गांधीजींना शिव्या घातल्या म्हणून धर्मसंसद सोडून जाण्याचं धाडस दाखवणारे महंत कोण आहेत?

मी त्या नथुराम गोडसेला प्रणाम करतो ज्याने त्या ह**** मोहनदास करमचंद गांधीला मारले. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही गरज पडल्यास जीवही घेऊ…

अशा आशयाचा वक्तव्य करणारे अकोल्याचे कालीचरण महाराज दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. १७ ते १९ डिसेंबर दरम्यान भरलेल्या धर्मसंसदेत उपस्थित अनेक धर्मगुरूंनी इतर धर्मियांना उद्देशून वादग्रस्त विधानं केली होतीच. या पाठोपाठ २६ डिसेंबरला छत्तीसगड रायपूरच्या धर्म संसदेत महाराष्ट्रातल्या अकोल्याचे साधू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींना अक्षरशः शिवी देत नथुराम गोडसेला वंदन केलं.

अशा वादग्रस्त विधानांमुळे धर्म संसदांचं आयोजन चर्चेत आलं. सोशल मीडियावर याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण त्याच धर्मसंसदेत एका महंतांनी स्टेजवरून चढून कालीचरण महाराजाची अक्षरशः अब्रू काढली. या महंतांनी कालीचरण महाराजासह त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणाऱ्यांनाही स्टेजवरूनच झापले. तसेच त्यांनी धर्म संसदेवर बहिष्कार टाकत तिथून निघून गेले.

हे महंत होते रामसुंदर दास

महंत दास म्हणाले की,

महात्मा गांधींविषयी धर्म संसदेच्या मंचावरून जे म्हटलं आणि त्यावरून तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, ते योग्य आहे का? महात्मा गांधी खरंच गद्दार होते का ? टीव्हीचे रेकॉर्डिंग आहे. तुम्ही सगळ्यांनी पहा. हेच शब्द म्हटले होते. तुम्ही टाळ्या, थाळ्या वाजवल्या होत्या. १९४७ च्या त्या घटनेची आठवण करा. कोणत्या परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधींनी त्यासाठी खूप काही केलं. त्यांच्याविषयी धर्म संसदेच्या मंचावरून असं वक्तव्य, योग्य नाही. मी तुम्ही सर्वांची माफी मागतो आणि या धर्म संसदेपासून वेगळा होतो.

हे महंत रामसुंदर दास छत्तीसगढ गौसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत.

महंत रामसुंदर दास यांचा जन्म जांजगीर-चंपा जिल्ह्यातील पिहरीद गावात झाला. प्राथमिक शिक्षण घेऊन झाल्यानंतर ते रायपूरला आले आणि इथल्या ऐतिहासिक दुधाधारी मठात राहिले. या मठात पुढील शिक्षणाबरोबरच धार्मिक कार्यात ते गुंतले. तत्कालीन महंत वैष्णवदास हे रामसुंदर यांच्या ज्ञानाने आणि निस्वार्थ भावनेने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी नंतर त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

वैष्णवदासांच्या मृत्यूनंतर दुधाधारी मठ रामसुंदर दास महंत म्हणून चालवत आहेत. महंत रामसुंदर दास यांनी संस्कृत आणि साहित्य आचार्य या विषयात एमएची पदवी घेतली असून ‘रामायणातील ऋषी-मुनींचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर पीएचडीही केली आहे.

आणि गांधीजींनी शिव्या देणारे कालीचरण महाराज कोण आहेत ?

कालीचरण महाराजांच्या कपाळावर कुंकवाचा मोठा ठिपका असतो. काळेभोर केस, मानेपर्यंत रुळलेले, महाराज रोज जीमला जातात, त्यामुळे अंगावर भगवे कपडे घातले नसते तर त्यांना कुणीही बॉडीबिल्डरच म्हटलं असतं अशी दणकट देहयष्टी. कपडेही जरीचे. म्हटलं तर भगवे, म्हटलं तर चॉकलेटी स्वरुपाचे. एकदम स्वच्छ. व्यवस्थितपणा. एखाद्या साधूच्या ठायी असतो असा गबाळेपणा कुठेही दिसणार नाही. हेच कालीचरण महाराज विदर्भातल्या अकोल्याचे. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे.

कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांच मूळ नाव ‘अभिजीत धनंजय सराग. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. हे महाराज फक्त आठवी पास आहेत असं म्हणतात.

आता या धर्मसंसदेत फक्त कालीचरण महाराजचं नाही तर बऱ्याच महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

इथे उपस्थित असलेल्या महामंडलेश्वर असलेल्या, हिंदूमहासभेच्या अन्नपूर्णा माँ म्हणतात की,

‘त्यांचे’ वीस लाख कापतील असे आपले १०० योद्धे आपल्याला तयार करायला हवेत.

बिहारचे धरमदास महाराज म्हणतात की,

मनमोहन सिंग जेव्हा संसदेत बोलले की अल्पसंख्याकांना देशाच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार आहे, तेव्हा मी तिथे असतो तर गोडसे बनून त्यांच्या छातीत सहा गोळ्या डागल्या असत्या.

आनंद स्वरूप महाराज म्हणतात की,

उत्तराखंडमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना त्यांचे सण साजरे करू देणार नाही, कारण ही हिंदूंची भूमी आहे. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही १८५७ च्या बंडापेक्षा भीषण युद्ध पुकारू

यति नरसिंहानंद सरस्वती म्हणतात की

आर्थिक बहिष्कार करून आता भागणार नाही, हिंदूंनी शस्त्र उचलायला हवीत. नुसत्या तलवारी नको, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हिंदूंनी बाळगायला हवीत. त्यात त्यांनी हिंदूंना पाच हजारांचा मोबाईल वापरत दिवस काढा पण एक लाखाची शस्त्र विकत घ्या असं आवाहन केलं आहे.

स्वामी प्रबोधानंद म्हणतात तुम्ही मारायला सज्ज व्हा नाही तर मराल.

सिंधू सागर स्वामी म्हणतात,

मुसलमानांच्या जमिनी खरेदी करून टाका आणि गावेच्या गावे मुस्लिममुक्त करा. त्याचबरोबर त्यांनी अट्रोसिटी कायद्याखाली किमान दहा मुस्लिम त्यांनी फसवले आहेत तसेच प्रत्येकाने करावे अशी आयडिया देतात.

यति नरसिंहानंद म्हणाले की

हिंदूंना प्रभाकरन, भिंद्रावाले, सारखी माणसं घडवायला हवीत, कुणी तयार असेल तर त्याला आम्ही करोड देऊ असं आश्वासन दिलं.

सागर सिंधुराज महाराज म्हणाले की

इथून गेल्यावर आपला मेसेज क्लिअर असायला हवा की ‘ते’ हिंदू धर्मात आले तरच त्यांचे जीव वाचतील, नाहीतर म्यानमारसारखे पळवून मारले जातील. याचबरोबर त्यांनी हिंदूंनी दहा-दहा पोरे काढावीत असं आवाहन केलं आहे.

आता तुम्हाला धर्मसंसद म्हणजे काय माहीत नसेल तर ते ही सांगतो..

धर्मसंसद म्हणजे धर्माशी निगडीत मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केलेली परिषद. आपण ऑफिसांत वगैरे जशी बैठक घेतो, तशीच ही बैठक असते. तुम्हाला एखाद्या धार्मिक मुद्द्याविषयी अधिक स्पष्टता हवी असेल, विवाहासंदर्भातल्या किंवा अन्य एखाद्या विधीमध्ये काही समस्या येत असेल किंवा बदल करायचे असतील, एखादी धर्मविषयक समस्या सोडवायची असेल, तर मोठ्या धर्मगुरूंना बोलवलं जातं. यात शास्त्र संमत काय निर्णय असावा हे ठरवलं जातं.

भारतात आदि शंकराचार्यांशी निगडीत चार प्रमुख मठ असून सामान्यतः त्यांचे अधिपती धर्मग्रंथांचा अभ्यास करूनच महत्त्वाच्या धार्मिक मुद्‌यांवरचे निर्णय देऊ शकतात.

पण हिंदू धर्म हा कोणत्याही एका पुस्तकावर आधारीत नाही. त्यात वेगवेगळे प्रवाह आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे वेगवेगळ्या मठांचे प्रतिनिधी अशा धर्म संसदेत सहभागी होतात. संसदेत जसं सर्व लोकप्रतिनिधींना मुक्तपणे आपलं मत मांडता येतं, तसंच या परिषदेतही सहभागी व्यक्ती आपले विचार मांडू शकतात. एखाद्या सेमीनारसारखंच धर्म संसदमध्ये आधी निश्चित केलेल्या मुद्द्‌यांवर कधी उलट-सुलट चर्चा होते आणि प्रसंगी एखाद्या धार्मिक बाबतीत निर्णयही घेतला जाऊ शकतो.

पण गेल्या काही वर्षांत धर्म संसदेचं स्वरूप बदलताना दिसत आहे. हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेत तर ते आणखी उग्र झालेलं दिसलं

 

English summary : Mahant Ram Sundar Das, one of the main patrons of the Raipur Dharam Sansad, said that he was disassociating himself from the event and walked off the stage on Sunday.

web title : dharm sansad 2021: why did mahant ram sundar walk off stage at dharam-sansad

 

Leave A Reply

Your email address will not be published.