बहीण-भावाचं नातं संपलं त्यामागे नेमकं कोणतं राजकारण कारणीभूत ठरलं ?

“EVERYTHING IS FAIR IN LOVE AND WAR”

म्हणजेच प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं म्हणतात. युद्ध कशासाठी ? थोडक्यात सत्तेसाठी. कधी लपून तर कधी उघडपणे युद्धाची प्रक्रिया अविरत चालूच असते. युद्धाचा एकमेव धर्म म्हणजे काहीही करून जिंकायचं..

प्रेमाविषयी काय बोलू? कारण आज ज्या नात्याबद्दल आपण बोलतोय त्यात नातं, नात्यातील प्रेम हरलं आणि राजकारण जिंकलं…एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल राजकारणातली बहीण -भावाची जोडी. 

बहीण भावाची जोडी म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे !

दोघांमधलं राजकीय वैर आपण पाहतच आलोत मात्र विरोधकांनाही असं वाटत असेल कि राजकीय वैर बाजूला ठेवून हे दोन्ही नेते आपलं बहिण-भावाचं नातं कधीच संपुष्टात येऊ देणार नाहीत. हा समज खोडून काढत धनंजय मुंडे यांनी,  “आमचं नातं आता बहीण-भावाचं राहिलेलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंधं आधी होते, नात्यातून राजकारणात वैर निर्माण झालं” असं विधान करत त्यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्याची जाहीरपणे कबुली दिलीय. तर त्यावर पंकजा मुंडे यांनी, “रक्ताचं नातं कधी संपत नाही” अशी प्रतिक्रिया दिली.  

या विधानांमुळे राज्यातल्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली ते या बहीण-भावाची.अशी विधानं तेंव्हाच येतायेत जेंव्हा पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केले जातेय. असो  

बहीण-भावाचं नातं संपलं त्यामागे नेमकं कोणतं राजकारण कारणीभूत ठरलं ? त्याचा घटनाक्रम बघूया..

  • २००७

२००७ मध्ये धनंजय मुंडेंनी राजकारणात एंट्री घेतली ती विद्यार्थी राजकारणातून. विद्यार्थी आघाडी प्रमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद, सरचिटणीस आणि अध्यक्षपद ही संघटनेतील पदे त्यांनी मिळवली.  धनंजय उत्तम वक्ते आहेत त्याचा फायदा त्यांना राजकारणात होतच गेला. जिल्हापरिषद सदस्य, जिल्हा परिषद गटनेते, जि.प. उपाध्यक्ष आणि त्यानंतर विधानपरिषद सदस्य ही प्रत्येक पदे त्यांना मिळत गेली. सोबतच आपले काका गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे व विश्वासू म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिले जात होते.

वडील पंडितराव मुंडे यांच्यासोबत धनंजय यांना गोपीनाथ यांच्या परळी मतदारसंघाचे पालनपोषण आणि बीड जिल्ह्यातील कुटुंबाचे राजकीय हितसंबंध सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी धनंजय यांच्याकडेच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात होते.

  • २००९

कौटुंबिक राजकीय संघर्षाची सुरुवात याच २००९ मध्ये झाली. त्याला कारण ठरलं धनंजय यांच्याकडे  राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात असतानाच गोपीनाथ मुंडेंनी यांनी परळीचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पंकजा यांची निवड केली तेव्हा काका आणि पुतण्या यांच्यातील संबंध बिघडले. आपल्या वडिलांचा राजकीय वारस म्हणून पंकजा यांना निवडल्यामुळे पंकजा आणि धनंजय यांच्यात असंतोषाची बीजे पेरली गेली. 

  • २०१० जानेवारी 

नाराज असलेल्या धनंजय यांना राज्य विधानपरिषदेचे सदस्य बनवून भाजपने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात सगळं काही आलबेल नव्हतंच. धनंजय आपल्या काकांपासून आणि पक्षापासून दुरावत चालले.

  • २०११ डिसेंबर 

यादरम्यान बीड च्या परळीची नगरपालिका निवडणूक गाजली ती धनंजय मुंडेंच्या बंडामुळे. काका श्रेष्ठ की पुतण्या, याचा फैसला या निवडणुकीत झाला. परळी वैजनाथ इथे नगराध्यक्षपदावर एका अपक्ष उमेदवाराला निवडून आणून गोपीनाथ मुंडेंना जबर हादरा दिला होता.  आपल्या काकांच्या विरोधाला न जुमानता धनंजय यांनी आपल्या समर्थकांपैकी एकाला नगर परिषद अध्यक्ष बनवण्याचा आग्रह धरला होता. पण भाजप नेतृत्वाने गोपीनाथ मुंडेंची बाजू घेतली.  मग ११ विजयी उमेदवारांनी धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात स्वतंत्र गट स्थापन केला आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवाराचे नगराध्यक्षपदी निवड केली

  • २०१२ 

धनंजय यांचे वडील आणि गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधु व तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश यादरम्याची सर्वात मोठी घटना ठरली. पंडितअण्णा मुंडे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जानेवारी २०१२ मध्ये राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला, कार्यक्रमाला भाजपचे आमदार भाजपचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजपचे १११ नगरसेवकही उपस्थित होते पण त्यांनी त्या वेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नाही. 

  • २०१३ 

राजकारणात तरुण कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा स्वाभाविकपणे वाढत जातात आणि मग त्यांना रोखणे ज्येष्ठांना अवघड होऊन बसते. हेच गोपीनाथ धनंजय आणि धनंजय यांच्यासोबत झालं. धनंजय नाराज होते मात्र त्यांची नाराजी गोपीनाथ मुंडेंना दूर करता आली नाही.  बीड जिल्ह्यातील भाजपचे वर्चस्व नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आधीच टपून होते. काका-पुतण्याच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादीला झाला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे,

धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा देत भाजप सोडून जुलै २०१३ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करताच राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेच सदस्य बनवलं.

धनंजय मुंडे यांनी काकांच्याच मार्गदर्शनाखाली राजकीय कारकीर्द सुरू केली आणि त्यांच्यामुळेच ते राजकारणाची एक-एक पायरी चढत गेले त्याच काकांची साथ सोडली.

तेंव्हा गोपीनाथ मुंडेंनी विधान केलेलं कि, “मी ज्यांना मोठं केलं तेच माझ्यावर उलटले. माझ्याच माणसांनी माझ्या डोक्यात धोंडा घातला. तो आता दुसऱ्यांचा काय होणार “?  

  • २०१४ 

गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर राजकीय वारशावरून झालेल्या भांडणातून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंडे विरुद्ध मुंडे थेट संघर्ष झाला. धनंजय यांचा २५ हजार मतांनी पराभव करत पंकजा जिंकून आल्या त्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मिळालं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर पाठवलं आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते बनवले. 

  • २०१९

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, धनंजय यांनी २८ हजार पेक्षा जास्त मतांनी परळी जिंकून आपल्या चुलत बहीण पंकजा यांना हरवलं. बीडमध्ये धनंजय मुंडेंची ताकद वाढल्याने आणि दुसरीकडे स्वतःला मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून सादर केल्याने राज्य भाजपच्या अंतर्गत सत्ता संघर्षाचा परिणाम म्हणजे पंकजा यांचा पराभव ठरला.  असंही बोललं गेलं कि, धनंजय यांना राज्यातील भाजपच्या एका गटाचा छुपा पाठिंबा होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातही सत्तांतर झालं, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.. आणि धनंजय मुंडे यांच्याकडे मंत्रिपदासोबतच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले.

आणि अशा पद्धतीने बहीण-भावाचं नातं संपत राजकीय वैर तयार झालं. पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद आता नवीन राहिलेला नाही. या आधी देखील दोघांनी एकमेकांवर अनेकदा टीका केलीय, गंहीर आरोप केले मात्र आत्ताचं “आमचं नातं आता बहीण-भावाचं राहिलेलं नाही” हे वक्तव्यच सांगतंय कि आता नात्यावर राजकारण भारी पडलंय….!

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.