बाहेरून झोपडपट्टी दिसत असली तरी ‘धारावी’ म्हणजे अनेक इंडस्ट्रीजचं एक भलं मोठं जाळं आहे.

पूर्वी बॉलीवुडचा जरा बरा काळ चालला होता तेव्हा एका पिक्चरने हवा केलेली. ‘स्लमडॉग मिलेनियर’ नावाचा हा पिक्चर. पिक्चर तर ऑस्कर विनिंग होता, पिक्चरला रहमानचं म्युझिक होतं आणि पिक्चरभर धारावीची झोपडपट्टी दाखवलेली होती.

झोपडपट्टीतलं एक पोरगं आपलं नशीब अजमावायला ‘कोन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर जाऊन बसतं, अशी कायतरी पिक्चरची स्टोरी होती. तेव्हा त्या पोराचा अभिमान वाटलेला आणि पिक्चरचं जाऊदे पण ह्या झोपडपट्टीविषयी लय उत्सुकता ताणलेली.

त्यांचं लाईफस्टाइल कसं असतं, दिवसभर ही लोकं काही काम करतात की नुसतीच दारू पिऊन पडून असतात? खातात काय, दारुशिवाय दूसरं पितात काय असले खूपसे प्रश्न पडलेले. खरच का टीव्हीत दाखवतात तसं इकडले लोकं घाणीत राहतात? असाही प्रश्न पडलेला. त्यात मुंबईची धारावी झोपडपट्टी म्हणजे तर मोठा विषय.

पण भिडूनो, मुंबईतली धारावी म्हणजे फक्त दुर्गंधी आणि गरीबीपुरती मर्यादित नाहीये बरं. धारावी म्हणजे खरंच लय मोठा विषय आहे. कसा? सांगते.

मुंबई हे शहर खूप साऱ्या काँट्रास्ट गोष्टींनी भरलेलंय. इथल्या अत्याधुनिक मेट्रोत बसल्यावर फॉरेन फील येतो तर मेट्रोच्या खिडकीतून बाहेर पाहिलं की माणसाला झोपडपट्ट्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात.

ह्या रांगा म्हणजे मुंबईची, धारावीची झोपडपट्टी. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडट्ट्यांपैकी एक. या झोपडपट्टीला ‘झोप’ नावाची गोष्ट माहीत नाही. दिवस असो वा रात्र, ही झोपडपट्टी कायम गजबजलेली असते शिवाय मुंबई आणि देशाबाहेरच्या लोकांसाठी कायम चर्चेचा विषय असते. आणि त्याचं कारण असं की ही झोपडपट्टी फक्त एक स्लम एरिया म्हणून मर्यादित राहिलेली नाहीये तर, अनेक इंडस्ट्रीजचं मोठं जाळं बनलीये. 

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण इथे जवळ जवळ ५,००० छोटे मोठे बिझनेस आणि १५,००० छोट्या मोठ्या फॅक्टऱ्या आहेत.

धारावीची झोपडपट्टी १८८४ सालापासून अस्तित्वात आहे. त्यापूर्वी ह्या जागी खाडी आणि दलदल होती. काही नैसर्गिक कारणांमुळे जशी ह्या भागातली दलदल कमी होऊ लागली तसं साऊथ मुंबईतल्या स्थलांतरित कामगारांनी आणि गोरगरिबांनी तिथे आपली घरं वसवायला सुरवात केली.

धारावीची झोपडपट्टी ही मुंबईत अशा मोक्याच्या ठिकाणी वसलीये (वांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स) जिथून, इथे राहणाऱ्या कामगारांना प्रवास करणं नेहमी सोयीचं पडतं. आणि फक्त प्रवासच नाही तर उद्योग धद्यांसाठी सुद्धा ही जागा एकदम परफेक्ट होती. आपल्या पोटापाण्याची सोय म्हणून धारावीतल्या लोकांनी हळू हळू करत छोटे छोटे व्यवसाय करायला सुरवात केली आणि बघता बघता इथे अनेक इंडस्ट्रीज उभ्या राहू लागल्या. 

 धारवीतल्या इंडस्ट्रीजचा बिझनेस सुद्धा मोठ्या स्केलवर सुरू असतो.

ह्या इंडस्ट्रीजमध्ये, लेदर इंडस्ट्री, प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्री, व्हॅक्स प्रिंटिंग इंडस्ट्री, पॉटरी इंडस्ट्री म्हणजेच मातीच्या मडक्यांचा व्यवसाय अशा अनेक इंडस्ट्रीजचं मोठ्या प्रमाणावर काम चालतं. शिवाय इथली टेक्सटाइल आणि घड्याळाची इंडस्ट्री सुद्धा खूप मोठीये.

लेदर इंडस्ट्री

धारावीतल्या लेदर इंडस्ट्रीचं जाळं, जशी वर्ष जातील तसं अजून अजूनच पसरायला लागलंय. आणि ही इंडस्ट्री धारावीतली सगळ्यात मोठी इंडस्ट्री मानली जाते. इकडल्या चामडयाच्या वस्तूंना परदेशातूनही मागणी असते. या वस्तूंमध्ये चांबड्यापासून बनवलेल्या चपला, बॅग्स, वॉलेट, जॅकेट अशा गोष्टी असतात.

ह्या सगळ्या वस्तूंचं उत्पादन धारावीतच घेतलं जातं. इंडस्ट्रीचं मार्केट लय मोठं जरी असलं तरी कोविड आणि लॉकडाऊनचा फटका ह्या इंडस्ट्रीला सुद्धा बसला होता. पण आता हळू हळू गाडी पुन्हा रुळावर येत असल्याचं दिसतय.

लेदर इंडस्ट्रीमुळे अनेक कारागिरांना रोजगार उपलब्ध झालाय. धारावीत उत्पादन झालेले अनेक प्रोडक्ट्स अख्ख्या जगभरात एक्सपोर्ट केले जातातच, शिवाय हे लेदर, ‘झारा’ सारख्या लक्झरी ब्रॅंड्सना सुद्धा धारवीतूनच पुरवलं जातं. धारावीतत्या लेदर इंडस्ट्रीत जवळ जवळ दीड लाख लोकं काम करतात आणि ही इंडस्ट्री वर्षाला जवळ जवळ ३०० ते ५०० मिलियन डॉलरचा टर्नओव्हर आरामात करते.

प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्री

धारवीत कधीच काही फुकट जात नाही. मग ही त्यांची गरज म्हणा वा त्यांची क्रीएटिव्हिटी किंवा त्यांचं स्किल म्हणा. इथे प्रत्येक फुकट गेलेली गोष्ट वापरात काढली जाते. आता मुळात मुंबई आणि मुंबईची गर्दी पहाता घाण, कचरा, प्लॅस्टिक आणि अशा अनेक टाकाऊ गोष्टींची ह्या शहराला कधीच कमी भासत नसते. आणि ह्याच टाकाऊ गोष्टींचं, महत्वाचं म्हणजे.. प्लॅस्टिकचं रिसायकलिंग धारवीत करण्यात येतं.

अख्ख्या मुंबईतलं ६०% टाकाऊ प्लॅस्टिक हे धारवीत रिसायकल केलं जातं. शिवाय धारावीतल्या ह्या प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्रीमुळे दहा ते बारा हजार कामगारांना रोजगार मिळतोय.

व्हॅक्स प्रिंटिंग इंडस्ट्री

व्हॅक्स प्रिंटिंग इंडस्ट्री ही धारावीतली सगळ्यात जुनी इंडस्ट्री मानली जाते. आता धारवीत साधारणपणे ४० ते ५० व्हॅक्स प्रिंटिंग यूनिट्स कार्यरत आहेत. व्हॅक्स प्रिंटिंगचा विषय थोडा अवघड असतोय त्यामुळे इथे पट्टीचे कारागिर लागतात.

जसं बाटिकचं प्रिंट असतं तसंच हे व्हॅक्स प्रिंटिंग सुतीच्या रंगीबेरंगी कपड्यांवर केलं जातं. व्हॅक्स प्रिंटिंग करणाऱ्या कारागिरांचं काम सुमारे दहा तासांचं असतं. आणि त्यांना दिवसाला ५०० ते ८०० रुपयांमध्ये केलेल्या कामाचा मोबदला दिला जातो.

पॉटरी इंडस्ट्री (कुंभारकाम)

धारावीतल्या मातीपासून बनणाऱ्या वस्तूंना सुद्धा बाजारात खूप मागणी असते. सगळ्यात मोठा सीझन असतो तो दिवाळी दरम्यान. दिवाळी दरम्यान किंवा कोणताही भारतीय सण असला की या मातीच्या वस्तूंचा खप जवळ जवळ डबल होतो. हा व्यवसाय जास्त करून घरच्या घरी करण्यात येतो. धारावीत जिथे हे कुंभारकाम चालतं तो भाग कुंभारवाडा म्हणून फेमस आहे.

आपल्या घराच्याच बाहेर हे कुंभार, मातीच्या मंडक्यांपासून पणत्यापर्यंत सगळ्या गोष्टी टोपल्यांमध्ये एकत्र ठेऊन विकत असतात. शिवाय या कुंभारवाड्यात, मातीच्या वस्तु बनवण्याचे अनेक वर्कशॉप्स सुद्धा चालतात.

धारावीच्या झोपडपट्टीविषयी लोकांना इतकं आकर्षण वाटतं की मुंबई बाहेरची लोकं मुंबईत जरी आली तरी धारवीला आवर्जून भेट देऊन जातात, तिथलं काम कसं चालतं ते पाहतात. आणि ह्या गोष्टीला सिरियसली घेऊन धारावीतल्या लोकांनी ‘स्लम टुरिझम’ सुद्धा सुरू केलंय. त्यांच्यातर्फे तुम्हाला अख्खी झोपडपट्टी, तिथले व्यवसाय, लोकं, त्यांचं राहणीमान ह्या सगळ्याची एक टूर घडवली जाते. आणि तुम्हाला त्यांचं आयुष्य जवळून पाहता आणि अनुभवता येतं.    

थोडक्यात काय तर, आजच्या घडीला मुंबईची ६०% लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. आणि बाहेरून दिसणारी धारावीची झोपडपट्टी, आतून पाहिली तर फक्त झोपडपट्टीपुरती मर्यादित राहिलेली नाही हे आपल्या लक्षात येतं. धारावीची झोपडपट्टी म्हणजे अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीजचं आणि नवनवीन संधींचं गेली अनेक वर्ष केंद्रस्थान राहिलं आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.