‘चार आण्याचा जरी तोटा झाला तरी माझ्याकडे या’, या वाक्यावर धीरुभाईंनी विमल ब्रॅन्ड उभा केला

आज ज्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव पोरगं न् पोरगं सांगु शकतयं, त्याच कारण धीरुभाई अंबानींने हे साम्राज्य उभं करण्यासाठी घेतलेलं कष्ट. धीरुभाई कायम चार पावलं पुढचा विचार करणारा माणूस. त्यामुळेच ज्या व्यवसायावर हात ठेवला तो यशस्वी. म्हणूनच त्यांच्या नावाबरोबर फक्त आणि फक्त विजयच आहे.

गुजरातपासून मुंबई ते अगदी दुबईपर्यंत ‘उनके नाम का डंका’ आणि यशाचे किस्से आहेत. यात ५०० रुपये खिशातुन घेवून मरेपर्तंत ७५ हजार कोटींची संपत्ती, शेअर मार्केट बंद पाडण्याचे असे अनेक किस्से सांगितले जातात. असाच एक किस्सा आहे विमलच टेक्सटाईल्सचा. जो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

धीरुभाई अंबानी जेव्हा यमनमधून भारतात आले, तेव्हा त्यांनी देशातील व्यापाराचा बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की देशात पॉलिस्टरच्या कपड्यांची मागणी लक्षणीय आहे. पण पुरवठादार एक-दोनच आहेत. हाच धागा पकडून त्यांनी १९६६ मध्ये एक टेक्सटाईल कंपनी सुरु करण्याचे ठरवले.

पण आता प्रश्न होता धाग्याचा. मग त्यांना या अडचणीत देखील बिझनेस दिसला. त्या काळात भारताबाहेर भारतातील मसाल्याच्या पदार्थांची मागणी जास्त होती. हे पाहून त्यांनी भारतातुन मसाल्याचे पदार्थ पाठवायचे आणि त्या बदल्यात तिथून पॉलिस्टर मागावायचे असा नवीनच उद्योग सुरु केला.

धाग्याचा प्रश्न सुटल्यानंतर १९७० च्या आसपास आपल्या भावाच्या नावाने विमल सूटिंग शर्टिंग नावाने एक टेक्सटाईलची कंपनी अहमदाबादच्या नरौदामध्ये सुरु केली. या कंपनीचा आढावा घेण्यासाठी ते प्रत्येक आठवड्याला मुंबईवरुन अहमदाबादला येत असतं. इथे ते कंपनीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सगळ्या अडचणी समजून घेत आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करत.

मशीन लावून कपड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर चालू झाले. पण ते जेव्हा बाजारात पाठवायची वेळ आली तेव्हा इतर व्यापाऱ्यांनी आडवे लावले. सगळ्या रिटेलर्सला निरोप पोहचवला गेला की, जर धीरुभाईंकडून कोणी माल खरेदी केला तर इथून पुढे त्यांना माल दिला जाणार नाही.

पण हार मानतील अन् थांबतील ते धीरुभाई कसले. त्यांनी देशभर फिरुन विक्रेत्यांना माल खरेदी करण्यासाठीचा विश्वास दिला. सगळ्या रिटेलर्सना शब्द दिला की,

जर त्यांचे चार आण्याचे जरी नुकसान झाले तर त्यांच्याकडे यायचे आणि फायदा झाला तर स्वतःकडे ठेवायचा.

सोबतच त्यांनी नवीन विक्रेत्यांना क्रेडिटवर माल देवून त्यांना व्यवसायात उतरवले.

या बोलण्यानंतर धीरुभाईंबद्दलचा व्यापाऱ्यांना विश्वास वाढत गेला. त्यांनी मुबलक प्रमाणात कपड्यांची खरेदी करायला सुरुवात केली. सोबतच पॉलिस्टरची क्वालिटी पण चांगली होती. शार्प ॲडव्हरटायझींग स्ट्रॅटेजीमुळे ब्रॅन्डचे नाव होवू लागले. यामुळे बाजारात विमलच्या कपड्यांची मागणी झटपट वाढली.

एक वेळ अशी आली की अंबानींनी देशभरामध्ये एका दिवसात विमलच्या १०० शोरुम्सचे उद्घाटन केले.

जागतिक बँकेच्या तज्ञ समितीने विमलच्या कपड्यांना वर्ल्‍ड क्वालिटीचा शेरा दिला. या टेक्सटाईल्स क्षेत्रातील यशानंतरच १९७३ च्या दरम्यान अंबानींनी रिलायंस इंडस्ट्रीज़ची स्थापना केली.

यानंतर अंबानींनी विमल ब्रॅन्डला देशातील नंबर वन टेक्‍सटाईल ब्रॅन्ड बनवण्यासाठीची धडपड सुरु केली. पण त्यापुर्वी नंबर वन पोजिशन होल्‍ड करणारी वाडिया यांना कोणत्याही परिस्थीतीमध्ये अंबानींना वर येवून द्यायचे नव्हते. त्यातुन दोघांमध्ये वर्चस्ववादाचे श्रेय चालू झाले.

त्याकाळी लायन्संसची पद्धत होती. १९७७-७८ च्या दरम्यान जनता पक्षाच्या सरकारकडून वाडियांनी ६० हजार टन DMT प्रोडक्शनचा परवाना मिळवला. पण अंबानी परवान्याच्या नादाला न लागता रिस्क घेवून उत्पादन चालू ठेवले. वाडियांकडून आरोप झाले पण धीरुबाईंनी आपले काम चालूच ठेवले.

रिलायन्सच्या स्थापनेनंतर उत्तरोत्तर विमल ब्रॅन्डची वाढ रिलायन्ससोबत होत राहिली. २०१३ पर्यंत जवळपास १७०० फ्रांचायझीमध्ये विमल ब्रॅन्डचा पसारा होता. मात्र २०१४ साली मुकेश अंबानी यांनी यातील ४९ टक्के शेअर्स चायनाच्या रुयी सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी या कंपनीला विकले. मात्र ५१ टक्के मालकी आजही मुकेश अंबानी यांच्याकडेच आहे.

विमलचा इतका मोठा पसारा असून देखील रिलायन्सचा एकूण वार्षिक उत्पन्नापैकी अवघा १ टक्काच उत्नन्न विमल पासून मिळत. थोडक्यात रिलायन्सपुढे विमलचा पसारा म्हणजे डोंगराच्या खाली मुंगी उभी राहिल्यासारखचं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.