छत्रपतींच्या तालमीत तयार झालेल्या धनाजी जाधवांनी मुघलांची झोप उडवली होती…..

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्याच रक्षण करण्यासाठी शर्थीची झुंज देणारे मावळे महाराजांनी घडवले. महाराजांच्या निधनानंतर शंभूराजांनी औरंगजेबाची झोप उडवली. तब्बल ९ वर्ष झुंज देत औरंगजेबाला जेरीस आणलं होतं. शंभूराजांच्या नंतर शाहू महाराजांनी स्वराज्याची सूत्र हातात घेतली. पण या काळात दोन बहादूर मावळ्यांनी सगळ्या मुघल सेनेत आपल्या नावाची दहशत बसवली होती.

ते दोन मावळे होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. छत्रपती शिवराय आणि शंभूराजांच्या जाण्याने औरंगजेब आनंदात होता कि आता स्वराज्य आपल्या ताब्यात येणार. पण राजाशिवाय १४ वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला, संताजी धनाजी सारखा एक एक मावळा लढत राहिला आणि अखेर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधून मगच शांत झाला. 

संताजी धनाजी यांची दहशत इतकी जबरदस्त होती कि मुघलांच्या घोडयांना पाणी पीत असतानासुद्धा पाण्यात संताजी धनाजी दिसत असे. सगळ्या महाराष्ट्रात संताजी धनाजी यांच्या घोड्यांच्या टापा गुंजत राहिल्या.

संताजी आणि धनाजी या दोन मावळ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मुघलांना कडवी झुंज दिली. पैकी धनाजी जाधव यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. लखुजीराव जाधव यांचा पुत्र असलोजी यास निजामशाहने ठार मारल्यावर त्याचा मुलगा संताजी याचे संगोपन महाराणी जिजाऊंनी केले. कणकगिरीच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला. त्यांना शंभूसिंग नावाचा पुत्र होता या शंभूसिंगचा मुलगा धनाजी जाधव.

धनाजी जाधव यांचा जन्म १६५० च्या सुमारास झाला. धनाजी हे सुरवातीच्या काळात प्रतापराव गुजर यांच्या हाताखाली स्वराज्यामध्ये शिक्षण घेत होते. उंबराणीच्या लढाईत पहिल्यांदा धनाजीराव पुढे आले. त्यांची प्रगती पाहून त्यांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या हाता खाली पाठवण्यात आले. नेसरीच्या लढाईत धनाजी जाधवांनी मोठा पराक्रम गाजवला. 

पुढे एका लढाईत हुसेन खान बायनाचा धुव्वा उडवून धनाजी जाधवांनी आपली क्षमता दाखवून दिली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या या कामगिरीचं प्रचंड कौतुक केलं. काही काळानंतर शंभूराजांच्या हत्येनंतर पुढे स्वराज्याच काय यासाठी रायगडावर जमलेल्या मुख्य लोकांपैकी एक होते धनाजी जाधव.

साताऱ्यात सर्जा खानाचा पराभव करून धनाजी जाधवांनी आपली घोडदौड सुरु केली होती. पुढे राजाराम महाराजांबरोबर धनाजी जाधव जिंजीस गेले. तिथं इस्माईल माकाचा त्यांनी पराभव केला. त्यात खबर आली कि महादजी शिंदेंच्या निधनामुळे संताजी घोरपडे यांची सेनापती म्हणून नेमणूक करण्यात आली. तेव्हा धनाजी जाधवांना जयसिंगराव हि पदवी देऊन महाराष्ट्रात पाठवण्यात आले.

संताजी धनाजी या जोडगोळीने मात्र मुघलांची झोप उडवली. अनेक यशस्वी लढाया त्यांनी केल्या. या दोन योद्धयांनी औरंगजेबाला सुद्धा जेरीस आणलं होतं. पण काही काळानंतर संताजी धनाजी यांच्यात वितुष्ट आल्याने ते वेगळे झाले. ज्यावेळी औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्यात मग्न होता तेव्हा धनाजी जाधव हे रात्री अपरात्री मुघल छावणीवर हल्ला करून मुघलांना त्रास देत होते. 

मुघल सैन्य महाराष्ट्रातून हाकलून लावल्यावरच धनाजी जाधव शांत बसले. पुण्याचा फौजदार असलेला लोदी खान याचा पराभव करून धनाजींनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला. मुघलांच्या अटकेतून सुटका होऊन शाहू महाराज स्वराज्यात परतले यातसुद्धा धनाजी जाधवांचा मोठा वाटा होता.

पुढे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात अंतर वाढलं तेव्हा पेचात सापडलेल्या धनाजी जाधवांनी शाहू महाराज स्वराज्याच्या दृष्टीने योग्य आहे म्हणत ते शाहू राजांकडे गेले. यामुळे शाहू महाराजांची ताकद वाढली. शाहू महाराज राजगादीवर येताच त्यांनी धनाजी जाधवांना सेनापती म्हणून जाहीर केले. यात त्यांना काही जिल्ह्यांचा कर वसूल करण्याचेही काम दिले. शेवट्पर्यंत त्यांनी शाहू महाराजांसाठी काम केले. 

मे १७१० मध्ये कोल्हापूरच्या रांगनेच्या लढाईवरून परत येत असताना वारणा नदीच्या काठी वडगाव येथे त्यांचे निधन झाले अशी नोंद आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांना झालेली जखम चिघळत गेल्याने ते आजारी होते त्यातच त्यांचं निधन झालं. 

धनाजीरावांना दोन बायका होत्या. पैकी धनाजी जाधवांच्या निधनाने गोपिकाबाई या सती गेल्या. धनाजींचा मुलगा चंद्रसेन हा पुढे सेनापती झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेला धनाजी जाधव हा शाहू महाराजांच्या राजवटीतला सगळ्यात दमदार मावळा होता.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.