धीरुभाई अंबानी : जिंकणाऱ्या माणसाच्या पराभवाचा किस्सा.

आकाशात उडणारा कधीतरी जमिनीवर येतोच. पण त्याच नाव धीरूभाई अंबानी असेल तर ते शक्य नसतय. धीरूभाई अंबानी या नावाबरोबर फक्त आणि फक्त विजय इतकच लिहलं गेलय. पराभव त्या माणसाला मान्य नव्हता. गुजरातच्या गावापासून ते मुंबई व्हाया दुबई सगळीकडे धीरूभाई अंबानींच्या विजयाचेच किस्से आहेत.

पण कुणाचा ना कुणाचा कधीतरी पराभव होतोच. त्या पराभवच्या किस्स्यात त्या माणसांचे खरे रंग लपलेले असतात.

असाच एक किस्सा धीरुभाई अंबानी यांचा कर्मचाऱ्यांकडून झालेल्या पराभवाचा. 

या किस्याच वर्णन गीता पीरामल यांनी आपलं पुस्तक बिझनेस महाराजाज मध्ये केलं आहे आणि त्याची हेडलाईन दिली आहे “कॉर्पेरेट डेमोक्रेसी”. 

पराभवाची सुरवात होते L&T अर्थात लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीपासून.

एल अॅण्ड टी या कंपनीची स्थापना हेन्निंग होल्क लार्सन आणि क्रिस्टियन टुब्रो या दोन इंजिनियरनी मिळून १९३८ साली केली होती, पण १९८० च्या दशकात या दोघांच नाव फक्त कंपनीच्या ब्रॅण्ड पुरतच मर्यादित राहिलं होतं. वरिष्ठ अधिकारी व डायरेक्टर बोर्ड्स यांच्या ताब्यात पुर्णपणे कंपनीचा कारभार गेला होता. 

कंपनीचा ताबा कोणाकडे जाणारा याचा विचार करुन डायरेक्टर बोर्ड्स मध्ये दोन गट पडले होते. हे गट एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करुन एकमेकांना खाली खेचण्याचा प्रयत्न करत असत. रोज एका व्यक्तीने कंपनीचा खाजगी फायदा कसा घेतला याच्या चर्चा वर्तमान पत्रात छापून येवू लागल्या होत्या. कंपनी होत असलेल्या या भांडणाचा फायदा घेवून L&T सारखी प्रतिष्ठित कंपनी आपण ताब्यात घेवू शकतो हे स्वप्न दुबईतले व्यापारी मनु छाबडिया होता. 

मनु छाबडियाने एक गेम केला होता, कंपनीचे शेअर्स हळुहळु विकत घेवून कंपनीवर आपला होल्ड निर्माण करायचा. याच रस्त्याने मनु छाबडिया कंपनीचे शेअर्स विकत घेवू लागला. याचा सर्वात पहिला वास लागला तो चेअरमन असणाऱ्या एनएम देसाई यांना. देसाई यांनी प्लॅन बी आखला. त्यांनी ठरवलं की असा एक व्यक्ती हवा ज्याच्याकडे कंपनीचे शेअर्स देखील असतील पण तो फक्त बाहेरून सपोर्ट करेल. कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही व उद्या कंपनीचा ताबा घेण्याची स्वप्न देखील पाहणार नाही.

देसाई यांनी आपले मित्र धीरुभाई अंबानी यांना हि ऑफर दिली. अंबानी तात्काळ तयार झाले आणि देसाई इथेच फसले.  

L&T त्या काळातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक होती. अशी कंपनी आपल्या अधिपत्याखाली आणणं हे धीरुभाई अंबानी यांच स्वप्न नसेल म्हणणं हा मुर्खपणा होता. तो देसाई यांनी केला. धीरूभाई अंबानी यांनी साम-दाम-दंड-भेद वापरुन मार्ग काढून कंपनीचे शेअर्स विकत घेण्यास सुरवात केली. १९८७ साली ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात ८० कोटी रुपये लावून धिरूभाई अंबानी यांनी कंपनीचे १२.४ टक्के शेअर्स विकत घेतले होते. यातही दुबईचा व्यापारी मनुभाई छाबडिया याला भिती घालण्यासाठी त्याच्याही कंपनीचे शेअर्स विकत घेण्यात सुरवात केली होती. साहजिक अंबानी पुढे छाबडीया आपोआप स्पर्धेतून बाहेर फेकले गेले. 

त्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्सचे दोन ट्रस्टी, वकिल एमएल भक्त आणि मुकेश अंबानी अशा चौघांना L&T च्या डायरेक्टर मध्ये घुसवलं.  

हळुहळु अंबानी यांनी १८.५ टक्के शेअर्स खरेदी करुन कंपनीवर आपलं बस्तान बसवलं. १९८९ नंतर कंपनीचे चेअरमन असणाऱ्या देसाई यांची उचलबांगडी झाली,

व त्याठिकाणी नवे चेअरमन आले त्यांच नाव होत, मिस्टर धीरूभाई अंबानी. 

चेअरमन होताच धीरूभाई अंबानी यांनी आपले ओरिजनल रंग दाखवण्यास सुरवात केली. L&T सोबत त्यांच भावनात्मक नात असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रिजला ५७० कोटींच सप्लायर्स क्रेडिट दिलं. L&T मार्फत रिलायन्समध्ये ७८ कोटी रुपयांची गुतवणूक केली. रिलायन्स इंडस्ट्रीज चा पेट्रोकेमिकल प्रोजेक्टचं ३०० कोटींच टेंडर L&T ला देण्यात आलं. जे अंत्यत कमी किंमतीत काम करुन घेण्यासाठी होतं. 

आत्ता या गोष्टीत आले पत्रकार. 

साहजिक तिकडे उत्पाद चालू झाला आहे आणि पत्रकार शांत बसतील का.?  रामनाथ गोयंका यांचे पट्टशिष्य म्हणून नावाजलेले एस गुरूमूर्ति यांनी या सगळ्या राड्यामध्ये इंटरेस्ट घेतला. त्यांना कागदपत्रांमध्ये गडबड दिसली व त्यांनी ती छापली. ती गडबड पाहून सरकार देखील हादरून गेलं. 

शेअर खरेदी करताना झोलझाल करण्यात आले होते. 

रिलायन्स वाल्यांची एक सहयोगी कंपनी होती तृष्णा इन्वेस्टमेंटस. अजून एक कंपनी होती बॉबे पिक्सल. या दोन कंपन्यांना हाताला धरून राडे करण्यात आले होते. १९८८ साली रिलायस च्या चार सहयोगी कंपन्या होत्या स्काईलैब डिटर्जैंट, ऑस्कर केमिकल्स, मैक्सवैल डाईज आणि पोलैब सिंथेटिक. या चार कंपन्यांनी मिळून ३० कोटी रुपये शेअर दलाली करणाऱ्या वीबी फायनेंसिएल सर्विस या कंपनीकडे जमा केले होते. 

या कंपनीने ते पैसे बॉब पिक्सलमध्ये गुंतवले. आणि बॉब पिक्सल या कंपनीने तेच पैसे L&T चे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरले होते. टोटल ३०.५ लाख शेअर्स खरेदी करण्यात आले होते. तर बाजारातून ४० हजार शेअर्स खरेदी करण्यात आले होते. 

आत्ता उलटा प्रवास सुरू झाला वीबी फायनान्स सर्विसनं टोटल ३०.९ लाख शेअर्स बॉब पिक्सलकडून विकत घेतले आणि रिलायन्स कंपनीला विकून टाकले. हेच शेअर्स रिलायन्स कंपनीला L&T वर दावा ठोकायला बास होते. पत्रकार असणारा गुरूमुर्तींना माहित होतं संस्थेचे इन्वेस्टर आपले शेअर्स कुठल्याही खाजगी पार्टीला विकू शकत नाहीत. 

(दम लागला असला तर पाणी पिवून घ्या, पुढ तर खरा राडाया) 

गुरूमुर्तीनी एक लेख लिहला त्यात लिहलं की गुजरात मधल्या हजीरा येथे रिलाएंसचा जो पेट्रोकेमिकलचा प्लांट चालूय तो L&T च्या ८०० कोटींच्या डिंबेचर इश्यूवरती चालू आहे. मग राडा चालू झाला. आणि प्रकरण कोर्टात गेलं. 

सुप्रीम कोर्टात राम जेठमलानी यांनी प्रुव्ह केलं की कशाप्रकारे रिलायन्सने अनियमितपणे शेअर्स खरेदी करुन L&T चा ताबा घेतला आहे. या प्रकरणात बॉब पिस्कलच्या चेअरमन प्रेमजीत सिंह यांनी देखील गुत्तेदारी केली आहे वगैरे वगैरे. कोर्ट निर्णय देणार तेच सरकारनं आपली कारवाई करण्यास सुरवात केली.

त्याच कारण होतं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं तेव्हा डिसेंबर १९८९ मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून व्हिपी सिंग यांनी शपथ घेतली होती. आणि व्हिपी सिंग आणि रिलायन्स यांच आधीपासूनच वाकड होतं. व्हिपी सिंग यांनी सत्तेवर येतात बॉब पिक्सलचे चेअरमन प्रेमजीत सिंह आणि UTI चे प्रमुख मनोहर फेरवानी यांनी घरला पाठवलं. 

आत्ता रिलायन्सला प्रकरण जड चाललं होतं, रिलायन्सने काय केल तर नानफा नातोटा स्किमवर आम्ही शेअर्स परत करतो म्हणून सांगितल. हे शेअर्स त्यांना बॉब पिक्सलला परत द्यावे लागणार होते. पण सरकार ऐकायला तयार नव्हत शेवटी नाय होय करत रिलायन्सला १२ कोटीं रुपये तोट्यावर हे शेअर्स पुन्हा बॉब पिक्सलच्या हवाली करावे लागले. 

आत्ता राडा होता L&T कुणाची.. 

राम जेठमलानी डोक्यानं हुशार माणूस. त्याने लगेच बैठक बोलवायची आयडिया दिली. १० टक्यांहून अधिक शेअर्स असणारा कोणीपण व्यक्ती डायरेक्टर्सची मिटींग बोलवू शकत होता. तिकडं सरकारने पण LIC मार्फत मिटींग घ्यायला सांगितलं कारण LIC कडे पण दहा टक्याहून अधिक शेअर्स होते. मिटींग बसली आणि धिरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि भक्त यांना चेअरमन व डायरेक्टर्स पदावरुन काढण्यात याव असा ठराव झाला. 

आत्ता पेटला गडी इरेला टाईप अंबानी यांनी पत्रकार परिषद बोलवली. 

पत्रकार परिषदेच नेतृत्व केल मुकेश अंबानी यांनी. आणि इथच डाव गंडला. मुकेश अंबानी आत्ता राजदिप सरदेसाई यांना निरुत्तर करत असतील पण तेव्हा तस नव्हतं. तरुण सळसळतं रक्त पेटलं आणि उलटसुलट बोलून आलं. पोरगच गंडतय म्हणल्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी एक पाऊल माग यायचं ठरवलं आणि L&T च्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर DN घोष यांना चेअरमन करण्यात आलं.  

डिएन घोष हा स्टेट बॅंकेचा माणूस होता. माणूस म्हणजे थेट चेअरमन होता. चेअरमन होताच त्यांनी रिलाएन्सला सप्लायर क्रेडिटच्या दिल्या जाणाऱ्या सुविधा बंद केल्या. रिलायन्सचे जे शेअर L&T ने विकत घेतलेले ते बाजारात विकून टाकले. त्यातनं रिलायन्स जोराचा धक्का लागला. आत्ता रिलायन्स बुडतय अस वाटत असतानाचा एक खेळ झाला, 

भारताचे पंतप्रधान बदलले आत्ता नोव्हेंबर १९९० मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान झाले. अनिल अंबानींच लग्न ठरल्यालं त्याच काळात घोष साहेबांनी राजीनामा दिला. आत्ता सगळा डाव पुन्हा अंबानी यांच्या पारड्यात फिरला. 

आत्ता धिरुभाई यांची वेळ होती, अडचणीत असलेल्या सत्तेत खेळ करण्यापेक्षा जरा निवांत म्हणून त्यांनी वेळ काढला. तिकडे सुप्रीम कोर्टातस देखील अंबानी यांच्या विरोधात पक्क अस काहीच घावत नव्हतं. राव यांच सरकार सत्तेत आल्यानंतर खेळाला पुन्हा सुरवात झाली आत्ता पुन्हा मिटींग बसवायची आणि डायरेक्टर करायचं असा प्लॅन करण्यात आला. 

पोरगीच्या लग्नासाठी जितकी तयारी केली नसेल तितकी तयारी मुकेश अंबानी यांनी केली.

धीरभाई अंबानी यांना चेअरमन करण्यासाठी मुकेश आणि अनिल करण-अर्जूनसारखे मैदानात उतरले होते. त्यांनी ८०० लोकांच्या सोबत घेवून ८३००० प्रॉक्सी फॉर्म भरून घेतले होते. पण संस्थांमार्फत शेअरहोल्डर असणारे डायरेक्टर अंबानी यांच्या निवडीच्या विरोधात होते. सभा भरली आणि पेटली. जोरदार वाद झाला आणि LIC ला पुढाकार घेवून हि सभा रद्द करावी लागली. पुढची तारिख देण्यात आली. 

या घटनेनंतर आपलं वित्त मंत्रालय जाग झालं आणि त्यांनी तृष्णा इन्वेस्टमेंट वाल्यांना सांगितल की तुम्ही राडा केला आहे तुम्ही राजीनामा द्या. झालं अंबानी खुर्चीच्या जवळ येता येता राहिले. 

या काळात L&T बिना चेअरमनची होती. आत्ता समोर आले ते कंपनीचे संस्थापक लार्सन आणि टुब्रो. या दोघांनी सरकार पत्र पाठवून सल्ला दिली की कंपनीचे मॅनेंजिंग डायरेक्टर यूवी राव यांना चेअरमन करावं. त्या दोघांचा हा सल्ला कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोड्यात टाकणारा होता कारण युवी राव तर अंबानी यांच्या जवळचे होते. धीरुभाई यांनी राव यांना चेअरमन करायच म्हणल्यानंतर होकार दिला. हिकडे कंपनीचाच माणूस म्हणून इतरांनी देखील होकार भरला आणि राव चेअरमन झाले. 

आत्ता पाठीत खंजीर टाईप प्रकार झाला तो अंबानी यांच्यासोबत. अंबानी यांना वाटलं आपला माणूस पण हा माणूस होता फक्त कंपनीचा. कंपनीच्या संस्थापकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला बघून यांनी अंबानी यांना थेट रस्ता दाखवण्यास सुरवात केली. 

मग काय अंबानी शांत झाले. प्रकरण शांत झालं. तब्बल १० वर्ष प्रकरण शांतच राहिलं. 

नोव्हेंबर २००१. अंबानी यांनी शेवटचा डाव खेळला. आपला १०.५ चा हिस्सा कुमार बिर्ला यांच्या ग्रेसिम कंपनीला विकला. ग्रैसिम हि सिमेंटची कंपनी L&T च्या थेट विरोधातील कंपनी होती. आणि ग्रैसिमला L&T ताब्यात घ्यायची होती. 

आत्ता हा शेवटचा डाव खेळतात ते कंपनीचे कर्मचारी. L&T चे CEO असतात NM नाईक. गुजरातमधलेच असणारे नाईक सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या बाजूने करतात. कर्मचाऱ्यांना सांगतात की तुम्हीच या कंपनीचे मालक आहात. आपण बिर्ला कंपनीच्या प्रवेशाला विरोध करायला हवा. त्याच सोबत इतके पंतप्रधानांपासून LIC पर्यन्त प्रत्येकांच्या भेटी घेवून कंपनीला वाचवायचे असेल तर बिर्लांना लांब ठेवायला हवं याच आवाहन करु लागतात.  

२००३ ला मांडवली झाली. कर्मचाऱ्यांचा ट्रस्ट करुन बिर्लांनी ते शेअर्स कर्मचाऱ्यांच्या ट्रस्टला दिले तर त्याबदल्यात L&T ची सिमेंटची विंग ताब्यात घेतली तिच नाव अल्ट्राटेक. 

आत्ता कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ट्रस्टकडे १२ टक्के शेअर्स आहे. थोडक्यात हे कर्मचारीच कंपनीचे मालक आहेत. आणि अंबानी या इतिहासात एक पराभूत सेनापती.   

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.