इंग्रजांच्या विरोधातील पहिलं स्वातंत्र्ययुद्ध बीडच्या ‘ धर्माजी प्रतापराव’ यांनी लढलं होतं.

१८१८ हे साल भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाचं वर्ष आहे. याच वर्षी मराठ्यांचा इंग्रजांनी पराभव केला आणि अखंड भारत पारतंत्र्यात गेला. यापूर्वीच अनेक राजेमहाराजे यांनी ब्रिटिशांच मांडलिकत्व स्वीकारलं होतं.

देशाच्या कानाकोपऱ्यातील छोट्या छोट्या गावांनी स्वातंत्र्याची आस सोडली नव्हती.

स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या उठावाची ठिणगी पेटवली बीडच्या धर्माजी प्रतापराव यांनी.

मराठवाडा व लगतचा तेलंगणा या भागात तेव्हा निजामाचे राज्य होते. हैद्राबादचा निजाम हा जुलमी होता. दुष्काळातही शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वसूल करत होता. इंग्रजांशी त्याने तैनाती फौजेचे करार केले होते, त्याचा खर्च वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांवर दडपशाही केली जात होती.

बीड जिल्हयातील आष्टी तालुक्यातील हातोला या गावी धर्माजीराजे प्रतापराव गर्जे-मुंडे यांची गढी होती. धर्माजी पराक्रमी होते.

त्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांच्या पदरी असताना प्रतापगडाच्या युद्धात मोठी कामगिरी बजावलेली होती.

धर्माजी वंजारी समाजातील होते. समाजातील सर्व भांडण तंटे यांचा निवाडा त्यांच्या समोर व्हायचा.

बीड जिल्ह्यातल्या जनतेने धर्माजीना राजेपदाचा मान दिला होता.

निजामाची दडपशाही धर्माजीना मान्य नव्हती. तुम्ही ब्रिटिशांचे मांडलिक आहात आम्ही नाही असं त्यांचं थेट म्हणणं होतं. त्यांनी निजामाला शेतसारा देण्यास नकार दिला.

धर्माजींनी स्वातंत्र्याची आरोळी ठोकली आणि निजामाच्या पाया खालची जमीन सरकली.

त्याने ब्रिटिश फौजेला धर्माजींच्या उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. ११ जुलै १८१८ रोजी मूर्तझा यारजंग आणि लेफ्टनंट सदरलंड हे मोठं सैन्यबळ घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाले.

इकडे धर्माजी यांनी तयारी केली होती. त्यांनी पराक्रमी तरुणांची एक फळी उभी केली होती. ते स्वतः नेमबाजीत प्रवीण होते. या तरूणांना नेमबाजीच प्रशिक्षण देण्यात आलं होतं. युद्धासाठी बंदुका देखील जमवण्यात आल्या होत्या.

सदरलँडच्या सैन्याने हातोल्याला वेढा घातला.

धर्माजी यांनी गढीवरून त्याच्यावर हल्ला चढवला. या छोट्या गावातून आपल्याला एवढा प्रतिकार होईल याची सदरलँडला अपेक्षा नव्हती. तो स्वतः देखील या हल्ल्यात जखमी झाला होता.

सदरलँडने गढीचे बुरुज पाडायला तोफांचा वापर केला पण गढी मजबूत होती. मग त्याने सुरुंग लावले. त्यानंतर मात्र बुरुज ढासळू लागले. आपल्या आजारी भावाला वाचवण्यासाठी धर्माजींना गढी सोडणे भाग होते.

धर्माजींनी यशवंती नावाच्या घोड्यावर भावाला घेऊन तटावरून उडी मारली.

प्रतापराव बंधूनी डाबी गावाच्या किल्ल्यात आश्रय घेतला. हा किल्ला अनेक दिवस लढा देता येईल एवढा ताकदवान होता. धर्मजींनी हातात तुरी देऊन पळाल्याची बातमी मिळताच इंग्रज भडकले.

सदरलँडने रात्रीत सगळ सैन्य डाबी या गावी हलवलं. ३१ जुलै च्या पहाटे किल्ल्याला वेढा बसवला. दुपारपर्यंत किल्ला चढायला ३० फूट उंचीच्या शिड्या बनवण्यात आल्या. आठ तुकड्यांमध्ये सैन्य विभागण्यात आले.

उठावकरी यावेळी पळून जाऊ नयेत म्हणून मोक्याच्या जागी या तुकड्या तैनात करण्यात आल्या.

कृष्णपक्षाचे दिवस असल्यामुळे रात्रीच्या टेहळणीसाठी पन्नास सैनिकांना मशाली देऊन जवळच्या डोंगरावर पाठवण्यात आले. जमादार सर्दा खानाची एक आणि सदरलँडची एक अशी मुख्य दोन तुकड्यांची किल्ल्यावर हल्ला चढवला.

किल्ल्याचा प्रत्येक बुरुज जिंकायसाठी धर्माजींच्या योद्द्यांशी जोरदार लढाई केली. सदरलँड हा देखील चिकाटीचा सेनानी होता. त्याने उठावकर्त्यांना माघार घ्यायला लावली.

धर्माजी व त्यांच्या भावाला अटक करण्यात आली.

भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा शांत झाला. मात्र या उठावाच्या ज्योतीने अनेक ठिकाणी क्रांतीची स्फुल्लिंग पेटवली.

या वंजारी वीरांच्या पराक्रमाने ब्रिटिश अधिकारी सदरलँडदेखील भारावून गेला होता. त्याने त्यांच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले.

पण दुर्दैवाने देशासाठी रक्त सांडलेल्या या शूरवीर योध्यांची नावे इतिहासाच्या पानात हरवून गेली. त्यांचे एक परिपूर्ण स्मारक उभारून हा इतिहास नवीन पिढी पर्यंत पोहचवला पाहिजे ही मागणी बीडकरांकडून व्यक्त केली जाते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.