धोनीच्या फिटनेसची मापं काढणाऱ्यांनी हे बघा त्याच्या वयाचे खेळाडू काय करतायत !

काल दिवसभर सोशल मीडियावर धोनीचे फोटो व्हिडीओ आपण पाहिले. धोनी थकलाय, त्याला आता थोडं पळल्यावरही दम लागतोय हे दृश्य सगळीकडे फिरत होतं. त्याचे फॅन्स सोडा त्याच्या विरोधकांना देखील ते बघून छातीत धस्स झालं असेल.

धोनीने रिटायरमेंट घेतला त्याच्यापेक्षाही तो आता दमलाय हे जास्त वेदनादायी आहे.

धोनीच्या बॅटिंगची सर्वात मोठी स्ट्रेंग्थ त्याची हार्ड हिटिंग बॅटिंग नव्हती, त्याचा आभाळ कापणारा हेलिकॉप्टर शॉट नव्हता, त्याच्या बॅटिंगची सगळ्यात कणखर बाजू म्हणजे त्याची रनिंग बिटविन दी विकेट्स ही होती.

तो चित्त्यासारखा धावायचा( अजूनही धावतो). त्याच्या सोबत नॉन स्ट्राईकर एन्डला असणाऱ्या बॅट्समन गळपटला तरी धोनीचा वेग कमी होत नसे. अगदी २२ यार्ड सर्कलमध्ये बॉल असताना देखील दोन रन्स चोरणारा धोनी आपण पाहिलाय.

जर तो क्रिकेट खेळत नसता तर देशाला १०० मीटर धावण्यात नक्कीच मेडल मिळवून दिलं असतं.

पण वय होणे कोणाला चुकलंय? क्रिकेटच्या देवाला देखील याचा सामना करावा लागला होता. धोनीच्या बाबतीत याची सुरवात झाली मागच्या वर्ल्ड कप मध्ये. कधीही रनआऊट न होणारा धोनी आपल्या शेवटच्या मॅचमध्ये धावबाद झाला. तेव्हाच तो स्लो झालाय की काय याची चर्चा सुरू झाली. त्यातच कोरोनामुळे क्रिकेटचं निम्मं वर्ष वाया गेल.

अखेर या १५ ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं.

तरी त्याचा स्पीड पाहता तो चेन्नईसाठी आणखी ४ आयपीएल सहज खेळेल अस वाटत होतं पण कालच्या मॅचमध्ये त्याला धापा टाकताना पाहून बोललं जाऊ लागलं की त्याने क्रिकेटला पूर्ण पणे बाय करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.

आज धोनी ३९ वर्षांचा आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर हे म्हातारपण आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर त्याच्या काळातले बाकीचे खेळाडू कुठे आहेत हे पाहू.

१. युवराज सिंग-

युवी देखील एमएसच्याच वयाचा. आपल्या बेधडक बॅटिंग आणि चपळ फिल्डिंगसाठी ओळखला जाणारा युवराज धोनीच्या आधी ३-४ वर्षे भारतीय टीममध्ये सुपरस्टार बनला देखील होता. धोनीने जिंकलेल्या दोन्ही वर्ल्डकपचा हिरो युवीच होता.

मात्र २०११ सालच्या वर्ल्डकपवेळी त्याला कॅन्सरने गाठलं तशा परिस्थितीतही तो तुफान खेळला मात्र मृत्यूच्या दाढेत जाऊन आल्यानंतर त्याला फिटनेस प्रॉब्लेम सुरू झाला. अगदी रन काढताना त्याला लागलेली धाप , नव्याने सुरू झालेली योयो टेस्ट फेल गेल्याचा शिक्का यातून युवी २०१७ ला टीमच्या बाहेर पडला. गेल्या वर्षी त्याने रिटायरमेंट जाहीर केली.

२. ब्रॅण्डन मॅकलम( न्यूझीलंड)

विकेटकीपर बॅट्समन असलेल्या मकलमची सुरवातीपासून धोनीबरोबर तुलना व्हायची. आयपीएलच्या पहिल्याच मॅच मध्ये पहिलं १५८ धावा झळकवून त्याने हवा देखील केली होती. धोनी प्रमाणे त्याने न्यूझीलंडची कॅप्टनसी देखील केली.

न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन, बॅट्समन म्हणून त्याला ओळखले जाते. मात्र हा हार्ड हिटर फलंदाज आपली शेवटची मॅच २०१६ साली खेळला.

३. गौतम गंभीर-

सगळे फॅन्स याला धोनीचा शत्रू मानतात. कायम आपल्या मुलाखतीमध्ये धोनीवर टीका करणारा गौतम साधारण धोनी बरोबरच टीम मध्ये आला. दोघांचंही वय सेम. सेहवाग सोबत त्याचीओपनर जोडी जमली.

युवराजप्रमाणे त्याने दोन्ही वर्ल्डकप मध्ये चमकदार कामगिरी केली. पण त्याच्या कडे मीडियाच लक्षच गेलं नाही. पुढे कामगिरी खालावल्यानंतर तो टीममधून दिसेनासा झाला.

गंभीर शेवटची वनडे २०१३ साली खेळला तर शेवटची टेस्ट २०१६ साली. दोन वर्षांपूर्वी त्याने क्रिकेटमधून संन्यास घेतला व आता तो खासदार बनून राजकारणात सक्रिय झाला आहे.

४. कामरान आकमल-

पाकिस्तानचा विकेटकिपर कामरान आकमल. धोनी पेक्षा फक्त १च वर्ष लहान. त्याची तुलना पाकिस्तानवाले गिलख्रिस्ट बरोबर करायचे. याने आयुष्यात धोनीच्या निम्म्यादेखील धावा काढल्या नाहीत. मॅच फिक्सिंग सारखे आरोप झाले. टीमच्या आत बाहेर राहिला. हा २०१७ ला शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळलाय.

५. शोएब मलिक –

आपल्या फिटनेस साठी प्रचंड फेमस होता. तो धोनीपेक्षा फक्त १ वर्षाने लहान. पण १९९९ साली तो टीममध्ये आला. त्याने वनडेमध्ये ७ हजार पेक्षा जास्त धावा आणि १४८ विकेट्स घेतले आहेत. हा एकमेव खेळाडू आहे जो नव्वदच्या दशकापासून अजूनही खेळत आहे. मागच्या वर्ल्डकपवेळी त्याने वनडेमधून रिटायरमेंट घेतली पण अजूनही तो पाकिस्तानच्या २०-२० टीममध्ये आहे. पण शोएबची कामगिरी धोनीच्या तुलनेत खूप कमी आहे.

६. मायकल क्लार्क-

ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर. रिकी पॉंटिंग, स्टीव्ह वॉचा आदर्श पुढे नेणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान. हा देखिल १९८१ साली जन्मलेला, एकेकाळी धोनीचा स्पर्धक. कसोटी आणि वनडे दोन्ही मध्ये त्याने आपल्या बॅटिंग बॉलिंगमुळे हवा केली होती.

संबंध एक काळ गाजवला मात्र तो कधी धोनीला मागे टाकू शकला नाही. टेस्ट आणि वनडे मध्ये ४० च्या वर एव्हरेज असणारा क्लार्क २०१५ मध्ये शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. आता तो रिटायर होऊन कॉमेंटेटर बनलाय.

७.शेन वॉटसन-

१९८१ साली जन्मलेला ऑस्ट्रेलियाचा आणखी एक प्लेअर म्हणजे शेन वॉटसन. ६ फूट उंची तगडी शरीरयष्टी असलेला वॉटसन आपल्या तडाखेबंद बॅटिंग साठी ओळखला जायचा. हेडन चा वारसा त्याने चालवला. अनेक रेकॉर्ड मोडले. बॉलिंग मध्ये देखील ऑल राऊंड परफॉर्मन्स केला.

अजूनही तो आयपील खेळतो, धोनीच्याच चेन्नईच्या टीममध्ये आहे. मात्र वॉटसन ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्याला जवळपास ५ वर्षे होतील.

ही झाली बॅट्समनची उदाहरणे.बोलर्स पाहायला गेले तर धोनीच्या वयाचे बॉलर कधीच घरी बसलेत.

आजकाल खेळलं जाणारं क्रिकेट पाहता या वयात क्रिकेट खेळणारा खेळाडू व्हीलचेअरवरच मैदानात उतरला पाहिजे.

पूर्वीच्या काळी खेळाडू ५० वर्षांपर्यंत खेळेलल्याचे उदाहरण आहे.वेस्ट इंडिजचा चंद्रपॉल त्याचा पोरगा टीममध्ये आला तरी अजूनही क्रिकेट खेळताना दिसला होता मात्र हे अपवाद झाले.

म्हणूनच टीकाकारांनी ध्यानात घेतले पाहिजे की ३९ वर्षांच्या धोनीने तडकवलेल्या ४७ धावा, त्याने घेतलेला डाय मारून कॅच हे त्याचं फिटनेस दर्शवतात. दम लागला असला म्हणून काय झालं तो आजही त्याच्या निम्म्या वयाच्या खेळाडूंपेक्षाही जास्त फिट आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.