मराठ्यांच्या भीतीने बांधलेला रखवालदार किल्ला धारावीच्या झोपडपट्टीमध्ये अखेरचा श्वास घेतोय..
जगात ताजमहालच्या खालोखाल भारताची ओळख कोणत्या ठिकाणामुळे केली जाते ठाऊक आहे? मुंबईतल्या धारावीची महाप्रचंड झोपडपट्टी. अगदी हॉलिवूड सिनेमात भारत दाखवायचा झाला तर हमखास हि झोपड्पट्टी दाखवतात. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीला ओळखलं जातं.
मात्र याच धारावीमध्ये इतिहासाचा एक मूक साक्षीदार आपला अखेरचा श्वास घेत उभा आहे. तो म्हणजे धारावीचा किल्ला.
मुंबईत सायनच्या पूर्व भागात रेल्वे स्टेशनच्या अगदी १० मिनिटाच्या अंतरावर बस डेपोच्या जवळ हा छोटासा किल्ला उभा आहे. कोणत्याही टेकडीवर नसून सपाट जमिनीवर दाट वस्तीमध्ये लपला असल्यामुळे हा किल्ला शोधतच जावे लागते.
या किल्ल्याच नाव फोर्ट रेवा, पण या किल्ल्याला धारावीकर काळा किल्ला म्हणूनच ओळखतात.
१६६५ साली मुबई बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांकडे हस्तांतरित केले. तेव्हा पासून त्यांनी हे गाव हे बंदर म्हणून विकसित केले. त्या आधी सुरत हि त्यांची मुख्य वखार होती, मात्र तिथे सुरु असलेले मराठ्यांचे हल्ले यामुळे त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला आपले मुख्य ठाणे बनवायचे ठरवले. त्यानुसार इथला विकास करायचा ठरवला.
खाली कोकणात शक्तिशाली असलेले सिद्दी, पोर्तुगीज, मुघल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नुकताच नौदल स्थापन करून प्रबळ बनलेले शिवरायांचे मराठे या अशा अनेक सत्तांपासून त्यांना या गावाचे संरक्षण करायचे होते.
पोर्तुगीजांचे साष्टी बेट तर येथून अगदी शेजारी असल्याप्रमाणे होते. या संकटामुळे मुंबईच्या सर्व सीमांवर टेहेळणीसाठी व वेळ प्रसंग पडल्यास थोडाफार प्रतिकार करू शकतील असे तळ उभारणे आवश्यक होते. या गरजेपोटीच शिव किल्ल्यातील कुमक वाढवण्यात आली व सावधगिरीचा उपाय म्हणून शिव ते बांद्रा यामधील खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धारावीचा हा अत्यन्त छोटेखानी किल्ला बांधण्यात आला.
एकेकाळी हा किल्ला खाडीच्या शेजारी होता. खाडीच्या लाटा या किल्ल्याच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन आपटत असत. या किल्ल्याच्या तटबंदी मध्ये तोफा ठेवायच्या जागा असून समुद्रात लांबवर असलेल्या युद्धनौकांचा अचूक वेध घेण्याची सोया या किल्ल्यात करण्यात आली होती.
१७३७ साली हा किल्ला बांधण्यात आला. याच वर्षी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली फिरंगणाची मोहीम हाती घेतली होती यावरून या किल्ल्याची उभारणी का केली होती याची कल्पना येईल.
या उपाययोजनांचा ब्रिटिशाना नक्कीच फायदा झाला. कारण १८३९ साली मराठ्यांनी वसई जिकून सालसेटचे बेटही ताब्यात घेतले होते. सालसेटची हद्द माहीमला अगदी भिडलेलीच होती. मराठ्यांच्या या युद्धाचे मुख्य प्रयोजन हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या पोर्तुगीजांना धडा शिकवणे हे होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या तेव्हा छोट्याशा असलेल्या मुंबई बेटाकडे लक्ष दिले नाही.
सागरी युद्धाचे कष्ट घेऊन मुंबई वर हल्ला करायचं जरी ठरवलं असत तरी इंग्रजांनी आधीच हे छोटे मोठे किल्ले बांधून तयारी केली होती त्यामुळे चिमाजी अप्पा सालसेटच्या पुढे सरकले नाहीत.
धारावीचा किल्ला बांधण्याचा इंग्रज गव्हर्नरचा दूरदृष्टीचा निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरला. या गव्हर्नरच्या नावाची पाटी आजही या किल्ल्यावर पाहावयास मिळते. त्यावर लिहिले आहे की,
“सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७ मध्ये बांधला”
हा धारावीचा रेवा फोर्ट मुंबईतील इतर किल्ल्यांपेक्षा अत्यंत आगळावेगळा आहे. याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला दरवाजाच नाही. तिथे जाण्यासाठी शिडी लावूनच वर जावे लागते. किल्ल्यात जाण्यासाठी शिडी लावूनच वर जावे लागते. काही जण असंही म्हणतात की झोपडपट्टीच्या आक्रमणात किल्ल्याचं दरवाजाचा भाग नष्ट झाला असावा.
मात्र तिथली तटबंदी व वरील तोफा रोखण्याच्या जागा अजुनही सुरक्षित आहेत. एवढंच नाही तर या लांबट आकाराच्या किल्ल्यात मधोमध एक गुप्त तळघर देखील आहे. या किल्ल्यात सैनिकांच्या वास्तव्याची जागा हि एकच आहे. यामुळे इथे आळीपाळीने सैनिक रखवालदारीसाठी येत असावेत आणि तळघरात भुयारात दारुगोळा साठवून ठेवत असावेत असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.
मिठी नदी किनार्यावरचा किल्ला म्हणून त्याला फोर्ट रिव्हर म्हणत असावेत, या नावाचाच अपभ्रंश होऊन किल्ल्याचं नाव फोर्ट रिवा किंवा रेवा असं पडलं असावं. स्थानिक लोक मात्र काळया दगडांच्या या किल्ल्याला काळा किल्ला म्हणूनच ओळखतात.
पूर्वी खाडी होती तिथे भर टाकून त्या जागी या झोपडपट्या बोकाळल्या आहेत. सध्यस्थितीत हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक आहे, खुद्द किल्ल्यात जास्त आक्रमणे होत नाहीत मात्र तटबंदीचा वापर बऱ्याचदा स्थानिक लोक कपडे वाळत घालण्यासाठी करतात. इथल्या भुयारात प्रचंड कचरा साठला असून रात्रीच्या अंधारात गुन्हेगारी वृत्तीचे लोक व दारुडे इथे आसरा घेतात असं बोललं जातं.
तटबंदीवर वाढत असलेली झाडे आणि आसपासची झोपडपट्टी यांना या अमूल्य इतिहासाशी काही देणेघेणे असणं शक्य नाही. या झोपडपट्टीच्या गर्दीत सरकारी उपेक्षेच्या गर्तेत हा धारावीचा किल्ला अखेरचा श्वास घेत उभा आहे.
हे हि वाच भिडू.
- निग्रो म्हणून हेटाळणी करणाऱ्या पोर्तुगीजांंना बाजीराव पेशव्यांनी कायमची अद्दल घडवली
- छ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली होती
- .नाहीतर आज मुंबईच्या जागी सुरत ही भारताची आर्थिक राजधानी झाली असती.
- हुंड्यात दिलेल्या मुंबईमुळं राडा झालेला, प्रकरण पेटलं असतं तर ब्रिटीशांची सून नांदली नसती.