चिलीम आणि कोंबडीच रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होतो अस म्हणतात.

सातारा जिल्ह्यातलं वाई. निसर्गाच देणं लाभलेलं हे शहर. तस या तालुक्याचं खूप कौतुक केलं जातं पण याच तालुक्यात असही एक ठिकाण आहे त्याची चर्चा उघड उघड न होता दबक्या आवाजात होत असते.

अस म्हणतात,

या ठिकाणी अमावस्येच्या रात्री एक पूजा चालते. तांत्रिक मांत्रिक या मंदिरात येतात. समोर काळी बाहुली असते. एक एक करत मंत्र म्हणला जातो. सांगणारे असही सांगतात की हा मंत्र २१ हजार वेळा म्हणला जातो. मंत्र कमी किंवा जास्त झाला तर तो मंत्र पुन्हा म्हणावा लागतो. रात्रभर हि पूजा चालते. एक एक करत समोरच्या बाहुलीत २१ सुया टोचल्या जातात. सर्व सोपस्कार झाले की ज्याच्या नावाने बाहुली असते तो खंगुन खंगुन मरतो.

आत्ता या असल्या अंधश्रद्धा म्हणजे सांगण्याच्या गोष्टी, भक्त सांगतात की धावजी पाटलाने काळुबाईची पूजा केली. वशीकरण, अघोरी विद्या हि भक्तांच्या भल्यासाठी वापरली. भूत, प्रेत, पिशाच्य बाधलं की लोक धावजी पाटलांचा धावा करतात. इतकं टोकाचं अस काहीच चालत नाही, तरीही या मंदिराला काळ्या जादूचं शक्तिपीठच समजलं जातं हे मात्र खरं.

सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं सुरूर गावातलं धावजी पाटील मंदिर.

या मंदीराची आख्यायिकाच काळ्या जादूशी संबधित असल्याने काळ्या जादूचं शक्तिपीठ म्हणूनच मंदिराला ओळख मिळाली. एखादी चिलीम आणि कोंबडीच ताज रक्त दिली की धावजी पाटील प्रसन्न होवून काम करतो अशी लोकांची (अंध) श्रद्धा. साहजिक लोक या ठिकाणी गर्दी करत असतात.

अस सांगतात की धावजी पाटलाचा जन्म हा अठराव्या शतकातला. महाभारतात पांडवांनी १४ वर्ष वनवास भोगल्यानंतर एक वर्ष अज्ञातवासात घालवलं होतं. त्या ठिकाणी आज पांडवजाई मंदिर असल्याच सांगितलं जातं. या गावाच्या परिसरात धावजी पाटलाचा जन्म झाला होता. धावजी मोठ्ठा झाला तसा त्याचा तंत्र, मंत्र, काळीविद्या याकडे कल वाढला. घरातल्यांनी त्याचं लग्न लावून दिलं. तरिही त्याच्यात काहीच बदल नव्हता. काही केल्या धावजी पाटील तंत्र,मंत्राचा नाद सोडून देत नव्हता.

अखरे बायकोला सोडून धावजी पाटील बंगालच्या दिशेने काळी जादू शिकण्यासाठी गेला. रानावनात भटकत असताना त्याला एका साधूनेच कलकत्याला जावून कालीमातेची पूजा करण्याचा सल्ला दिला होता अस सांगतात. धावजी कलकत्त्यात चौदा वर्ष राहिला. याच काळात तो काळी जादू, तंत्रविद्या यामध्ये माहिर झाला. भक्तांच्या मते कलकत्यात असताना त्याला कालीमातेने दृष्टांत देवू विद्या पुर्ण झाली आत्ता तू आपल्या घरी जावून लोकांची सेवा कर अस सांगितल्याचा दावा करत असतात.

१४ वर्षांनंतर धावजी पाटील पुन्हा आपल्या गावी आला. १४ वर्षांमध्ये एकदाही तोंड न दाखवलेल्या नवऱ्याला पाहून त्याची बायको त्याचा राग करु लागली. कुटूंब अर्ध्यावर सोडून गेल्यामुळे धावजी पाटलांना लोक छीथू करु लागले होते. धावजी पुन्हा आल्यानंतर त्याच्यापासून अंतर ठेवून राहण्यातच लोक धन्यता मानू लागले.

अशा वेळी एकदिवस शेतात नांगरणी चालू असताना धावजीने चमत्कार दाखवल्याच सांगितलं जातं.

एक शेतकरी आपल्या शेतात चार बैलजोड्या घेवून नांगऱणी करु लागला होता. अचानक धावजी पाटलांनी पुकारा केला. बैलांचे दोर घेतले आणि आकाशात भिरकावले त्या सोबत आठही बैल दोरांबरोबर आकाशात झेपावले. ते आकाशात गोल गोल फिरू लागले. हि दंतकथा धावजी पाटलांसोबत जोडली गेली आणि धावजी पाटील लोकांचे देव झाले.

धावजी पाटलांकडे काळीविद्या आहे. ते काहीही करु शकतात म्हणून लोक त्यांच्याकडे गर्दी करु लागले. स्वत:च्या फायद्यासोबत दूसऱ्याच्या नुकसानासाठी लोकांची गर्दी होवू लागली. धावजी काळ्या जादूने लोकाना चमत्कार दाखवू लागले. काही काळासाठी लोक भक्त झाले पण पुन्हा धावजी पाटलांची भितीच जास्त बसली. काळी जादू, अघोरी मंत्र म्हणून लोकांनी धावजी पाटलांसोबत फारकत घेतली.

धावजी पाटलांनी या काळात पुन्हा कालीमातेचा उपासना चालू केली.

त्यांच्या चमत्कारांना पाहून त्यांचे कुटूंब देखील त्यांना भिऊ लागले होते. कालीमातेची पूजा केल्यानंतर कालीमाता त्यांना प्रसन्न झाली व तिने काळूबाईला शरण जाण्यास सांगितले. काळूबाईला प्रसन्न करुन धावजी पाटलांनी काळूबाईला जिवंत समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली.

सन, १८६८ साली धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली.

त्यानंतर समाधीस्थळी त्यावेळीच्या प्रथेप्रमाणे धावजी पाटलांची पत्नी सती गेली. धावजी पाटलांच्या समाधीस्थळावर येवून लोक डोकं टेकवू लागले. आपल्या इच्छा, आकांक्षा सांगू लागले. त्यासाठी मार्ग होता तो म्हणजे समाधीस्थळावर लिंबू मिरच्या ठेवणं, चिलीम देणं आणि कोंबडीच रक्त ओतनं. कालांतराने हा प्रकार वाढत गेला आणि धावजी पाटलांच मंदिर झालं. हे मंदिर पुढे काळ्याजादूसाठी, वषीकरणासाठी उल्लेखलं जावू लागलं.

भक्तांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी धावजीने समाधी जाताना आपला शिपाई चिडोबाला जवळची जागा दिली होती. चिडोबाच्या निधनानंतर तिथे चिडोबाच मंदिर उभा राहिलं. धावजी पाटलांच्या आशिर्वादाने भूतबाधा तर होतच नाही पण आपल्या किरकोळ समस्या देखील दूर होत असल्याचा लोकांचा समज होत गेला आणि आजूबाजूला कैकाडी बाबा, लमाण बाबा अशी मंदिरे वाढत गेली. सर्वच मंदिरांमधून दारू, मटण, चिलीम, अंडी यांचा नैवैद्य देण्यात येवू लागला.

हळुहळु या ठिकाणी कोंबडा आणि बकरे कापण्यास सुरवात झाली. धावजी पाटलांचा धावा केला की आपल्या मागे लागलेली भूतबाधा नाहीशी होते हा समज सर्वदूर पोहचला. शत्रू वशीकरण, विनाश कार्य अशा अडचणींसाठी लोक धावजी पाटलांना प्रसन्न करु लागले, आणि हि जागा काळ्या जादू आणि वशीकरणासाठी ओळखली जाते.

  • आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी टाकत नाही, आणि मानत देखील नाही. मुळात अशा अफवांना बळी पडून सर्वसामान्यांची लुबाडणूक केली जाते असे आमचे ठाम मत आहे  इथे फक्त ज्या कथा आहेत त्याच मांडण्यात आल्या आहेत

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.