वेळप्रसंगी बहुजन समाजासाठी मोठ्या नेत्यांशी लढण्याची परंपरा हा माने घराण्याचा इतिहास आहे.

आज कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी सुरु असलेल्या या आंदोलनात राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. पावसाची संततधार असतानाही आंदोलनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या ‘मूक आंदोलनात’ भर पावसात संभाजी राजेंच्या सोबत वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.

या लोकप्रतिनिधींच्या गर्दीत एक तरुण चेहरा मात्र उठून दिसत होता. त्यांच्या हाताला सलाईन लावलेलं असूनही त्यांनी त्या अवस्थेत भर पावसात आंदोलनात सहभागी घेतला होता. हे तरुण नेते म्हणजे हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने.

गेल्या वर्षी हातकणंगले भागात आलेला महापूर असो किंवा सध्या सुरु असलेलं कोरोनाच संकट धैर्यशील माने जनतेच्या कार्यासाठी तळागाळात उतरताना दिसतात. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी आपल्या भागातील जनतेसाठी राहतं घर खाली करून दिलं होतं.

मागच्या महिन्यात धैर्यशील माने यांना स्वतःला कोरोनाची लागण झाली होती. १० दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रकृती नाजूक असतानाही ते सलाईन लावून सहभागी झाले याबद्दल त्यांचं राज्यभरातून कौतुक केलं जात आहे. या वेळी केलेल्या भाषणात माने म्हणाले,

“महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन”

धैर्यशील मानेच नाही तर त्यांच्या माने घराण्यात बहुजन समाजासाठी मुख्यमंत्र्यांना देखील अंगावर घेण्याचा मोठा इतिहास आहे.

धैर्यशील माने यांचे आजोबा स्व.बाळासाहेब माने यांना कोल्हापूर जिल्ह्याची धडाडती तोफ म्हणून ओळखलं जायचं. ते हातकणंगले मतदारसंघाचे पाच वेळचे खासदार. बाळासाहेब काँग्रेस मध्ये होते मात्र प्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी पक्षातल्या नेत्यांशी संघर्ष करायला ते मागे पुढे पाहायचे नाहीत.

त्याकाळात कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट होते. एक होता जिल्हाध्यक्ष मल्लाप्पा श्रेष्टींचा गट तर दुसरा देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचा गट. रत्नाप्पा कुंभार यांना राज्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून ओळखलं जायचं. यशवंतरावांच्या विरोधात असणाऱ्या रत्नाप्पा कुंभार यांचे पंख कापण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सहकार सम्राटांची माळच उभी करण्यात आली होती.

राजाराम उर्फ बाळासाहेब माने यांचा करवीर संस्थानातील रुकडी या छोट्याशा गावी एका शेतकरी कुटूंबात जन्म झाला. त्यांचं शिक्षण कोल्हापुरात विद्यापीठ हायस्कुल येथे झाले. शाहू महाराजांचे समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर झाले. माधवराव बागल व इतर नेत्यांनी कोल्हापुरात रुजवलेली बहुजन हिताची मशाल त्यांनी आपल्या हाती घेतली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ रेशनिंग ऑफिसर म्हणून देखील काम केलं होतं. मात्र लवकरच गावच्या लोकांच्या आग्रहामुळे ते सक्रिय राजकारणात उतरले आणि गावचे सरपंच बनले. हातकणंगले पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांचं कार्य गाजलं. ते कोल्हापूर काँग्रेसच्या गटातटापासून दूर होते, तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संबंध होता. पुढे ते दोन वेळा जिल्हापरिषदेचे अध्यक्ष देखील झाले.

त्याकाळी दत्ताजीराव कदम इचलकरंजी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार होते. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांचे ते जवळचे सहकारी होते. पण मोठ्या नेत्यांच्यात वाद झाले तेव्हा कोणालाही दुखवायचे नाही म्हणून दत्ताजीराव कदमांनी ७७ च्या निवडणुकीत तिकीट नाकारलं. त्यांच्या ऐवजी बाळासाहेब माने यांना काँग्रेस कडून खासदारकीचं तिकीट जाहीर झालं. बाळासाहेब माने हे दत्ताजीराव कदमांना मानायचे.  

पुढे काँग्रेसमध्ये अनेक बदल घडत होते. पक्ष फुटला, शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसत आपला वेगळा पक्ष बनवला. यशवंतराव चव्हाणांना मानणारे अनेक नेते या पक्षात सामील झाले. बाळासाहेब मानेंनी मात्र काँग्रेस सोडली नाही. पुढे ते सर्व नेते एक एक करून काँग्रेस मध्ये परतले.

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना एकदा हातकणंगले इथल्या कुंभोजगिरी या जैन तीर्थक्षेत्रावरून मोठे वाद झाले होते. त्याकाळचे इचलकरंजीचे मोठे नेते कल्लाप्पा आवाडे यांनी दादांकडे आग्रह धरून कुंभोजगिरीला अहिंसा क्षेत्र जाहीर करायला लावलं होतं. त्यामुळे त्या भागातील सर्वसामान्य घरातील व्यक्तींना मांसाहार करण्यास बंदी आली.

बाळासाहेब मानेंनी याविरोधात आवाज उठवला. त्यांनी जाहीर भाषणात ग्रामीण भाषेत टीका केली. हि टीका प्रचंड गाजली. बाळासाहेब माने यांच्या भाषणाने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलंय अशी हूल विरोधकांनी उठवली.

कोल्हापुरचे खासदार उदयसिंहराव गायकवाड त्यांना म्हणाले देखील,

बाळासाहेब, जिभेची धार थोडीशी कमी करा. तिखटपणा काढून टाका. एवढं कडक बोलणं माणसांना रुचत नाही. अशानं शत्रू तयार होतात.

पण बाळासाहेब माने मागे हटणाऱ्यातले नव्हते. जनतेच्या प्रश्नांपुढे त्यांना कधीच खासदारकी महत्वाची वाटली नाही. आपल्या लोकांसाठी पद पणाला लावणारा हा नेता होता.

१९८४ सालच्या लोकसभा निवडणुका आल्या. काँग्रेस तर्फे बाळासाहेब माने यांना तिकीट मिळालं. त्यांच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे उभे होते. काँग्रेसच्याच काही स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेब मानेंच्या विरोधात प्रचार केला. यावेळी मानेंचा पराभव होणार असं बोललं गेलं.  पक्षाची हक्काची कित्येक गावे फक्त बाळासाहेब माने याना मतदान करणार नाही असं म्हणू लागली.

मात्र कितीही बिकट परिस्थिती असली तरी बाळासाहेब मानेंनी आपल्या वक्तृत्वाच्या जीवावर निवडणूक फिरवली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं असं बोललं गेलं होतं काट्याच्या लढतीत त्यांनी अगदी थोडक्या मतांनी विजय मिळवला.

बाळासाहेब मानेंच्या घराण्याने हा जहालपणा आजही टिकवून ठेवला आहे. त्यांच्या स्नुषा निवेदिता माने यांनी आपल्या हक्काच्या मतदारसंघासाठी लढा दिला. पुढे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून त्यांनी खासदारकी देखील जिंकली. २००९ साली त्यांचा राजू शेट्टी यांनी पराभव केला होता. यावेळी अशी चर्चा झाली कि माने कुटूंबियांचं राजकारण संपलं.

याच गैरसमजातून २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी त्यांची जागा काँग्रेसला दिली. या अन्यायामुळे अखेर माने कुटूंबाने शिवसेनेत प्रवेश केला.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्या सारख्या दिग्गज शेतकरी नेत्याचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.