शिंदे-ठाकरेंमुळे रोज बातम्यांमध्ये येणारे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं पुणे कनेक्शन असंय…

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत गेल्या नोव्हेंबर महिन्यात सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले आणि त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची निवड झाली. त्या दिवसापासून ते आजतागायत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अगदी रोज चर्चेत येतायत त्यामागं कारण म्हणजे शिंदे-ठाकरेंचं सत्तासंघर्षाचं प्रकरण.

शिंदेंच्या बंडांनंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षातली सुनावणीत आज राज्यपालांच्या भूमिकेवर सुनावणी झाली. या दरम्यान सरन्यायाधीश डी व्हाय चंद्रचूड यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या ठाकरे -शिंदे सत्तासंघर्षातील निर्णयांची आज चांगलीच खरडपट्टी काढली. राज्यपालांच्या या खरडपट्टीमुळे सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निर्णय जातो का? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

मात्र यासोबतच राज्यपालांबाबत काढलेल्या खरडपट्टीमुळे सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच चर्चेत आलेत. आता युक्तिवाद अन् कुणी काय बाजू मांडली यात न जाता आपण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल बोलूया…त्यांच्या बद्दल माहिती काढत असतांना  सरन्यायाधीश चंद्रचूड याचं पुणे कनेक्शन समोर आलं. 

धनंजय चंद्रचुड यांचं पुणे जिल्ह्यातल्या खेडचं कनेक्शन… 

न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच यांच मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातलं. त्यांचे वडिल वाय.वी.चंद्रचूड अर्थात यशवंत विष्णू चंद्रचूड हे सुमारे सात वर्ष सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश होते. 

ऐतिहासिक असा शहाबानो केसचा निकाल देणारे न्यायाधिश म्हणून वाय. वी. चंद्रचूड यांना ओळखल जातं.

यशवंत विष्णू चंद्रचूड हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कनेरसर गावचे.

ते भारताचे माजी सरन्यायाधीश होते. सर्वाधिक काळ म्हणजे फेब्रुवारी १९७८ ते जुलै १९८५ अखेर ७ वर्ष ४ महिने ते सरन्यायाधिशपदी होते. त्याचं शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्ट कॉलेजमधून पदवीचा अभ्यासक्रम पुर्ण केला.

१९४२ साली ते पुण्याच्या ILS कॉलेजमधून LLB झाले. १९६१ साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली होती. देशभरात गाजलेल्या मानवत खून खटल्याच्या निकालाचे न्यायमुर्ती देखील यशवंत चंद्रचुड होते. 

त्यांचेच पुत्र धनंजय चंद्रचुड.. 

धनंजय चंद्रचुड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ चा. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या कॅथ्रेडल व जॉन कॅनन मध्ये झालं. त्यानंतर पुढील शालेय शिक्षण दिल्लीच्या सेंट कोलंबा स्कूलमध्ये झालं. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पास झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठातूनच LLB आणि हॉवर्ड विद्यापीठातून LLM केलं.

पुढे मुंबई उच्च न्यायालयातून त्यांनी वकिलीची सुरवात केली. त्यावेळी रिझर्व बॅंक, ONGC अशा संस्थांची त्यांनी बाजू मांडली. १९९८ साली अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून २०१३ साली त्यांची नियुक्ती झाली. 

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमुर्ती म्हणून जाणारी पिता-पुत्रांची जोडी महाराष्ट्राची आहे. मात्र अनेकदा असेही प्रसंग आले की वडिलांनी दिलेल्या पुर्वीच्या निर्णयावर पुर्नविचार करण्याचा प्रसंग धनंजय चंद्रचुड यांच्यासमोर आला.

असाच एक प्रसंग होता व्यभिचार हा गुन्हा रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय..

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द केले. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सांगितले तसेच व्यभिचार हा गुन्हा ठरू शकत नाही असेही सांगितले.

त्यावेळी पाच न्यायमुर्तीच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता ज्यामध्ये धनंजय चंद्रचुड यांचाही समावेश होता. त्यांचे वडिल वाय व्ही चंद्रचुड यांनी १९८५ मध्ये हे कलम संवैधानिक ठरवले होते, मात्र धनंजय चंद्रचुड यांचा समावेश असणाऱ्या खंडपीठाने हा निर्णय बदलला होता…

अयोद्धा प्रकरणात रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या बॅंचमध्ये  सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.