वर्मा हे बॉलिवूडमध्ये कॉमेडीचे वस्ताद म्हणून ओळखले जायचे….

बॉलिवूडमध्ये आजच्या काळात कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता आणि रटाळ काहीतरी दाखवण्याचा ट्रेंडच आला आहे जो आपल्याला बऱ्याच सिनेमांमधून दिसलाच असेल. पण एक काळ असा होता जेव्हा अश्लीलता आणि कॉमेडी यांचा काहीच संबंध नव्हता, निखळ विनोद प्रेक्षकांसमोर सादर केला जायचा. हिंदी सिनेमाचा जेव्हा कॉमेडीचा विषय निघतो तेव्हा काही कॉमेडियन लोकांची नावं चटकन जिभेवर येतात त्यापैकीच एक म्हणजे देवेन वर्मा.

देवेन वर्मा यांना अंगुर बहादूर या रुपात लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं होतं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तीन वेळा त्यांनी फिल्मफेअर पटकावला होता. तर जाणून घेऊया देवेन वर्मा यांचा फिल्मी सफर.

23 ऑक्टोबर 1937 रोजी गुजरात मध्ये देवेन वर्मा यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा चांदीचा व्यवसाय होता. कॉलेज काळात देवेन स्टेज शो करू लागले होते. सेन्स ऑफ ह्युमर आणि मिमिक्री यात देवेन यांची हातोटी होती. हेच प्रकरण त्यांना अभिनयाची दारं उघडी करून देणार होतं याची त्यांना साधी कल्पनाही नव्हती. एका शो मध्ये बी आर चोप्रा यांना देवेन यांचं काम फार आवडलं आणि त्यांनी जागेवरच धर्मपुत्र या सिनेमासाठी देवेन यांना साइन केलं. एक महिना काम करून त्यांना 600 रुपये मिळाले होते.

हा सिनेमा भले फ्लॉप ठरला पण देवेन वर्मा यांना भरपूर काम मिळायला सुरवात झाली. 1975 साली आलेली चोरी मेरा काम सिनेमात त्यांनी जे काम केलं त्यामुळे कामांची त्यांच्याकडे रांग लागली. बॉलिवूडमध्ये देवेन वर्मा यांची एक खासियत होती की ते नाही म्हणायला कचरत असे आणि सुंदर काम करून जायचे.

एकाचवेळी 16 सिनेमे साइन करण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे.

खरी प्रसिद्धी देवेन वर्माना मिळाली ती गुलजार यांच्या अंगुर या सिनेमातून. या सिनेमात देवेन वर्मा संजीव कुमारचा नोकर बहादूरच्या डबल रोलमध्ये झळकले होते. या सिनेमात त्यांनी असं पात्र उभं केलं होतं की पोट धरून लोकं हसायचे. या सिनेमानंतर देवेन वर्मा यांनी देवर,अनुपम,चोर के घर चोर, बेशरम, भोला भला, लोक परलोक आणि गोलमाल अशा 70 च्या दशकातल्या हिट सिनेमांमध्ये काम केलं. त्या काळातले ते एकमेव कॉमेडियन होते ज्यांची सगळ्यात जास्त डिमांड होती. 3 फिल्मफेअर त्यांनी पटकावले होते.

भारतातला सर्वात कॉमेडी समजल्या जाणाऱ्या अंदाज अपना अपना मध्ये त्यांनी आमिर खानच्या वडिलांची भूमिका केली होती. या सिनेमात अनेक कलाकार असूनही देवेन वर्मा मात्र आपल्या हमखास लक्षात राहतात.

अशोक कुमार यांची मुलगी रुपासोबत त्यांनी लग्न केलं. 47 वर्षे ते बॉलिवूडमध्ये काम करत होते. शेवटचा त्यांनी केलेला सिनेमा म्हणजे मेरे यार की शादी है. 2 डिसेंबर 2014 साली देवेन वर्मा यांचं निधन झालं पण बॉलिवूडचा कॉमेडीचा वस्ताद म्हणून त्यांची ओळख कायम राहील.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.