जान्हवी,सारा, सुहाना असले स्टार किड्स शिकतात त्या अंबानींच्या शाळेची फी किती आहे ?

आपल्यातल्या कोणाकडे लई पैसा आला तर ‘काय अंबानीच्या रांगेत जाणार का?’ हे वाक्य अगदी सहजपणे ऐकायला येतं. म्हणजे पैसे आणि अंबानी हे दोन शब्द एकामागे एक जोडूनच येतात आणि कारणही तितकंच साधं आहे ते म्हणजे अंबानी यांच्याकडे असलेला पैसा.

भारतातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी यांच्यानंतर मुकेश अंबानी यांचं नाव येत आणि त्यांची संपत्ती पाहून कोणाचेही डोळे फिरू शकतात. त्यांच्याकडे असलेली संपत्ती, गाड्या, बंगले, चकाचक आयुष्य, यांची नेहमीच चर्चा होत असते पण अंबानी यांची एक गोष्ट जी तितकीच प्रसिद्ध आहे ती म्हणजे त्यांनी सुरु केलेली शाळा.

शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी उत्तम आणि परिपूर्ण देण्याकडेच पालकांचा नेहमी भर असतो. कितीही फी असली तर पालक आपल्या मुलांसाठी चांगल्यातली चांगली शाळाच शोधून काढतात. मुंबईत अंबानी यांनी सुरु केलेली शाळा तर प्रसिद्ध आहेच आणि या शाळेत आपल्या मुलामुलींनी शिकावं अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते.

मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या नावाने सुरु केलेल्या या शाळेचं नाव आहे, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल.

मुंबईच्या वांद्रे परिसरात ट्रायडन्ट रोड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागात ही शाळा आहे. मुंबईतल्या अत्यंत महागड्या शाळांच्या यादीत धीरूभाई अंबानी शाळा महत्त्वाचं नाव आहे.

२००३ मध्ये स्थापन झालेली ही शाळा IB वर्ल्ड स्कुलच्या यादीत मोडली जाते. इथे पूर्ण प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण दिलं जातं तसंच डिप्लोमा प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. या शाळेत ICSE, IGCSE, IB World Diploma असे विभाग उपलब्ध आहेत.

आधी आपल्याकडे मराठी विरुद्ध इंग्रजी माध्यम असा शाळांचा वाद असायचा. मराठी शाळांमध्ये सुविधा नाहीत वैगेरे असं कानावर येत असतं म्हणून इंग्रजी शाळेचं पारडं जड होतं. मग इंग्रजी माध्यमात पण SSC बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड आले आणि त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली.

प्रत्येक शाळा आपल्याकडे असलेल्या सोयी सुविधांबद्दल बोलत असतेच पण आपल्या मुलांनी सुद्धा या शाळेत शिकावं असं वातावरण धीरूभाई अंबानी शाळेचं आहे. ही सात मजल्यांची प्रशस्त शाळा आहे. तसंच अनेक सोयी सुविधांनी युक्त अशा शाळेत ऍस्ट्रो-टर्फ फुटबॉल फिल्ड, दोन प्रशस्त डायनिंग हॉल, सौर उर्जेवर चालणारे वॉटर हिटर सुद्धा आहेत.

या शाळेत अनेक मोठे सेलिब्रिटी, कलाकार, उच्भ्रू घरातली मुलं शिकायला येतात त्यामुळे ही शाळा आकर्षणाचा बिंदू ठरते. या शाळेत किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, मुलगा अब्राहम खान, हृतिक रोशनची मुलं ह्रिधान आणि रेहान, श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी आणि ख़ुशी कपूर, अभिषेक बच्चन ऐश्वर्या राय-बच्चन यांची लेक आराध्या, सैफ अली खानची मुलं सारा अली खान आणि इब्राहिम खान यांनी शिक्षण घेतलं आहे.

मुंबईच्या नंबर वन शाळांच्या यादीत नंबर एकवर राहायचं स्थान या शाळेने ४ वर्षांपेक्षा जास्त वेळा कायम ठेवलंय, तर प्रथम क्रमांकाची इंटरनॅशनल शाळा म्हणून सुद्धा ७ वर्ष या शाळेचं स्थान होतं असं सांगितलं जातं. या शाळेच्या चेअरपर्सन नीता अंबानी आहेत तर त्यांची बहीण ममता या याच शाळेत शिक्षिका आहेत.

आता शाळा नंबर एकची आहे म्हणजे फी सुद्धा तगडीच असणार नाही का! या शाळेची फी नेमकी किती आहे जाणून घेऊया.

या शाळेत LKG म्हणजे ज्याला साध्या भाषेत बालवाडी म्हणतात तिथपासून ते सातवीपर्यंतची वार्षिक फी १.७० लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं.

८ वी ते १० वी ची ICSE बोर्डाची वार्षिक फी १.८५ लाख आहे तर IGCSE ची वार्षिक फी ५.९ लाख रुपये आहे. यापुढे जाऊन ११ वी आणि १२ वी ची वार्षिक फी (IBDP) ९.६५ लाख रुपये आहे.

 मुंबई मिररच्या एका रिपोर्टनुसार पालकांना वर्षाला २४ लाख रुपये डिपॉजिट करावे लागतात असं समोर आलं आहे.

आता एवढी फी मध्यमवर्गीयांना परवडणारी आहे का हा एक प्रश्न आहेच. सध्या या शाळेत हजारोंच्या घरात मुलं शिक्षण घेत आहेत. शाळेचं एकूण नाव बघता या शाळेत आपल्या मुलांनी शिकावं अशी इच्छा असणारे पालक सुद्धा मोठ्या संख्येने आहेत.

हे ही वाच भिडू-

Leave A Reply

Your email address will not be published.