धर्मांतराचा कायदा कसा असतो, कसा धर्म बदलता येतो..?

उत्तरप्रदेशात सध्या लव जिहाद विरोधी कायद्यावरुन जाम दंगा चालू आहे. योगी सरकार या कायद्यावर ठाम आहे तर सरकारचे विरोधक आणि या कायद्याला विरोध असणारे अलाहाबादच्या न्यायालयात पोहोचले आहेत.

या कायद्यांन्व्ये ‘जबरदस्तीचे धर्मांतर बंदी आणि धर्मांतर केल्यास संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.

पण हा कायदा भारतीय राज्यघटनेने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याच्या विरोधात आहे असा आक्षेप घेत त्याला आव्हान देण्यात आले आहे.

त्यामुळे भारतीय संविधनाने धर्म स्वातंत्र्यचा नक्की कसा अधिकार दिला आहे ते आधी पाहूया.   

भारताच संविधान आपल्याला आपल्या मर्जीने धर्म मानण्याचं आणि तो बदलण्याच स्वातंत्र्य देते. संविधानाच्या कलम २५ ते २८ मध्ये धार्मिक स्वातंत्र्यचा अधिकार दिला आहे. म्हणजे ज्याची जी मर्जी आहे तो त्या धर्मात जावू शकतो. सोबतच कोणताही धर्म न स्वीकारता राहण्याचे देखील स्वातंत्र्य दिले आहे.

मग भारतात धर्म बदलायचा असल्यास काय करावे लागते?

भारतात धर्म बदलण्याच्या प्रमुख दोन पद्धती आहेत.

१) कायदेशीर प्रक्रियेद्वारे

२) धार्मिक प्रक्रियेद्वारे.

सगळ्यात आधी कायदेशीर पद्धत कशी असते ते पाहू.

धर्म बदलण्यासाठीची ही अत्यंत साधी आणि सरळ पद्धत आहे. त्यासाठी तीन सोप्या टप्प्यांमधून जावं लागत.

सगळ्यात आधी एक शपथपत्र भरुन द्यावे लागते जे की कोणत्याही कचेरीत किंवा वकिलाजवळ बनवून मिळते. या शपथपत्रात आपलं बदललेलं नाव आणि आपल्या स्वीकारायचा असलेला धर्म या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करायचा. सोबतच रहिवासाचा एखादा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे द्यावी लागतात. या शपथपत्राची नोटरी केली की पहिला टप्पा पुर्ण होतो.

यानंतर दुसऱ्या टप्प्यात एखाद्या राष्ट्रीय दैनिकात ज्याचा सर्कुलेशन चांगलं (दोन-तीन लाख) आहे अशा दैनिकात आपण धर्म बदलेल्याची माहिती द्यावी लागते. यासाठी २ ते ३ हजार रुपयांचा खर्च येतो.

तिसऱ्या आणि सगळ्या महत्वाच्या टप्प्यामध्ये आपण धर्म आणि नाव हे बदललं आहे. हे सरकार दफ्तरी नोंदवावे लागते. त्यासाठी गॅझेट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो. प्रत्येक जिल्ह्यात स्वतःच गॅझेट ऑफिस असते. जास्तीत जास्त ठिकाणी हे ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच असते.

इथे आपण धर्म बदलण्यासाठी तयार केलेले शपथपत्र, पेपरमध्ये दिलेल्या जाहिरातीचे कात्रण आणि दोन पासपोर्ट साईज फोटो जोडून अर्ज भरुन द्यायचा.

यानंतर धर्म बदलावर सरकारी मोहर उमटण्याची वाट बघायची. हा वेटिंग पिरेड कमीत कमी साठ दिवसांचा असतो. यानंतर नवीन नाव आणि धर्म गॅजेटेड होते. आणि त्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या धर्मात प्रवेश करु शकता.

आता धार्मिक प्रक्रियेद्वारे.

ही पद्धत धर्माप्रमाणे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागाप्रमाणे बदलत जाणारी आहे. त्यामुळे थोडी गुंतागुंतीची ठरती. याच्यात प्रत्येक धर्माच्या धार्मिक स्थळावर आणि संस्थांवर आपआपल्या हिशोबाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सांस्कृतीक विविधतेमुळे या पद्धती वेगळ्या आहेत. म्हणजे जी पद्धत उत्तर भारतात लागु पडते, तीच पद्धत दक्षिण भारतात लागू होत नाही.

१) हिंदू धर्म

जर कोणाला हिंदू धर्माचा स्विकार करायचा असल्यास असल्यास त्याची अधिकृतरित्या सुविधा प्रत्येक मंदिरामध्ये उपलब्ध नाही. उत्तर भारतातील काही मंदिरातील पुजारी सांगतात,

शुद्धीकरण संस्कार करून संबंधित व्यक्तीला हिंदू धर्मात परावर्तित केले जावू शकते.

तर संस्थानिक स्तरावर विश्व हिंदू परिषद आणि आर्य समाजाच्या काही मंदिरांमध्ये हिंदू धर्म स्वीकारण्याची सुविधा आहे. इथे जावून कोणत्याही व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारण्याची करण्याची इच्छा व्यक्त केली त्याच्यासाठी एक पूजा पद्धत ठरवून दिली जाते. आणि आहे त्याचं पालन करून कोणताही व्यक्ती हिंदू धर्मात येवू शकतो.

२) इस्लाम धर्म :

इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ही अशी ठराविक प्रक्रिया नाही. पण स्थानिक पातळीवर मस्जिदमध्ये याची व्यवस्था असते. जर कोणी इस्लाम धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला ‘कलमा’ वाचावा लागतो. त्यानंतर मस्जिदचा मौलवी संबंधित व्यक्तीला नमाज आणि अजान संबंधित माहिती देतो.

इस्लामिक धर्माच्या जाणकार व्यक्तीने आम्हाला सांगितले की,

आधीच्या काळात व्यक्ती इस्लाम धर्माचा स्विकार करण्याची इच्छा व्यक्त करायचा तेव्हा, संबंधित व्यक्तीला मस्जिदमध्ये मौलवी ‘तकरीर’च्या दरम्यान धर्मासंबंधित मुलभूत गोष्टी सांगायचे. आणि त्याचे आचरण करुन अधिकृतरित्या मुस्लिम समाजात आल्याचे जाहिर करायचे.

पण अलिकडच्या काळात असे धर्मांतर वादग्रस्त ठरु शकते त्यामुळे लोक हा मार्ग स्वीकारत नाहीत.

आणखी एक गोष्ट म्हणजे, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मस्जिदमध्येच जावं लागतं असं काही नाही. घरातही आपण प्रार्थना करू शकतो आणि इस्लाम धर्म स्वीकारू शकतो.

३) शीख धर्म.

शीख धर्म स्वीकारण्याची पद्धत खूपच सोपी आहे. आपल्या जवळच्या कोणत्याही गुरुद्वारात जाऊन तिथल्या ‘ग्रंथीं’शी संपर्क साधायचा. आणि त्यांना शीख धर्म स्वीकारणे बाबत आपली इच्छा असल्याचे सांगायचे.

यानंतर तो संबंधित व्यक्तीला शीख धर्माच्या संबंधित काही मूलभूत गोष्टींचे माहिती देतो आणि त्यांचं पालन करण्याची माहिती देतो.

केस वाढवणे आणि कडा धारण करणे ही सुरुवातीची प्रक्रिया असते.

जेव्हा ग्रंथीच्या लक्षात येईल की संबंधित व्यक्तीने शीख धर्माच्या मूळ संकल्पनेला समजून घेतले आहे तेव्हा ‘अमृत छकना’ प्रक्रिया सुरू होते. याला गुरुद्वारामध्ये ‘पंच प्यारे पुरी’ असं म्हणतात. यानंतर शीख धर्म धारण करणाऱ्या व्यक्तीला कच्छा, कृपाण आणि कंघी हे धारण करण्यासाठी दिलं जातं. शीख धर्म स्वीकारण्याची ही एक प्रकारची सामाजिक पद्धत आहे.

४) ख्रिश्चन :

ख्रिश्चन धर्मामध्ये सुरुवातीपासूनच असे मानले जाते की, कोणतीही व्यक्ती जन्मतः ख्रिश्चन नसते. तर त्याला ख्रिश्चन बनण्यासाठी बापतिस्माच्या प्रक्रियेतून जावं लागतं. कोणत्याही जवळच्या चर्चमध्ये जाऊन ख्रिश्चन बनण्याची इच्छा तेथील फादर ना दिली की फादर संबंधित व्यक्तीला धर्माच्या काही मूलभूत गोष्टी आणि त्याची प्रॅक्टिस करण्यास सांगतात.

जेव्हा फादर ना खात्री पटते की संबंधित व्यक्तीने आपण दिलेल्या धर्माचे ज्ञान आणि संकल्पना समजून घेतली आहे, तेव्हा त्याचा बापतिस्मा पुर्ण होतो.

या खास विधीनंतर औपचारीक पद्धतीने धर्म ग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर चर्चमध्ये धर्मात आलेल्या व्यक्तींची नोंद ठेवली जाते. जर कधी गरज लागली तर चर्च धर्मचे प्रमाणपत्र देखील देते.

जर धर्मात परत यायचे असल्यास काय प्रक्रिया आहे?

या बाबतीत प्रत्येक धर्म थोडासा संवेदनशील आहे. यावर आम्ही चारही धर्मांशी संबंधीत अभ्यासकांशी चर्चा केली. पण सगळ्यांच मत नकारात्मकच आलं. त्यांच म्हणण होत की, आधी एका धर्माला सोडून द्यायच आणि पुन्हा त्याच्यात परत यायच हे सामाजिक दृष्टीने काहीस अडचणीचे ठरु शकते.

पण सरकारी पद्धतीने धर्मवापसी करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला आहे.

धर्मात परत येण्याची अशी वेगळी पद्धत नाही. ज्या प्रमाणे धर्मात नवीन येवू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी जी प्रक्रिया लागू होते तिच प्रक्रिया धर्मात परतणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होते. पण शेवटी ही प्रक्रिया ज्या त्या धर्मावर आणि धार्मिक स्थळांवर अवलंबुन असते.

धर्म बदलल्यानंतर जातीचे काय होते ?

संविधानानुसार तुम्ही तुमचा धर्म बदलू शकता पण जात बदलण्यासाठी कोणतीही तरतूद नाही उदाहरण द्यायचं झालं तर अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीने शीख धर्म स्वीकारला तर त्याला सरकारी पातळीवर अनुसूचित जाती म्हणून मिळणाऱ्या सगळ्या सुविधा मिळत राहतील

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा आणि एमएम शांतानगौदर यांच्या खंडपीठाने एका महिला शिक्षिकेला केंद्रीय विद्यालयामध्ये मध्ये मिळणाऱ्या एस. सी. कॅटेगिरीचे आरक्षण रद्द केलं होतं. न्यायालयाने आरक्षण रद्द करताना कारण दिले होते की, संबंधित शिक्षिकेने अनुसूचित जातीमधील एका व्यक्ती सोबत लग्न केले होते. पण एखाद्या व्यक्तीच्या जातीला विवाहनंतर देखील बदललं जावू शकत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.