तिरंगामधल्या या डायलॉगवर पाकिस्तानच्या थिएटरमध्ये जल्लोष झाला होता.

थिएटरमध्ये “तिरंगा” सिनेमा लागला होता. गेंडास्वामीला देशभक्ती शिकवणाऱ्या राजकुमारच्या डायलॉगला जोरात टाळ्या पडत होत्या. क्लायमॅक्सचा सीन सुरु झाला. कर्नल सूर्यदेवसिंग प्रलयनाथच्या मिसाईलचे फ्युज कंडक्टर पळवतो आणि जोरदार फायटिंगला सुरवात होते.  त्यावेळी गेंडास्वामीच्या छातीवर पाय ठेवून उभा असलेला नाना आपल्या स्टाईलंमध्ये एक डायलॉग मारतो,

“मेरा नाम शिवाजीराव वागले है. मराठा !! मराठा मरता है या मारता है.”

हे ऐकल्या ऐकल्या पूर्ण थिएटरमध्ये शिट्या आणि घोषणाचा जोरदार गोंधळ सुरु झाला. लोक बेभान होऊन ओरडत होते. विशेष म्हणजे हे दृश्य महाराष्ट्रातल्या कुठल्या थिएटरमधलं नव्हत तर हे दृश्य होत पाकिस्तानमधल्या बलुचीस्तानच्या एका थिएटरमधलं. ऐकून धक्का बसला ना?

हे गाव आहे बलुचिस्तानमधलं “डेरा बुगटी” आणि तिथल्या  सिनेमाघरात नाना पाटेकरच्या डायलॉगला जल्लोष करत होते ते होते “बुगटी मराठा”. 

सतराव्या शतकात पानिपताच्या युद्धात मराठी सत्तेचा अहमदशाह अब्दालीने पराभव केला. स्वराज्याच्या इतिहासातला हा सर्वात दारूण पराभव होता. जवळपास चाळीस हजार मावळे आणि साठ हजार इतर स्त्रीपुरुष असे जवळपास १ लाख मराठी जनता या युद्धात कामी आली. यात पेशव्यांचा मुलगा विश्वासराव, सेनापती सदाशिवराव भाऊ अशां अनेकांचा समावेश होता.

असं म्हणतात अब्दालीच्या अफगाणी सेनेने जवळपास २२ हजार मराठा युद्धकैदी पकडले.

अब्दाली या युद्धानंतर भारतात थांबला नाही.  काही दिवसांनी इथे गोळा केलेला जो काही लुटीचा माल होता तो बैलगाडी, घोड्यांवर लादून तो आपल्या देशाला म्हणजे अफगाणिस्तानला परत निघाला. त्याने  हे मराठा युद्धकैदी आपल्या सोबत घेतले होते‘.सियार उल मुत्ताखिरीन हा इतिहासकार म्हणतो,

“दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत र्अधकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते”.

यातल्या काही स्त्रियांची सुटका पंजाबातल्या शीख सैनिकांनी केली मात्र बाकीचे पंजाब ओलांडून बलुचिस्तानला पोह्चले. बलुचिस्तानचा तेव्हाचा राजा होता मीर नासीर खान नुरी. त्याने अब्दालीला पानिपतच्या युद्धात मदत केली होती. या मदतीच्या बदल्यात त्याला सैन्य आणि खंडनीची रक्कम देतो असे आश्वासन अब्दालीने दिले होते. पण खरे तर अब्दालीचे स्वतःचे पानिपतच्या युद्धात बरेच नुकसान झाले होते.

त्याने शक्कल लढवली,  युद्धकैदी म्हणून जे मराठा सैनिक आणले होते ते मीर नसीर खानला भेट म्हणून दिले. असे करण्यामागे त्याचे आणखी एक कारण म्हणजे हे युद्धकैदी उपाशीपोटी इतक्या प्रवासानंतर  अर्धमेले झाले होते. तिथून पुढे अफगाणिस्तानपर्यंत पोहचण्यासाठीची ताकद त्यांच्याकडे उरली नव्हती. त्यांना तिथपर्यंत नेणे अब्द्लीला परवडणारे नव्हते.

मीर नसीर खानाने आपल्या सैन्यातील वेगवेगळ्या जमातीमध्ये या सैनिकांना गुलाम म्हणून वाटून टाकले. त्यांचे धर्मांतर करण्यात आले. पुढे जवळपास दिडशे वर्ष या मराठ्यांना हलाखीत काढावे लागले. तसे पाहायला गेले तर स्थानिक बलुची आणि युद्धकैदी मराठे यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते पण गुलामगिरी, तिथले न सोसवणारे हवामान, हलाखीची आर्थिक स्थिती यामुळे  ते दिवस बरेच कष्टप्रद होते.

अखेर १९४४ साली हे मराठे सैनिक गुलामगिरीतून मुक्त झाले. पण तो पर्यंत पिढ्यानपिढ्या तिथे राहिल्यामुळे ते बलुचिस्तानच्या संस्कृतीमध्ये मिसळून गेले होते. तिथे त्यांना बुगटी मराठा असे ओळखण्यात येते. याच काळात तिथे पेट्रोलियमसाठे सापडले होते. नव्या कंपन्या सुरु होत होत्या.  अनेक जण तिथे नोकरीला लागले. काही जण स्वतःची शेती करू लागले. 

या बलुच मराठ्यांच्यात ही काही वेगवेगळ्या जमाती होत्या. यापैकी साहू मराठा(साताऱ्याचे छत्रपती शाहू यांच्यावरून नाव पडले असावे) जमातीचे मराठे हे सुरवातीपासूनच मुक्त होते. त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या कौशल्यामुळे त्यांनी बलुचिस्तानमध्ये शेती करण्याची परवानगी मिळाली. साहू मराठय़ांनी अतिशय उत्तम प्रकारे शेती करून गहू व बाजरी यासारखी धान्ये तिथे पिकवली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे साहू मराठे धर्माने मुसलमान बनले मात्र आपल्या मराठी संस्कृतीच्या परंपरा विसरले नाहीत. आजही तिथे लग्नात हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पैसे उकळल्यावरच सोडवणे अशा मराठी प्रथा पाळल्या जातात. तिथे आजही अनेकांची नवे कमोल, गोदा, गौरी अशी आहेत. त्यांची टोपणनावे मराठी पद्धतीप्रमाणे कासीमचे कासू अशी होतात.

पुढे वर्षानुवर्षे या बुगटी मराठा समाजाने तिथल्या स्थानिक जमातीपेक्षा वेगाने प्रगती केली. आज ते डॉक्टर,इंजिनियर, शिक्षक अशा अनेक पदावर आहेत. काहीजण तिथल्या राजकारणात देखील आहेत. बलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे सनी लिओनीच्या नृत्यामुळे फेमस झालेलं हिंदी गाण ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत.

पानिपतात लढलेल्या शूर मावळ्यांचे हे वारसदार आजही महाराष्ट्राच्या मुख्य भूमीपासून लाखो मैल दूर राहूनही त्यांनी आपली संस्कृती जपून ठेवली आहे.

आज फेसबुकच्या माध्यमातून ते इथल्या जनतेशी कनेक्ट होत आहेत. आजचा बुग्टी मराठा तरुण इंटरनेटवरून इथले सिनेमा, गाणी, सिरीयल डाऊनलोड करून मराठी मातीशी जोडलं जाण्याच्या प्रयत्नात आहे. इतकच काय तिथल्या मराठा समाजाच्या संघटनानी काही वर्षपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजच्या आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला होता.

(टीप : हा लेख विविध बातम्या आणि लेखांतील माहितीवर आधारलेला आहे.)

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.