सांगली, जळगावचा धसका घेत भाजपने धुळ्याच्या नगरसेवकांना ‘दमण’ सहलीवर पाठवलं…

फेब्रुवारी २०२१ मध्ये भाजपचं बहुमत असलेल्या सांगली-मिरज महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर विराजमान झाले. त्यानंतर महिन्याभरातच म्हणजे मार्च २०२१ मध्ये भाजपची एकहाती सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेवर शिवसेनेने भगवा फडकवला. महिन्याभरात २ महापालिकांमध्ये महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाला.

मात्र हाच करेक्ट कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण ठरलंय धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठीची निवडणूक.

सध्या धुळे महानगरपालिकेसाठी महापौरपदाची निवडणूक जाहीर झालीय. १७ सप्टेंबरला मतदान होणार आहे. तसं इथलं संख्याबळ बघितले तर भाजपने निवांत राहायला हवं. पण तसं दिसून येत नाहीये. कारण भाजपने या मतदानासाठी नगरसेवकांना व्हीप जारी केलाय. सोबतचं आपल्या नगरसेवकांना पक्षानं ‘दमण’ सहलीवर देखील पाठवलं आहे.

२०१८ साली तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने इथल्या ७४ पैकी तब्बल ५० जागा आपल्या खिशात घातल्या. तर काँग्रेस ६, शिवसेना १, राष्ट्रवादी ८, एमआयएम ४ असे नगरसेवक निवडून आले होते. शिवाय सपाचे २ आणि लोकसंग्राम, बसपा, अपक्ष असे प्रत्येकी १ नगरसेवक निवडून आले.

आता याच संख्याबळामुळे सध्या इथं भाजपचे महापौर होणे अपेक्षित आहे. कारण महाविकास आघाडीचे केवळ १५ नगरसेवक आहेत. या सोबत जर त्यांना एमआयएम, समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दिला तरी त्यांचं संख्याबळ महापौर निवडीसाठी पुरेस ठरणार नाही.

मात्र तरीही महाविकास आघाडीने आपले ३ उमेदवार महापौरपदासाठी रिंगणात उतरवले आहेत.

भाजपच्या एक हाती सत्तेमुळे महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५ इच्छुकांनी ६ उमेदवारी अर्ज दाखल केले. यात महाविकास आघाडीच्या ३ उमेदवारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसून पण ३ अर्ज दाखल झाल्यानं भाजपचे काही नगरसेवक गळाला लागतात का, याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळेच पुन्हा एकदा सांगली, जळगावच्या भाजपचा करेक्ट कार्यक्रम चर्चेत आला आहे. मात्र महाविकास आघाडीतर्फे ३ जणांनी अर्ज दाखल झाले असले तरी निवडीच्या दिवशी सर्वानुमते एकाच उमेदवारावर शिक्कामोर्तब करून बाकीच्या दोघांचे अर्ज मागे घेतले जातील, असे स्थानिक नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजे एक अर्ज राहणार हे नक्की आहे.

करेक्ट कार्यक्रम टाळण्यासाठी भाजपने केलेलं उपाय… 

सांगली, जळगावनंतर धुळ्यात आपला करेक्ट कार्यक्रम टाळण्यासाठी भाजपने केलेले उपाय लक्षात घेण्यासारखे आहेत. धुळ्यात अशा चर्चा होत्या कि महापौरपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभा चौधरी व नगरसेवक संजय पाटील इच्छुक होते. पण भाजपने ऐनवेळी प्रदीप कर्पे यांना संधी दिली. त्यातुन भाजपने नगरसेवकांची संभाव्य नाराजी आणि गटबाजी टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे.

सोबतच महाविकास आघाडीने उमेदवार रिंगणात उतरवल्याने आणि सांगली, जळगावमधून धडा घेत नगरसेवकांची फुटण्याची शक्यता वर्तवली जात होती. हि शक्यता लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने सध्या ४२ नगरसेवकांना ‘दमण’ सहलीवर पाठवले. मात्र तिथं हॉटेलमध्ये वाद झाल्याने भाजपने या नगरसेवकांना आता सिल्वासाला पाठवले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर काही नगरसेवक प्रकृतीच्या कारणामुळे धुळ्यातच आहेत.

मात्र यानंतर देखील मतदानावेळी ‘गेम चेंज’ होऊ नये, म्हणून काळजी घेत भाजपकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे. १७ तारखेला होणाऱ्या मतदानावेळी कर्पे यांनाच मतदान करावे असा पक्षादेश काढलाय. त्यामुळे प्रदीप कार्पेना काहींचा विरोध असला तरी पक्षादेश म्हणून प्रदीप कार्पेना मतदान करतील यात शंका नाही.

या सगळ्यानंतर देखील मतदानादिवशी काय समीकरण तयार होतात आणि कोणाची गणित बिघडतात, महापौरपदाची माळ प्रदीप कर्पे यांच्याच गळ्यात पडणार कि, आणखी कोणाच्या हे शुक्रवारी होणाऱ्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.