करोडपती राहतात पण गावात एकही पक्कं घर नाही…

प्रत्येकाचं स्वप्न असतं की, आपलं स्वत: च घर असावं. त्या घरापुढे चांगली बाग, घरात फर्नीचर, मस्त मोठं टेरेस, गॅलरी असावी, पण पैसैअभावी अनेकांची स्वप्न अर्धवट राहतात. पण राजस्थानातल्या अजमेरमधलं एक गाव याला अपवाद आहे.

स्टोरीतला फोटो बघून तुम्हालाही पटणार नाही,पण अजमेर मधल्या या देवमाली गावात बरेच करोडपती आहे पण तरीसुद्धा ती कच्च्या घरात राहतात. तशा घरात सगळ्या आधुनिक सोयी – सुविधा आणि पैसा आहे. पण बाहेरून घरं बघालं तर मातीची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावातल्या एकाही घराला कुलूप नसतं. 

असं म्हटलं जातं की, गेल्या पाच दशकात एकाही घरात चोरी झाली नाही, एवढचं नाही तर पोलिस ठाण्यात साधी तक्रार सुद्धा दाखल झालेली नाही. आता एवढं चांगलं गाव म्हटल्यावर त्याला आदर्श पुरस्कार मिळालाच पाहिजे असं तुमच्या डोक्यात येईल. पण भिडू एवढंच नाही या गावात आणखीन बऱ्याच गोष्टी इंट्रेस्टिंग आहेत.

म्हणजे अख्खच्या अख्खा गाव शाकाहारी आहे. गावकरी सकाळी गावातला सगळा डोंगर अनवाणी फिरतात. या टेकडीवर देवनारायणाचे मंदिर आहे. ग्रामस्थांची भगवान देवनारायण यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. 

गाव म्हणजे 300 कुटुंबांची वस्ती. लोकसंख्या 2000 च्या आसपास आहे. आणि सगळ्या गावात एकाच गोत्राचे लोक राहतात, त्यामुळे ते भगवान देवनारायणाची पूजा करतात.

आता गावात पक्क्या छताचे एकही घर नाही, यामागचं कारण तर जाणून घ्यायलाचं पाहिजे. तर गावकर यांच्या म्हणण्यानुसार पक्के छत बांधलं तर गावात आपत्ती येऊ शकते.

कारण देवनारायण जेव्हा या गावात आले तेव्हा त्यांना गावकऱ्यांच्या सेवाभावनेने खूप आनंद झाला. त्यांनी गावकऱ्यांना वरदान मागायला सांगितल्यावर गावकऱ्यांनी काही मागितले नाही. त्यावर देवनारायण म्हणाले की, तुम्हाला गावात शांतता हवी असेल तर पक्के छत असलेले घर बांधू नका.

आणि गावकरी आजही या आज्ञेचे पालन करतात. अनेक दशके उलटली, पण देवमाळी गावात एकही गच्चीचं घर नाही. घरात टीव्ही, फ्रीज, कुलर, महागडी आलिशान गाड्या आहेत, बरीच जणं करोडपती सुद्धा आहेत पण सुद्धा कच्च्या घरात राहतात.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेकांनी पक्की छत टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्याचा फटका सहन करावा लागला. तेव्हापासून अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने ग्रामस्थ पक्के छत बांधत नाहीत. दारू, मांस आणि अंडी पासून गावकरी लांबचं आहेत, पण साधा सिमेंट-चुन्याला सुद्धा हात लावत नाहीत. तसचं गावात वीज गेल्यावर रॉकेलचा वापर केला जात नाही. तिळाच्या तेलाने दिवे लावले जातात.

एवढचं नाही तर गावात पाण्याच्या टाक्या सुद्धा बनवत नाही, गावकरी ल फक्त प्लास्टिकच्या डब्यात पाणी साठवतात. ग्रामस्थांकडे एक इंचही जमीन नाही. गावातील सर्व जमीन भगवान देवनारायण यांच्याकडे आहे. पशुपालनातूनच इथले जीवन जगत आहे. याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा. मात्र गावकऱ्यांच्या या श्रद्धेने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. हे गाव पहायला देश-विदेशातून मंडळी येत असतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.