रशिया युक्रेन युद्धाचा सर्वाधिक फटका बसलेलं भारतातलं शहर म्हणजे ‘सुरत’…

भारतातील व्यापाऱ्यांचं राज्य म्हटलं तर लगेच ‘गुजरात’ असं नाव सगळ्यांच्या तोंडात येतं. कारण गुजराती लोकांना लहानपणापासूनच धंदा करण्याचं बाळकडू पाजलेलं दिसतं. गुजराती लोक कोणत्याही मोठ्या बिजनेस स्कुलमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत मात्र तशा मोठ्या बिजनेस स्कुलमध्ये शिकलेले लोक ते त्यांच्याकडे कामगार म्हणून हमखास ठेवतात.

अशा या गुजरातमध्ये वेगवेगळे व्यापारी तुम्हाला दिसतील. यातच एक धंदा आहे ‘हिऱ्यांचा’. गुजरातच्या सुरत शहरात अनेक व्यापारी तुम्हाला हिऱ्याचा व्यापार करताना सहज नजरेस पडतील. जगातील सुमारे ८०% हिऱ्यांवर सुरतमध्ये प्रक्रिया केली जाते आणि नंतर निर्यात केली जाते. नेहमी हसत खेळत आणि भरलेल्या या व्यापारावर मात्र सध्या काळे ढग साठलेले दिसताय. 

हे ढग आहेत ‘रशिया-युक्रेन’ युद्धाचे. 

हिरे व्यापाऱ्यांना भीती कशाची वाटत आहे?

रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लावण्यात आले असल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मात्र हिरा बनवण्यासाठी भारतातील मोठ्या प्रमाणात कच्चा माल रशियातून आयात होत असतो. भारतातील सुमारे ४०% रफ हिरे रशियाच्या अलरोसा खाणीतून येतात. अलरोसा खाण ही जगातील सर्वात मोठ्या खाणींपैकी एक आहे. 

तर भारतात आयात झाल्यानंतर बहुतेक हिरे कापण्यासाठी, पॉलिश करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी गुजरातमधील सुरत शहरात जातात.

या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकेने रशियामधील हिऱ्यांच्या खाणीवर निर्बंध लादले आहेत. याने त्यांनी थेट अलरोसा खाणीला लक्ष्य केलं आहे. गेल्या वर्षी, अलरोसाने ३२.४ दशलक्ष कॅरेट रफ हिरे विकले, जे जागतिक उत्पादनाच्या ३० टक्क्यांपेक्षा कमी होते. यावरूनच ही खाण किती मोठी आहे याचा अंदाज लागतो. 

या निर्बंधांमुळे हिरा आयात करणं अवघड झालं आहे. तसं तर रशियाने भारताला नियमित हिरा पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. हिऱ्यांच्या निर्यातीत कोणतीही कपात होणार नाही, असं सांगितलंय. मात्र तरी या महिन्यात बाजार खाली आला आहे. याला कारण आहे दुसरी कडी ‘अमेरिका’. 

अमेरिका हा भारतातील पॉलिश्ड हिऱ्यांचा सर्वात मोठा आयातदार आहे. पण येत्या काळात जर अमेरिकेने युद्धात भाग घेतला तर संपूर्ण उद्योगाला खूप त्रास पाहायला मिळू शकतो. कारण याने डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य आणखी कमी होऊ शकतं. यामुळे भारतातील हिरे व्यापारी कमी आयात करतील, ज्याचा पुढच्या कामावर प्रभाव पडेल, असं या व्यापाराशी संबंधित एका तज्ज्ञाने सांगितलंय.

यातील अजून एक कडी अशी की, हिऱ्यांच्या आयातीनंतर पेमेंट कसं करावं?

आज अमेरिका आणि युरोपमधील बँका हिरा व्यापाऱ्यांना रशियाला पैसे देऊ देत नाहीयेत. पेमेंट निर्बंधांमुळे रशियाकडून कोणताही नवीन पुरवठा शक्य नाही. त्यामुळे येत्या दिवसांत कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यातच भर म्हणजे अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाने रशियन संस्थांच्या व्यवहारांवर प्रक्रिया करणेही थांबवले आहे.

या परिस्थितीमध्ये भविष्यात कच्च्या हिऱ्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तेव्हा जर हिरा व्यापारी  रशियाबाहेरील इतर खाणींकडे वळले तरी तिथल्या हिऱ्यांची किंमत वाढलेली असेल आणि अशाने खरेदी महाग होईल. शिवाय यामुळे हिऱ्यांच्या किमती वाढू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

इतकंच नाही तर असंच सुरू राहिल्यास अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. ज्याने भारताच्या आर्थिक स्थितीवरही नकारात्मक परिणाम दिसू शकतो. कसं? तर भारतातील ज्वेलरी सेक्‍टरचा देशच्‍या जीडीपीमध्‍ये सुमारे ७% वाटा आहे, जो खूप मोठा वाटा आहे आणि गेल्या वर्षी भारतातून सुमारे ३२ बिलियन डॉलर्सची निर्यात झाली होती.  

अशाप्रकारे या युद्धाचा सुरतच्या हिरा व्यापाऱ्यांवर पेमेंट्सपासून कच्च्या मालापर्यंत परिणाम होऊ शकतो. मात्र या व्यापाऱ्यांकडे इतर कोणताही उपाय नसल्याने त्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.