या पवारांमुळे नेहरू पॅड बांधून ओपनिंग बॅट्समन झाले…

पवार आणि क्रिकेट हे गणित काय नवीन नाही. शरद पवारांनी आधी मुंबई क्रिकेट, नंतर बीसीसीआय आणि पुढे आयसीसी हातात घेतली. क्रिकेटमध्ये पैसा आणि प्रसिद्धी आणण्याचं जितकं श्रेय जगनमोहन दालमियांना जातं तितकंच शरद पवारांनाही. विशेष म्हणजे शरद पवार हे क्रिकेट गाजवणारे एकटे पवार नाहीत. त्यांच्याही आधी एका पवारांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं.

त्यांनी ना हजारो रन्स केले, ना पाचशे विकेट्स घेतल्या, पण भारतात क्रिकेट रुजवण्यासाठी मोलाचं काम केलं. इतकंच काय त्यांनी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना, त्यांना पॅड बांधून क्रिकेट खेळायला उतरवलं होतं!

धैर्यशीलराव यशवंतराव पवार, हे सुरगाणा प्रांताचे देशमुख आणि राज्यसभेचे माजी खासदार. त्यांनी क्रिकेटला राजकारणाशी जोडलंच, पण नाशिक जिल्हा क्रिकेटसाठीही मोलाचं योगदान दिलं.

आता धैर्यशीलरावांच्या पवार घराण्याबद्दल थोडं सांगतो.

पवार संस्थानिक मूळचे माळव्यातील परमारवंशीय. एका नोंदीनुसार या घराण्याची वंशवेल अगदी उज्जैनचा सम्राट विक्रमादित्यापर्यंत पोहोचते. अनेक वर्षांचा दुष्काळ व अस्थिर राजकीय परिस्थिती यामुळं त्यातली काही कुटुंबं गुजरातमधल्या लाट प्रदेशात स्थायिक झाली. त्यांनी सुरतच्या दुसऱ्या लुटीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हातगड किल्ल्याजवळचा मार्ग दाखवून मदत केली होती. साल्हेरच्या १६७१ च्या युद्धावेळीही त्यांनी मार्था सैन्याला मदत केली. त्यामुळं छत्रपती शिवरायांनी त्यांना साल्हेर व हातगडाची देशमुखी दिली.

या घराण्याचा प्रसिद्ध मोतीबाग राजवाडा हा अजूनही सुरगाण्यात आहे. या घराण्यात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, यशवंतराव पवारांनी पानिपतच्या युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता. त्या पराक्रमाची दखल घेत पेशव्यांच्या दरबारात त्यांना मानाचं कडं दिलं गेलं होतं.

ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या मल्हारराव पवार यांना ब्रिटिशांनी भदर इथं फाशी दिली. तरीही कच न खाता त्यांचे बंधू भिकाजी पवार यांनी १८२० मध्ये ब्रिटिश सत्ता उलथवून सुरगाणा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, १८५७ साली राजा रवीराव पवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. पुढं या घराण्यात शंकरराव, प्रतापराव, यशवंतराव आणि धैर्यशीलराव असे राजे झाले. पवार घराण्याची सोयरिक सातारच्या राजघराण्यासोबतच बडोदा, ग्वाल्हेर, कोल्हापूर या संस्थानिकांशीसुद्धा आहे.

धैर्यशीलराव हे १९५२ ते १९६८ आणि १९७२ ते १९७८ अशा कार्यकाळात राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्या पुढाकारानं राज्यसभा विरुद्ध लोकसभा अशा क्रिकेटच्या प्रदर्शनीय सामन्यांना सुरुवात झाली. संसदेत आजही लोकसभा आणि राज्यसभा असे क्रिकेट संघ आहेत.

धैर्यशीलराव राज्यसभेचे खासदार असताना त्यांनी प्राईम मिनिस्टर्स प्रीमिअर लीग खेळवली. त्यात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनीही खेळावं असा आग्रह त्यांनी केला. त्यांच्या आग्रहाला मान देत नेहरू मैदानावर उतरले आणि त्यांनी ओपनिंग बॅटिंगही केली.

धैर्यशीलरावांच्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करताना शरद पवार यांनी या आठवणी जागवल्या होत्या. ते म्हणाले होते, ‘जेव्हा ओपनिंग बॅट्समन बॅटिंगसाठी उतरले तेव्हा त्यातील एक बॅट्समन धैर्यशीलराव पवार होते आणि दुसरे बॅट्समन हाेते पंतप्रधान पंडित नेहरू.’

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची स्थापनाही धैर्यशीलरावांच्या नेतृत्वातच झाली. त्यामुळं महाराष्ट्रातल्या क्रिकेटचा परीघ पुण्याच्या पलीकडे विस्तारण्यात मदत झाली.

क्रिकेटसोबतच शिक्षणक्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धैर्यशीलरावांच्या जीवनाची अखेर मात्र अत्यंत दुर्दैवी झाली. आपला ८१ वा वाढदिवस साजरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी बंगल्यात लागलेल्या आगीत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

हे वाचताना तुमच्या डोक्यात आणखी एक गोष्ट आली असेल, ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटप्रेमी होते का? आता जाऊन गूगल करत बसू नका. भिडूनं सगळं लिहून ठेवलेलं असतंय. खालच्या वाक्यावर क्लिक करा आणि क्रिकेटर नेहरूंबद्दल वाचा.

पंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरले होते !

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.