त्या दिवशी एक पत्रकार मुंबईच्या रेसकोर्सवर धावत होती आणि तिच्यामागे होते गरम धरमपाजी!!

एक काळ होता भारतात पेपर मध्ये आणि मासिकात बातम्या असायच्या. सिनेमा, क्रिकेट सारख्या एन्टरटेनमेंटच्या बातम्या सुद्धा सपक असायच्या. तो काळच  ब्लॅक अँड व्हाईट होता. अशाचं काळात एक तडकफडक मराठी मुलगी आली आणि पत्रकारितेचे सगळे नियम उडवून लावले. फक्त आपल्या लिखाणान ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाला रंगीत करून टाकलं. अनेक फिल्मस्टार्सचा बोऱ्या वाजवला, अनेकांना यशाच्या शिखरावर नेलं. अख्ख्या फिल्मइंडस्ट्रीला हलवून सोडलं.

तीच नाव देवयानी चौबळ.

खर तर तिला फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. वडील सुप्रसिध्द वकील. शाळेत असताना दिलीप कुमारच्या प्रेमात पडून ती सिनेमाची वेडी झाली. त्याच्याशी लग्न करायचं होतं. त्याची हिरोईन म्हणून सगळीकड मिरवायचं होतं. दिसायलाही ती देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज खपली असती.

पण दुर्दैव दिलीप कुमारने देवयानीला नकार दिला. देवयानी बिथरली. आधीच ती फटाकडी होती त्यात डोक्यात राग. सिनेमामध्ये करीयर सुद्धा झालं नाही. मग लिखाणाकडे वळली. अंगात भिनलेला सगळा जहर ती आपल्या लेखातून बाहेर काढू लागली. इंग्लिश वर तिची कमांड होतीच पण गरज पडेल तिथे हिंदी शब्द वापरून हिंग्लिश लिखाणाची पहिली सुरवात तिने भारतात केली.

स्टार अँड स्टाईल नावाच्या मॅगझीन मध्ये तीच ‘फ्रॅन्कली स्पिकिंग’ नावाचं कॉलम छापून येऊ लागलं. नावाप्रमाणेच बिनधास्त खुसखुशीत लेख, त्यातल्या तिखट जाळ गॉसिप गप्पा थोड्याच दिवसात पॉप्युलर झाल्या. लोक आवडीने या लेखांची वाट पाहू लागले आणि बॉलीवूड? बॉलीवूड तिच्या नावाने खडे फोडू लागले.

यात सगळ्यात आघाडीवर होता सुपरस्टार दिलीप कुमार ज्याने देवयानीला नाही म्हणायची हिंमत केली होती. देवयानी आपल्या प्रत्येक लेखात त्याला उभा आडवा सोलायची. तो म्हातारा होत चाललाय, त्याची जादू संपलीय याच्या चर्चा करायची. त्याने मुलगा व्हावा म्हणून आस्मा नावाच्या बाईशी दुसरा निकाह केला ही बातमी सुद्धा तिने फोडली.

दिलीप कुमार वैतागला. त्याने आपल्या फिल्मइंडस्ट्रीमधल्या सगळ्या दोस्तांना बजावलं की देवयानीला मुलाखत द्यायची नाही. पण ही अघोषित बंदी खूप काळ चालू शकली नाही. किती जरी नाव ठेवली तरी फिल्म इंडस्ट्रीला देवयानी चौबळ सारख्या पत्रकाराची गरज होतीच. देवयानी एकीकडे आणि बाकीचे फिल्म मगझीन एकीकडे. सगळ्यांच्यात ठसठसीत उठून दिसणाऱ्या देवयानीशी आपले संबंध चांगले राहावेत यासाठी सगळे फिल्मस्टार प्रयत्न करायचे.

रोज संध्याकाळी ती कुठल्या ना कुठल्या पार्टीमध्ये आपली ट्रेडमार्क पांढरी साडी नेसून आलेली देवयानी एखाद्या सम्राज्ञी वाटायची. त्या पार्टीशी काही देनघेन नसल्याप्रमाणे एखाद्या कोपऱ्यात आपला दरबार सजवायची. मोठे मोठे स्टार यायचे तिच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी तडफडायचे. नवे होतकरू कलाकार तिच्याभोवती घिरट्या घालायचे. 

आपल्या दरबाराची ती अनभिषिक्त राणी होती. दिलीपकुमारला संपवण्यात तिचा मोठा हात होता असं म्हटल जायचं. तिच्याशी व्यवस्थित बोलल नाही तर दुसऱ्या दिवशी ती आपल्या बद्दल काय छापेल सांगता येत नाही म्हणून सगळे हिरो, हिरोइन्स तिच्याशी तोंडदेखल आपुलकीने वागायचे.

अशातच आला राजेश खन्ना. आराधना या सिनेमावेळी देवयानीची आणि राजेश खन्नाची ओळख झाली. या भेटीत त्याने काय जादू केली नाहीत नाही पण देवयानी अगदी त्याच्या प्रेमात पडली. तसं पाहायला गेलं तर अख्ख्या देशातल्या पोरी तेव्हा राजेश खन्नाच्या प्रेमात होत्या, पण यात देवयानीचा मोठा हात होता.

इतरानां कायम शिव्या घालणारी फटाकडी देवयानी राजेश खन्नाबद्दल बोलताना मात्र नुसता कौतुक, विशेषणांचा भडीमार करायची. त्याला सुपरस्टार ही उपाधी पहिल्यांदा देवयानीनेचं दिली. तिच्या लेखात येणाऱ्या सुपरस्टार, सुपरस्टारया उल्लेखामुळे सगळे राजेश खन्नाला सुपरस्टार म्हणू लागले. 

देवयानी अगदी बिनधास्त होती. राजेश खन्नाबरोबरची मैत्री, त्याच्यावरच प्रेम कधी लपवायची नाही. आपण आयुष्यात एकाच पुरुषाबरोबर रात्र घालवली आहे तो म्हणजे राजेश खन्ना असं रोखठोक सांगायची. राजेशने मात्र अंजू महेंद्रू बरोबर देवयानी चौबळला सुद्धा गंडा घालून लग्न केलं तरुण डिम्पल कपाडिया बरोबर आणि ही बातमी पहिल्यांदा सांगितली देवयानीलाच.

पण राजेश खन्नावर चिडणे तिला शक्य नव्हते. तो तिच्यासाठी देव होता. राजेशने देखील तिच्यावरचा आपला कृपाशीर्वाद कधी काढून घेतला नाही. असं म्हणतात की देवयानी चौबळने चं आनंद बघितल्यावर त्याला सांगितलेलं की या सिनेमात त्याच्याबरोबर काम केलेला अमिताभ बच्चन पुढे जाऊन त्याची खुर्ची काढून घेऊ शकतो.

कोणी काहीही म्हणो पण तिला सिनेमा इंडस्ट्रीचं ज्ञान होतं. तिची दूरदृष्टी, तिची कलेची जाण मात्र बॉलीवूडच्या फायद्याची ठरली नाही. एकमेकाचे बीची गॉसिप सांगण्यासाठी तिचा आधार घेण्यापुरत इंडस्ट्रीमधल्या लोकांनी तिला वापरल. 

तिच्या लिखाणावर अनेक जण चिडायचे पण कोणी बोलयला जायचं नाही. दिलीप कुमार सारख्या अगदी काहीच जणांनी सभ्य प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला बाकीचे या चिखलात लाथ मारायला तयार नसायचे.

धरमपाजी सोडून.

तो काळ होता जेव्हा धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमामालिनीमध्ये काही तरी डाळ शिजतेय याची चर्चा सुरु होती. धरमपाजी शादीशुदा होते, तरी हेमाच्या पाठीमागे गोंडा घालणे त्यांच चाललेलं. हेमाच्या घरचे धर्मेंद्रसाठी तयार नव्हते आणि तिच्यापुढे अजून दोन तीन हिरोंचे ऑप्शन रेडी होते. अशात देवयानीच्या रडार वर फिल्म सेटवर रंगत असलेल्या या लव्हस्टोरीचा वास आला.

आता भुकेलेल्या अन्न मिळाल्यावर जसा अधाशाप्रमाणे खाईल तसं देवयानीचं झालं. तिने ही स्टोरी ब्रेक केली. पब्लिक सकाळच्या चहाबरोबर धर्मेंद्र आणि हेमामालिनीची खुसखुशीत प्रेमकथा वाचू लागले. सगळीकडे खळबळ उडाली. हेमाच्या घरचे सावध झाले. त्यांनी तिच्या बाहेर पडण्यावर लिमिट आणलं.

धरमपाजी गरम झाले.

तेव्हा मुंबईच्या रेसकोर्सवर कोयना भूकंप की बंगालचा दुष्काळ कशा बद्दल तरी सगळ्या फिल्मस्टार्सची रॅली निघणार होती. मोठेमोठे स्टार तर असणार होतेच पण ही बातमी कव्हर करायला पत्रकार देखील आले होते. अशातच धर्मेंद्र तिथे अवतरला. पतियाला पेग मारून तर्र होऊनच तो तिथे आला होता. त्याची नजर दोन जणांवर होती. 

यातला पहिला गुन्हेगार सापडला. त्याच नाव होतं कृष्णा. तो देखील पत्रकार होता. त्याने सुद्धा धरमपाजीची खोड काढली होती. कृष्णाला बघितल्यावर धर्मेंद्रची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने आपल्या पहिलवानी हाताने एक जोरदार ठोसा दिला. ते बिचार भेलकडून पडलं. त्याच टाळक फुटलं होतं. रक्तबंबाळ झालेल्या कृष्णाला धर्मेंद्र त्या अवस्थेतही ठोकत होता.

एव्हड्यात हा गोंधळ बघायला आलेल्या गर्दीत धर्मेंद्रला देवयानी चौबळ दिसली. हाताल्या कृष्णाला सोडून धरमपाजी देवयानीच्या मागे लागले. रेसकोर्सवर आपलं वजन सावरत देवयानी जीव वाचवण्यासाठी धावतीय आणि तिच्या मागे शिवीगाळ करत धर्मेंद्र लागलाय हे दृश्य दिसत होत.

“कुत्ती कमिनी मै तुम्हारा खून पी जाऊंगा.”

हे डायलॉग धर्मेंद्र खरोखर म्हटल्याचे पुरावे आहेत. पण देवयानी काय त्याच्या हाती लागली नाही. तिने लेडीज वॉशरूममध्ये आसरा घेतला, आतून दार लावून घेतलं. धरमपाजी दार तोडण्याचा प्रयत्न करत होते अखेर बाकीच्यांनी त्यांना रोखलं. तरी काहीजण दावा करतात की धर्मेंद्रने तिला एकदोन फटके दिलेच.

धर्मेंद्र विरुद्ध केलेल्या पोलीस कम्प्लेंटमध्ये तिने तसच सांगितलं होत. पण विशेष कारवाई झाली नाही. फिल्मइंडस्ट्रीतले लोक तर खुश होते की धर्मेंद्रने तिला चांगला धडा शिकवला. फक्त एक हिरोईन चिडली होती तीच म्हणण होतं की

” धर्मेंद्रने चूक केली. त्या नागिणीला जिवंत सोडलं. तिला ठार मारल पाहिजे होतं.”

बॉलीवूडमध्ये देवयानीबद्दल कोणालाही सहानुभूती नव्हती. पत्रकारांनी देखील म्हणावा तेव्हढा तिला पाठींबा दिला नाही. उलट खुशवंतसिंह सारखे जेष्ठ संपादक म्हणाले की धर्मेंद्रच्या जागी मी असतो तर मीही हेच केलं असत. 

हळूहळू देवयानीभोवतीच वलय कमी होत गेलं. तिच्या जागी शोभा राजाध्यक्ष उर्फ आजची शोभा डे यांनी घेतली. एका अर्थे या नव्या मुली तिच्या वारसदारच होत्या. देवयानीचं सिंहासन गेलं होतं.

पण एवढी वर्षे झाली तरी राजेश खन्ना विषयीच तीच एकतर्फी प्रेम कमी झालं नाही. त्याच्या साठी तिने डायट सुरु केलं होतं. पण याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला आणि त्यात पॅरालीसीसच्या अटॅकमुळे ती अगदीच गारद झाली. त्यातूनही तिने आपले फटाकेदार लिखाण चालूच ठेवले होते. या काळात धर्मेंद्र आणि सुनील दत्त यांनी तीला मदत केली.

असं म्हणतात की शेवटपर्यंत ती राजेश खन्नाच्या प्रेमातचं जगली. येणाऱ्या जाणाऱ्याना सांगायची, की राजेश मला रोज फुलं पाठवतो. त्याच्यासाठी मी बरी होणार.  पण एकदिवस एका छोट्याशा हॉस्पिटलच्या अंधाऱ्या खोलीत तिला एकाकी मृत्यू आला. देवयानी चौबळ नावाचं बॉलीवूडला हादरवून सोडणारं वादळ अवघ्या पन्नासवर्षाच्या आयुष्यानंतर शांत झालं. 

(देवयानी चौबळ वर लेख यावा अशी मागणी आमचे वाचक भिडू मंगेश निमकर यांनी केली होती.)

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Avinash Haldankar says

    बरे झाले, मेली अवदसा.
    अशा मुलींना जन्म देण्यापेक्षा टॉयलेट मध्ये फ्लश करून टाकलेले चांगले आहे.
    #CriticAvinash

Leave A Reply

Your email address will not be published.