आयपीएलच्या गर्दीत धनुष श्रीकांतनं मारलेलं गोल्ड मेडलही तितकंच महत्त्वाचंय…

कुठल्याही पेपरचं किंवा वेबसाईटचं स्पोर्ट्स पेज उघडून पाहिलं की सगळ्यात जास्त गर्दी आयपीएलच्या बातम्यांची दिसते. आता साहजिकच आहे म्हणा, आपल्या देशात क्रिकेटला खेळाच्या पलीकडं नेऊन ठेवलंय आणि लोकांनाही वाचायला क्रिकेटच आवडतंय. 

पण कधीकधी कसं होतं, आपण क्रिकेट बघण्याच्या नादात एखादं लय भारी कायतरी मिस करतो. म्हणजे ज्यात क्रिकेट इतकाच आनंद असतो, क्रिकेट इतकंच थ्रिल असतं… पण आपलं लक्ष जात नाही.

तुम्हाला आठवतं का? काही महिन्यांपूर्वी जेव्हा ऑलिम्पिक सुरू होतं, तेव्हा क्रिकेटमध्ये कुणी शतक मारलं, कोण शून्यावर आऊट झालं याच्याशी लोकांना काहीही देणंघेणं उरलेलं नव्हतं. तेव्हा चर्चा एकच होती, आज कुणी मेडल मारलं आणि उद्या कोण मेडल मारणार? 

पण जसं ऑलिम्पिक संपलं, तसं हा जोर ओसरला. त्यात आयपीएल सुरू झाली म्हणल्यावर तर संपलाच विषय.

सध्या सगळं मार्केट आयपीएलनं खाल्लं आणि एका गोष्टीकडे दुर्लक्ष झालं…  

ते म्हणजे धनुष श्रीकांतनं शूटिंगमध्ये जिंकलेलं गोल्ड मेडल.

सध्या ब्राझीलमध्ये डीफलिम्पिक्स सुरू आहे. म्हणजे अशा विशेष खेळाडूंसाठीचं ऑलिम्पिक्स जे कर्णबधिर आहेत. यंदाच्या स्पर्धेत भारतासाठीचं पहिलं गोल्ड तेलंगणाच्या धनुष श्रीकांतनं आणलं. पण गोल्ड मेडल काय सहजासहजी मिळत नसतंय, त्यासाठी मेहनत लागते, त्याग लागतो आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे साथ.

श्रीकांतला ही साथ त्याच्या स्वतःकडून मिळाली, त्याच्या कुटुंबाकडून मिळाली आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याच्या कोचकडून मिळाली.

श्रीकांतला जन्मापासूनच ऐकायला येत नव्हतं, साहजिकच बोलायलाही. त्यात आणखी टेन्शनची गोष्ट होती, ती म्हणजे त्याला वाचताही येत नव्हतं. पण त्यानं ताकवांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेला. श्रीकांतची आई त्याला भारताचा ऑलिम्पिक मेडलिस्ट शूटर गगन नारंगच्या अकादमीमध्ये घेऊन गेली, एखादा नवीन मुलगा शिकायचं म्हणतोय म्हणल्यावर गगनही लगेच तयार झाला. 

पण खरं आव्हान होतं श्रीकांतला शिकवण्याचं, त्याच्याशी संवाद साधण्याचं, जर प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यात बोलणंच झालं नाही, किंवा सल्लाच देता आला नाही… तर शिकवणार कसं? 

नसरुद्दीन शहा आणि श्रेयस तळपदेच्या ‘इकबाल’ पिक्चरमध्ये आपण पाहिलेलं खरं, पण सत्त्यात उतरवणं हे स्किल होतं.

गगन नारंग पहिल्यांदाच आव्हानांना सामोरं जात होता, अशातली गोष्ट नव्हती. त्यामुळं त्यानं श्रीकांतला ट्रेन करण्याचं लक्ष भेदायचं ठरवलंच. सुरुवात करावी लागणार होती शून्यातून. श्रीकांतला गन कशी पकडायची, कशी चालवायची, कसं उभं रहायचं, काय काळजी घ्यायची हे साईन लॅंग्वेजमधून सांगणं शक्यच नव्हतं. 

मग गगन नारंगनं पर्याय निवडला, चित्रकलेचा.

अगदी बारीक सारीक गोष्टींचं चित्र काढून तो श्रीकांतला दाखवायचा आणि त्यातून त्यांचा संवाद व्हायचा. या जोडीनं चित्र आणि खाणाखुणांच्या आधारे स्वतःची अशी साईन लँग्वेजही बनवली. आता दोघांचं कम्युनिकेशन वाढलं आणि श्रीकांतच्या बंदुकीतून निघणाऱ्या गोळ्या टार्गेट भेदू लागल्या. 

त्यानं २०१९ मध्ये अंडर-२१ वयोगटाच्या खेलो इंडिया स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं आणि त्याच्या नावाची चर्चा वाढली. हाच धडाका त्यानं त्यावर्षीच्या एशियन गेम्समध्येही कायम ठेवला. तिथं त्यानं सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल मारलं.

त्याचं करिअर गोळीच्या वेगानं सुसाट सुटलं होतं आणि तेवढ्यात लॉकडाऊनमुळं ब्रेक लागला.

या संकटाला गगन नारंग आणि श्रीकांतनं संधी समजलं आणि आपला सरावाचा वेळ वाढवला. गगनलाही त्याच्यावर जास्त लक्ष देता आलं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रीकांत युट्युबवर व्हिडीओ बघून आपल्या खेळात सुधारणा घडवून आणत होता. सरावादरम्यान कित्येक गोष्टी त्याच्यात घोटत गेल्या आणि त्याचं सोनेरी फळ आता कुठं मिळालंय. 

वयाच्या फक्त १९ व्या वर्षी श्रीकांतच्या गळ्यात डिफलिम्पिक्सचं गोल्ड मेडल आहे, नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे, पण त्याचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. कोच गगन नारंग माध्यमांशी बोलताना सांगतो, “श्रीकांतला २०१४ च्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये खेळायचंय. त्याला इतर खेळाडूंसोबत स्पर्धा करायची आहे. त्याची स्वप्न मोठी आहेत.” 

खरंतर ऐकू, बोलू न येणारा मुलगा स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी झगडतोही. त्याला असा एक कोच मिळतो, जो आव्हान स्वीकारतो, या मुलाला घडवतो… दौऱ्यावर एकट्यानं गेल्यावर अडचण होऊ नये म्हणून वाचायलाही शिकवतो. ही दोन माणसं प्रचंड मेहनत घेतात आणि देशाला एक गोल्ड मेडल मिळतं. ही गोष्टच किती भारी आहे…

या मेडलचं महत्त्व कुठल्याही शतकापेक्षा, विश्वविजेत्या भाल्यापेक्षा कमी नाही, भले पोडियमवर मेडल घेताना श्रीकांतला भारताचं राष्ट्रगीत ऐकू आलं नसेल, 

पण त्याच्या आणि आपल्या मनात वाजलं असेल एवढं नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.