डॉनच्या पोरीने रजनीकांतवर १०० कोटींचा खटला भरला खरा पण तो तमिळ डॉन कोण होता ?

रजनीकांत म्हणल्यावर अर्धा खेळ खल्लास होऊन जातो. जगातली कुठलीही अशक्यप्राय गोष्ट रजनीकांत करू शकतो इतका कॉन्फिडन्स त्याच्या चाहत्यांना आहे आणि तो साहजिकच आहे कारण रजनीकांतचा सिनेमा आणि त्याचा लोकांवर पडणारा इम्पॅक्ट. पण रजनीकांतवर एका तमिळ डॉनच्या मुलीने खटला भरला होता. हा तामिळ डॉन नक्की कोण होता जाणून घेऊया.

रजनीकांतला लीड अभिनेता ठेवून दिग्दर्शक पा रणजित हा काला सिनेमा घेऊन आला होता. हा सिनेमा पहिल्याच दिवशी हाऊसफुल झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याने चांगलं कलेक्शन सुद्धा केलं होतं. यात मणिरत्नमचा नायकन [ हा वरदराजन या तामिळ डॉनवर आधारित होता ] आणि काला या दोघांमध्ये तुलना केली जाऊ लागली होती. 

कालामध्ये एक व्यक्ती तामिळनाडूमधून पळून येते आणि मुंबईच्या धारावीत येऊन पोहचते. धारावीत राहून ती व्यक्ती एक शक्तिशाली डॉन बनते. या सगळ्या स्टोरीवर खटला भरला होता तो तमिळ डॉन एस थिरवियम नादर यांच्या मुलीने.

थिरवियम नादर यांच्याशिवाय धारावी आणि मुंबई अंडरवर्ल्ड अपूर्ण मानलं जातं. तर हे कोण होते हे थिरवियम नादर ?

३० वर्ष धारावीमध्ये डॉन म्हणून सत्ता सांभाळणारे तामिळ डॉन थिरवियम नादर. एक सर्वसामान्यांचे हिरो म्हणून आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. नायकन हा सिनेमा ज्या डॉनवर आधारित होता तो डॉन वरदाराजन मुदलियार यांच्या भाऊबंदकीत थिरवियम नादर होते. धारावीत राहून नादर यांनी वरदराजन आणि हाजी मस्तान यांच्यासाठी बराच काळ काम केलं. 

थिरवियम नादर यांची मुलगी विजयालक्ष्मी नादर आपल्या वडिलांबद्दल आठवण सांगतात कि, आम्ही लहान असताना आमच्या घराबाहेर २००-३०० लोकांचा जमाव कायम असायचा कारण लोकांना विश्वास असायचा कि थिरवियम नादर हे आपली मदत करतील. भल्या गर्दीतून ते आम्हाला शाळेत सोडवायला यायचे आणि परत घेऊनसुद्धा यायचे. २००३ मध्ये ते गेले आणि त्यांची कथाही त्यांच्यासोबतच गेली.

पुढे हाजी मस्तान आणि मुदलियार वरदराजन यांच्यासाठी काम केल्यानंतर मुंबई अंडरवर्ल्ड हळूहळू कमी होत चाललं होतं, पण लोकांच्या मदती या रॉबिनहूड पद्धतीने थिरवियम नादर करत असायचे. लोकांमध्ये आणि अंडरवर्ल्डमधे थिरवियम नादर यांचं एक पर्व होतं ज्यात त्यांची इमेज हि शाबूत राहिली. तामिळनाडूतून पळून आलेला एक मुलगा भविष्यात अंडरवर्ल्डमध्ये राहून ३० वर्ष धारावीवर राज्य करतो हि गोष्टच मुळात सिनेमासारखी होती.  

काला सिनेमात असणाऱ्या रजनीकांतच्या लूकवरून तो सिनेमा थिरवियम नादर यांच्यावर बेतलेला आहे असं विधान नादर यांच्या मुलीने केलं होतं. धारावीच्या लोकांमध्ये आजही थिरवियम नादर या डॉनविषयी कुतूहल कायम आहे. रजनीकांतने आपल्या स्टाईलने साकारलेला हा नायक बऱ्याच ठिकाणी थिरवियम नादर यांच्याशी साम्य दाखवणारा होता. त्यामुळं विजयालक्ष्मी नादर यांचा आक्षेप साहजिकच होता.

विजयालक्ष्मी नादर म्हणते कि माझ्या वडिलांशिवाय धारावीचा इतिहास अपूर्ण आहे. थिरवियम नादर हे काही पहिलेच डॉन नाही ज्यांच्यावर सिनेमा बनवला गेला होता. याआधीही हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, छोटा राजन अशा डॉन मंडळींवर आधारित सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेलेत.

पा रंजितने या खटल्यावर आपलं स्पष्टीकरण दिलं होतं कि ते कॅरेक्टर काल्पनिक आहे आणि अंडरवर्ल्ड मध्ये डॉन लोकं तलवारी वापरत नव्हते तस आम्ही सिनेमात दाखवलं आहे आणि हे स्पष्ट आहे कि सिनेमा हा थिरवियम नादर यांच्यावर आधारित नाही. पण रजनीकांतच्या सिनेमांचा विषय वाढीव असतो म्हणून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुरळा करून गेला होता. पुढे हा खटला सुद्धा गायब झाला आणि सिनेमा सुपरहिट झाला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.