पाकिस्तानविरुध्दच्या मॅचमध्ये गांगुलीने घेतलेला तो निर्णय धोनीचं आयुष्य बदलवून गेला.

सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेटने पाहिलेले आजवरचे दोन महान कर्णधार. अनेकदा या दोघांच्या कप्तानीची तुलना केली जाते. एक इंग्लंडच्या लॉर्डसवर आपला शर्ट काढून विजयोत्सव साजरा करणारा चक्रीवादळ तर दुसरा सिक्स मारून वर्ल्डकप जिंकून दिल्यावरही अतिशय शांत निश्चल असणारा महासागर.

दोघांनीही आपल्या खेळामुळे क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य केलं.  

मॅच फिक्सिंगच्या गर्तेत अडकलेल्या भारतीय क्रिकेटला सौरव गांगुलीने बाहेर काढले. अनेक दिग्गजांच्या जागी युवा खेळाडूंना संधी दिली, त्यांच्यावर विश्वास दाखवला. सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला एक मोठ वळण आणल. विरोधी टीमला त्यांच्या भाषेत कडक प्रत्युत्तर देण्याचा आत्मविश्वास दिला.

या आत्मविश्वासामुळेच आपण २००३च्या वर्ल्डकपच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचलो.

दादाची टीम तस बघायला गेलं तर परिपूर्ण होती. बॅटिंग असो किंवा बॉलिंग अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे योग्य कॉम्बिनेशन बनवलेलं होतं. सचिन गांगुली द्रविड सेहवाग युवी कैफ,श्रीनाथ,झहीर,कुंबळे, हरभजन यांच्या मुळे ही आजवरची सर्वात ताकदवान टीम दिसत होती, फक्त एका गोष्टीची कमी होती.

भारताकडे विकेटकीपर नव्हता.

नयन मोंगिया मॅच फिक्सिंग मध्ये अडकल्यापासून आपण अनेक विकेटकीपर ट्राय केले पण एकही आंतरराष्ट्रीय दर्जावर टिकेल असा विकेटकीपर मिळाला नाही. जे मिळाले त्यांच्याकडे बटिंगचे सातत्य नव्हते. अखेर भारतीय टीमला आपला तारणहार राहुल द्रविडकडे धाव घ्यावी लागली. द्रविडने शालेय क्रिकेटमध्ये कीपिंगचा अनुभव असल्यामुळे होकार दिला.

द्रविडने दाखवलेल्या धाडसामुळे गांगुलीला वर्ल्डकप मध्ये एक फलंदाज जादाचा खेळवता आला. पण दुर्दैवाने हा जादाचा फलंदाज म्हणजे दिनेश मोंगिया संपूर्णपणे फेल गेला. याचा फटका आपल्या वर्ल्डकपमधील घोडदौडीवर बसला. पण दुर्दैवाने २००३ला ते स्वप्न पूर्ण झाले नाही. फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

हा थोडक्यात हुकलेला विश्वचषक अनेकांच्या जिव्हारी लागला.

यानंतर दादा सौरव गांगुलीने विकेटकीपर शोधायची मोहीम हाती घेतली. फर्स्टक्लास क्रिकेटवर त्याच विशेष लक्ष होतं. एकदा चॅलेंंजर ट्रॉफीमध्ये दादाला एक लांब केसाचा बिहारी विकेटकीपर दिसला. त्याने वानखेडे स्टेडियमवर आशिष नेहराला मारलेला लांब सिक्सर गांगुलीला इम्प्रेस करून गेला. गांगुलीने सिलेक्शन कमिटीला सांगितल की

हा विकेटकीपर स्ट्रोक प्लेअर वाटतोय. त्याला संधी द्यायची.

अशा रीतीने बांगलादेश दौऱ्यावर  धोनीला पहिला चान्स मिळाला. खर तर धोनीची पहिली सिरीज विशेष चांगली गेली नव्हती, पहिल्याच मॅचला तो डकवर रन आउट झाला. सात नंबरवर खेळणाऱ्या धोनीला संपूर्ण सिरीजमध्ये चमक दाखवायचा चान्स मिळाला नाही. पुढची सिरीज पाकिस्तानची होती.

अत्यंत हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या पाक विरुद्धच्या सामन्यात आपल्याला चान्स मिळणार नाही असच धोनीला वाटत होत. पण गांगुलीने त्याच्यावर विश्वास दाखवला. कसोटीत दिनेश कार्तिक कीपर होता तरी वनडेमध्ये धोनीलाच संधी मिळाली. पहिला वनडे कोचीला झाला. सेहवाग आणि द्रविडने जोरदार शतक ठोकले. धोनी पुन्हा फेल गेला.

दुसरी वनडे विशाखापट्टणम येथे होणार होती. भारताने टॉस जिंकला, गांगुलीने पहिली बॅटिंग निवडली. सेहवाग आणि सचिन ओपनिंग पार्टनर मैदानात उतरले. 

गांगुली टॉसनंतर परत ड्रेसिंगरूममध्ये आला त्याला एमएस धोनी तिथे हाफ पँटमध्ये बसलेला दिसला. गांगुलीच्या मनात काय विचार आला काय माहित त्याने धोनीला सांगितल की,

“एमएस आज तुम ३ नंबर पे बॅटिंग करोगे.”

धोनीच्या डोक्यावर तर बॉम्ब पडल्यासारख झाल. आपली बॅटिंग सात नंबरला आहे म्हणून तो रिलॅक्स होता. पण कोणतीही पूर्वसूचना नाही, तयारी नाही, टीम मिटिंग डिस्कशन नाही. अचानक दादाची ऑर्डर आली कि तीन नंबरला उतरायचे. बाकीचे टीममेम्बर, कोच, मॅनेजर वगैरे सगळ्यानाच धक्का बसला.

नेहमी गांगुली या नंबरवर बॅटिंग करायचा. पण तरी त्याने या महत्वाच्या मॅचमध्ये त्याने धोनीला सात नंबरवरून उचलून थेट आपल्या जागी संधी दिली.

योगायोगाने सचिन तिसऱ्याच ओव्हरला आउट झाला आणि धोनीने मिळालेल्या या लाईफटाईम संधीच सोन केल. त्याने सेहवागच्या साथीने पाकिस्तानी बॉलर्सची तुफान पिटाई केली. त्याचे ते हेल्मेटमधून उडणारे केस आणि त्याच्याही जास्त वेगात तलवारीसारखी फिरणारी बॅट अजूनही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल.

४ सिक्सर आणि १५ चौकाराच्या जीवावर धोनीने १४८ धावा तडकवल्या. गांगुलीने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला. भारताला मॅच जिंकून तर दिलीच पण टीमला एक नवा स्फोटक फलंदाज मिळवून दिला. जर धोनी त्या दिवशी ३ नंबरला आलाच नसता तर त्याच्यातील टॅलेंट कोणापर्यंत पोचू शकल नसत.

गांगुली आपल्या मुलाखती मध्ये म्हणतो,

“प्लेअर ऐसे ही बनते है. आपको प्लेअर को आगेही डालना है, तब आपको पता चलता है कि इस प्लेअर में दम है या नही है.”

धोनीमध्ये तो दम होता. गांगुलीने हे धाडस दाखवल म्हणून धोनीसारखा छोट्या गावातून येणारा खेळाडू मोठा प्लेअर बनू शकला आणि एवढच नाही तर गांगुलीच अधूर राहिलेलं वर्ल्डकपचं स्वप्न धोनीने आपल्या कप्तानीने एकदा नाही तर दोन वेळा पूर्ण करून दाखवलं.

गंमत म्हणजे दादाने तीन नंबरला खेळवून मोठा केलेला धोनी स्वतः कप्तान झाल्यावर परत ७ नंबरला खेळू लागला व जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून नाव अजरामर केलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.