धोंडोजीराजांच्या रक्ताळलेल्या मिशा इंग्रजांनी विजयचिन्ह म्हणून इंग्लडला नेल्या.

अठराव्या शतकाच्या अखेरीचा काळ. मराठेशाहीची पकड कमी होत चालली होती. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरवात केली होती.

गोष्ट आहे कर्नाटकातली. म्हैसूर राज्यातील चन्नेगिरी गावात काही महाराष्ट्रातुन स्थलांतरित झालेली कुटूंबे होती. यातल्याच पवार कुळात एक पराक्रमी योद्धा होता, त्याच नाव होतं धोंडोजी.

अख्ख्या पंचक्रोशीत त्याला धोंड्या वाघ म्हणून ओळखल जायचं.

धोंडोजी वाघ हैदरच्या कारकीर्दीत विष्णुपंडित नांवाच्या सरदाराच्या हाताखाली शिलेदार होता. परंतु बुद्धिमान व धाडशी असल्यामुळें लवकरच म्हैसूरच्या सैन्यांत वारगीर झाला. हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू या दोघांनी कर्नाटकात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं.

धोंडोजींंच्या तलवारीच्या बळावर टिपूने अनेक लढाया मारल्या होत्या. पण काही काळाने त्या दोघांच्यात मतभेद सुरू झाले.

टिपूचे कट्टर होत चालले धार्मिक धोरण स्वाभिमानी धोंडोजींंना पटणारे नव्हते.

धोंडोजीनी टिपूची नोकरी सोडली. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेजवळ मराठा तरुण गोळा केले. धारवाडजवळील लक्ष्मेश्वरच्या देसाई यांच्या मदतीने स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि स्वतःला राजा घोषित केले.

आसपासच्या गावातून करवसुली सुरू होती. जिथून कर देण्यास नकार मिळत होता तिथे गावे लुटण्यास सुरवात केली. यात टिपू सुलतानसोबतच सांगली इचलकरंजी येथील पेशव्यांच्या सरदारांवर जरब बसवला.

हावेरी, सावनूर व वगैरे गावे काबीज केली, इतर काही ठिकाणें उद्ध्वस्त केली.

एकाच वेळी पेशवे आणि टिपू सुलतान असे दोन मोठे शत्रू धोंडोजीनी अंगावर घेतले होते. धोंडोजीचे स्वतंत्र अस्तित्व पेशव्याना पसंत नव्हते.

१७९३ साली सरदार परशुरामभाऊंनीं धोंड्या वाघाचे पारिपत्य करण्यासाठी मोठें सैन्य पाठविलें.

दुर्दैवाने धोंडोजींचा पराभव झाला. त्यांना जीव वाचवून पळून जावे लागले. त्यांचे राज्य संपुष्टात आले.

रानोमाळ भटकत असणाऱ्या धोंडोजीना टिपू सुलतानने ताब्यात घेतले.

पण टिपू धूर्त होता. धोंडोजीना मारण्या पेक्षा त्यांच्या पराक्रमाचा उपयोग करून घेण्यात जास्त फायदा आहे हे त्याला ठाऊक होते. त्याने धोंडोजींना जीवनदान दिले पण बळजबरीने त्यांचे धर्मांतर केले.

पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत या नियमानुसार त्यांचे आणि टिपू सुलतानाचे मतभेद परत वाढले.

टिप्पूची गैरमर्जी होऊन धोंडोजी वाघ यांना बंदिवासात टाकले.

बरीच वर्षे त्यांनी टिपू सुलतानच्या कारागृहात काढली. पण १७९९ साली श्रीरंगपट्टण इंग्रजांनी जिंकले. टिपू सुलतान युद्धात ठार झाला. इंग्रजांनी त्याच्या ताब्यात असणाऱ्या कैद्यांबरोबर धोंडोजी वाघ यांचीदेखील सुटका केली.

बंदिवासांतून मुक्तता झाल्याबरोबर धोंडोजीनी टिप्पूच्या सैन्यांतून वाचलेले कांहीं शिपाई गोळा केले व आसपासच्या मुलखांत हल्ले करून परत आपले राज्य स्थापन केले.

बिदनूरचे नायकपद धोंडोजी वाघ यांच्याकडे आले.प्रजेमध्ये त्यांना उभय लोकाधिश्वर म्हणून ओळखत मिळाली.

आसपासच्या राज्यातील इतर नायकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण पेशव्याचा त्यांच्यावरील राग कमी झाला नव्हता.

कर्नाटकचा पेशव्यांचे सरसुभेदार धोंडोपंत गोखले यांनी एक वेळ त्याच्यावर अचानक छापा घालून त्याची छावणी लुटली.

परंतु धोंडोजी वाघ त्यांच्या हातांतून निसटले. त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींचा आश्रय घेतला. अस म्हणतात त्यांनी धोंडोपंताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली होती.

धोंडोपंत गोखल्यानां मारून त्यांच्या रक्तानें माझ्या मिशा तांबड्या करेन

धोंडोजी वाघाचा बंडखोरपणा दिवसेंदिवस वाढत चालला म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांनीं धोंडोपंत गोखले व सांगलीचे चिंतामणराव पटवर्धन यांना कित्तूरकडे पाठवले.

१३ जुलै १८०० रोजी दावणगीरी येथे धोंडोजी वाघाशी त्यांची लढाई झालीं.

पेशव्यांच्या सैन्याचा दारुण पराभव झाला. धोंडोपंत व त्यांचा एक पुतण्या हे दोघे मारले गेले धोंडोजींची प्रतिज्ञा पूर्ण झाली.

अख्ख्या कर्नाटकात त्याकाळी धोंडोजींएवढी प्रबळ सैन्यक्षमता कोणाकडे नव्हती.

अखेरीस त्यांचा निःपात करण्यासाठी दुसरा बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांची मदत घ्यायचे ठरवले. इंग्रजांना देखील धोंडोजी वाघ यांचा त्रास वाढला होता.

कर्नाटकावर संपूर्ण वर्चस्व मिळवण्यासाठी इंग्रजांनी पेशव्यांच्या मोहिमेत सहभाग घेतला.

ब्रिटिश सेनापती लॉर्ड आर्थर वेलस्लीने आपल्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

“धोंड्या वाघाला मिळणारा लोकांचा पाठिंबा वाढत चालला आहे. त्याचे बंड मोडून काढले नाही तर कंपनी सरकारला खूप मोठा धोका आहे. या माणसाचा विनाश ही आपल्यासाठी सर्वात मोठी गरज आहे.”

इंग्रज व पटवर्धनांची फौज कित्येक दिवस धोंडोजींचा पाठलाग करत होती, परंतु त्यांनी दाद दिली नाही.

त्यांचे सैन्य गनिमी काव्याने लढत होते. त्यांच्या वेगाला पकडणे इंग्रजांना जमत नव्हते. कित्तुर, कुंदगोळ, खानापूर, बदामी अशा अनेक गावांत त्यानी शत्रूला हुलकावणी दिलीच.

अखेर स्वकीयांच्या फितुरीचा परिणाम झालाच.

१० सप्टेंबर १८०० रोजी जनरल वेल्स्ली यानें धोंडोजी वाघ यांना कोंगल येथे गाठले व त्यांचा पराभव केला. या चकमकींतच धोंडोजी वाघ मारला गेला.असे सांगितलं जातं की,

” रक्तानें माखलेल्या धोंडोजीच्या मिशा वेल्स्लीनें विजयचिन्ह म्हणून इंग्लडास नेल्या “

नेपोलियन, टिपू सुलतान यांच्यावर विजय मिळवणारा लॉर्ड वेलस्ली धोंडोजी वाघ यांच्या पराक्रमावर प्रचंड प्रभावित झाला होता. धोंडोजीच्या मृत्यूनंतर त्यांच्या ४ वर्षांच्या मुलाला वेल्स्लीनें उदरनिर्वाहासाठी व शिक्षणासाठी स्वत: जवळचे ४०० पौंड दिले.

पण धोंडोजी वाघ यांचे महत्व भारतीय इतिहासकारांना कळलेच नाही. उलट मराठीतील विद्वान अभ्यासकांनी त्यांचे चित्र पेशवाईशी बंड करणारा लुटारू धोंड्या वाघ असे रंगवले. दुर्दैवाने धोंडोजी वाघ यांचे नाव इतिहासाच्या पानात हरवून गेले.

[पारसनीस सांगली संस्थान; बील; डफ; खरे, भा. १२]

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.