टीममधले खेळाडू म्हणायला लागले होते, एकवेळ कॅप्टन कुंबळे परवडेल पण धोनी नको….

लग्न लागायच्या दोन एक मिनटं आधी पंगती धरणाऱ्या लोकांना वेळेचं महत्व सांगावं लागत नाही. काही लोकं कुठलंही काम स्वतःच्या सोयीने करायला बघतात, काही एकदम वक्तशीर असतात वेळेवर पोहचून आपलं इम्प्रेशन त्यांना समोरच्या व्यक्तीवर पाडायचं असतं. तर काहींना वेळेचं महत्व कितीही सांगितलं तरी त्यांना त्याचं काही देणंघेणं नसतं.

आता हा वेळेचा मुद्दा मांडलाय खरा पण धोनी तेव्हा नवा नवाच कॅप्टन झालेला आणि त्याला खेळाडूंच्या प्रॅक्टिसला येण्याच्या वेळा खटकल्या आणि भिडूने डायरेक्ट सगळ्या टिमचीचं पळापळ केलेली.

आता आपल्याला वरवर धोनी एकदम शांत, संयमी थोडक्यात कॅप्टन कुल अशा टाईप दिसतो. त्याने भारताला सगळ्याच क्रिकेट फॉरमॅट मध्ये टॉप वर नेऊन ठेवलं, जे जगात कुठलाही कर्णधार करू शकला नाही ते धोनीने करून दाखवलं. खेळाडूंवर त्याचा असलेला वचक, त्यांच्यासोबत खेळीमेळीचं वातावरण ठेवून त्याने टीमची बांधणी केली होती.

आपल्या शांत डोक्याने कधीही कुठेही तो मॅच फिरवण्याची ताकद ठेवायचा, खेळ कुठल्या परिस्थितीत सुरूय याच भान ठेवून तो निर्णय घ्यायचा आणि मॅच फिरवायचा. उत्तम आणि कुशल कॅप्टन कसा असावा याचं उदाहरणचं त्याने सेट करून ठेवलं. या त्याच्या उत्तम संघबांधणीचं गुपित जेव्हा तो नवीनच कॅप्टन झाला होता तेव्हा सापडतं.

भारतीय क्रिकेट संघाचे २००८ साली हेड कोच होते पॅडी अपटोन त्यांनी सांगितलेली हि घटना. सर्व करताना त्यावेळी जर कोणी चूक केली तर धोनी त्या चूक करणाऱ्या खेळाडूंना गमतीदार शिक्षा द्यायचा त्यामुळे शिक्षा भोगणाऱ्या खेळाडूंना त्याचं विशेष काही वाटायचं नाही. पण नंतर धोनीने असा निर्णय बनवला ज्याची धास्ती सगळ्या टीमनेच घेतली होती.

२००८ साली अनिल कुंबळे हा टेस्ट टीमचा कॅप्टन होता आणि धोनी वनडे आणि टी- ट्वेन्टी टीमचा कर्णधार होता. त्यावेळी अनिल कुंबळे आणि कोच मंडळींनी टीम वेळेमध्ये सरावासाठी यावी म्हणून बऱ्याच नियमांवर चर्चा केली होती.

शेवटी सगळ्या टीमला आणि इतर सदस्यांना एकत्र बोलावून विचारलं कि, सरावासाठी आणि मिटिंगसाठी सगळ्यांनी वेळेत यावं असं तुम्हाला वाटतं का ? त्यावर सगळे हो म्हणाले. पण जर कोणी यासाठी आलाच नाही तर त्यावर उपाय काय करायचा ? यावर सगळे म्हणाले कॅप्टन जो निर्णय घेईल तो योग्य राहील.

यावर कॅप्टन अनिल कुंबळेने नियम बनवला कि जो खेळाडू उशिरा येईल त्याला १०,००० रुपये दंड भरावा लागेल. सगळ्यांनी याला होकार दिला खरा पण पुढे काही दिवसांनी त्यावर अंमलबजावणी होईना.

धोनीने मात्र कर्णधार असताना या नियमामध्ये एक ट्विस्ट आणला आणि नियम बनवला कि,

जो खेळाडू उशिरा येईल केवळ त्यानेच दहा हजाराचा दंड न देता टीममधल्या इतर सदस्यांनाही तो दंड भरावा लागेल.

सगळ्यांना एकामुळे दहा हजार दंड भरावा लागणार यामुळे पुढे कोणीही उशिरा आलं नाही.

या निर्णयाने संघातले सगळेच खेळाडू कोंडीत सापडले. एकाच्या चुकीमुळे दहा हजाराचा फटका कोण खाणार अशा कात्रीत खेळाडू होते. पण पुढे त्याचा चांगलाच फायदा दिसून आला.

धोनीच्या या अजब निर्णयाने संघातले खेळाडू चेष्टेत म्हणायचे कि,

एकवेळ कॅप्टन म्हणून अनिल कुंबळे परवडला पण धोनी नको.

पण धोनीने भारतीय संघ शिस्तबद्ध राहावा आणि कुणा एकामुळे सगळा खोळंबा व्हायला नको म्हणून हा नियम बनवला होता. धोनीच्या या निर्णयामुळे फक्त खेळाडूच नव्हे तर कोच , स्टाफ, मॅनेजर हो लोकसुद्धा वेळेत हजर राहू लागली.

यामुळे भारतीय संघ आक्रमकतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने क्रिकेट खेळू लागला. फिल्डिंगमधले बारकावे लक्षात घेऊन फिल्डिंगवर त्याने जास्त लक्ष केंद्रित केलं. नियम अधिक कडक केले पण ती बांधणी भविष्याच्या दिशेने असल्याची खूण होती. मैदानावर धोनी जितका गंभीर दिसतो तितकाच तो सरावाच्या वेळी भयंकर विनोदी असल्याचं पॅडी अपटोन सांगतो.

भारतीय क्रिकेटला धोनीने ज्या उंचीवर नेऊन ठेवलंय ते कौतुकास्पद आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.