रांझनाच्या कुंदनची रिअल लाईफ लव्ह स्टोरीही एखाद्या चित्रपटासारखीच आहे

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक पॉवर कपल आहेत. पॉवर कपल म्हणजे ते जोडपं ज्याला त्यांचे फॅन्स आदर्श म्हणून बघतात. जोडी असावी तर अशी, असा सहज उद्गार ज्यांना बघून निघतो. जसं की, बॉलीवूडमध्ये दीपिका-रणवीर, काजोल-अजय, अनुष्का-विराट आणि सगळ्यात जास्त चाहत्यांचं प्रेम ज्यांना भेटतं ते जेनेलिया आणि रितेश. अशेच पॉवर कपल तामिळ इंडस्ट्रीमध्येही आहेत. नुकतंच तामिळ इंडस्ट्रीमधील पॉवर कपल मानल्या जाणाऱ्या सामंथा आणि नागा चैतन्या यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला.

चाहत्यांची मन जिंकणाऱ्या या जोडप्याने जेव्हा घटस्फोटाची बातमी दिली तेव्हा एकंच गोधळ सोशल मीडियावर दिसला. आता परत एकदा तामिळ इंडस्ट्रीच्या दुसऱ्या पॉवर कपलच्या घटस्फोटाची बातमी समोर आलीये आणि त्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. हे जोडपं आहे तामिळ स्टार धनुष आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या. सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी दिली आणि एकंच खळबळ  उडाली.

जवळपास १८ वर्षांचा हा सोबतचा प्रवास त्यांनी संपवला आहे. पण त्यांची लव्ह  स्टोरी तितकीच कमाल आहे.

धनुषची शरीरयष्टी बघून अनेकांना वाटलं नव्हतं की एक दिवस हा व्यक्ती सिनेमासृष्टीवर राज्य करेल. खरं तर धनुषला शेफ बनायचं होतं. पण त्याचे दिग्दर्शक वडील कस्तुरी राजा यांच्या सांगण्यावरून धनुषने चित्रपटांमध्ये हात आजमावण्याचा विचार केला. धनुषने २००२ मध्ये ‘थुल्लुवाधो इलामाई’ या चित्रपटाद्वारे  फिल्मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटातंच धनुषचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्यानंतर २००३ साली आलेला त्याचा ‘तिरुदा तिरुदी’ हा चित्रपट हिट ठरला. यावेळी मात्र प्रेक्षकांना धनुषची ओळख झाली होती.

याच दरम्यान धनुष आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. ऐश्वर्या धनुषच्या बहिणीची चांगली मैत्रीण होती. एकदा ‘काढाल कोंडे’ हा चित्रपट पाहण्यासाठी तो संपूर्ण कुटुंबासह गेला होता, तेव्हा सिनेमा हॉलच्या मालकाने रजनीकांत सरांची मुलगी ऐश्वर्या आणि सौंदर्याची ओळख करून दिली होती. साध्या हाय-हॅलोने सुरुवात झाली. पण ऐश्वर्याने मात्र याला बरंच गांभीर्याने घेतलं होतं. तिने दुसऱ्या दिवशी धनुषला पुष्पगुच्छ पाठवला होता. आणि चांगलं काम करतोय असं बोलत संपर्कात राहा असं लिहिलं होती. इथेच त्यांची प्रेम कहाणी फुलायला सुरुवात झाली.

आता ऐश्वर्या धनुषच्या बहिणीची मैत्रीण असल्याने येणं – जाणं  असायचं. शिवाय धनुष चित्रपटांमुळे प्रकाशझोतात येत होता तर ऐश्वर्या सुपरस्टार रजनीकांत यांची  मुलगी आणि स्वतः दिग्दर्शक असल्याने ती देखील नेहमीच प्रकाशझोतात राहायची. अनेक पार्टीज, कार्यक्रमात त्यांच्या भेटी व्हायच्या. पण सोबतच वयक्तिक आयुष्यातही त्यांचं बोलणं-चालणं  वाढलं होतं. त्यांनी जवळपास दोन वर्ष हे नातं गुपित ठेवलं होतं.

पण प्रेम लपून राहील असं कधी होतं का!

लवकरच धनुष आणि ऐश्वर्याच्या सोबत असण्याच्या बातम्या फिरू लागल्या. यांना अफवा आहे असं म्हटल्या गेलं. पण धनुष आणि ऐश्वर्याच्या पालकांनी जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा दोघांनीही होकार दिला.  आता दोघांचेही पालक रूढींना धरून चालणारे. विशेष करून रजनीकांत यांना हे मान्य नव्हतं की त्यांच्या मुलींबद्दल कोणत्याही अफवा माध्यमांमध्ये झळकाव्या. म्हणून त्यांनी घाईघाईत लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

धनुष आणि ऐश्वर्या दोघेही तयार होते. कारण ते एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांचं लग्न खूपच गडबडीत करण्यात आलं. पण मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा  पार पडला होता. रांझना चित्रपटात दाखवलेली कुंदनची लव्ह स्टोरी जिने अनेकांच्या मनात घर केलंय ती फारच किचकट आपल्याला वाटते. पण या कुंदनची म्हणजेच धनुषची रिअल लाईफ लव्ह स्टोरी खूप साधी सरळ आहे. ऐश्वर्या ही धनुष पेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.  २००४ मध्ये ऐश्वर्या आणि धनुषने सोबत प्रवासाला सुरुवात केली होती.

आता त्यांच्या या सुखी वैवाहीक जीवनाचा शेवट ते करत आहेत. त्यांच्या या बातमीने चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पण या जोडप्याने सहकार्याची भावना व्यक्त करत त्यांच्या या निर्णयाचा चाहते मान राखतील अशी अपेक्षा व्यक्त केलीये. नेमके ते दूर का होताय, याचं कारण अजून समोर आलेलं नाहीये. पण दोघांनीही आपसी सहमतीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय.

एकमेकांपासून दूर होऊन स्वतःला शोधण्याचा प्रयत्न ते करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

आधी सामंथा-नागा चैतन्या आणि आता ऐश्वर्या-धनुष अशा दोन पॉवर कपलच्या घटस्फोटानं तामिळ इंडस्ट्रीचे चाहते नाराज आहेत हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.