कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार आणि फ्लॅट्स देणारे सावजी ढोलकिया सध्या काय करतायत ?

तर दिवाळीच्या दिवसात सोनपापड्या, कपडे,फटाके सोडून एक आकर्षक गोष्ट असते ती म्हणजे बोनस. दिवाळीचा बोनस काय मिळणार काहींना पगारवाढ मिळते तर काहींना फक्त मिठाईचे बॉक्स मिळतात. पण एक व्यक्तिमत्त्व असं आहे जे आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून थेट कार आणि फ्लॅट द्यायचे. पण ते आत्ता नेमके कुठं आहेत ? काय करताय ? जाणून घेऊया.

गुजरातमध्ये हिरा व्यावसायिकांचा मोठा बोलबाला असतो त्या हिरे व्यापारी क्षेत्रातले टॉपचे आणि मातब्बर व्यापारी म्हणजे सावजी ढोलकिया.

दिवाळीत बोनस म्हणून फ्लॅट आणि कार देण्याच्या बातमीवरून जगभर ते प्रसिध्द झाले होते डायमंड किंग म्हणतात ते उगाच नाही. बोनसची मनमुराद वाटणी करणारे सावजी ढोलकिया भारतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पण त्यांची या क्षेत्रात येण्याची सुरवात कशी झाली ?

गुजरातच्या अमरेली जिल्ह्याच्या दौधाला गावातून येणारे सावजी ढोलकिया यांनी वयाच्या 13 व्या वर्षी शाळा सोडली. शाळा सोडून ते आपल्या काकांबरोबर हिऱ्याच्या व्यापारात घुसले. याच क्षेत्रात सतत राहिल्याने लवकरच त्यांना त्याची गणितं कळू लागली आणि काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा व्यवसाय थाटला. 10 वर्षांपर्यंत त्यांनी डायमंड पॉलिश करण्याच्या व्यवसायात मेहनत केली आणि 1991 मध्ये आपली कंपनी हरी कृष्णा ट्रान्सपोर्ट सुरू केली.

2014 सालापर्यंत सावजी ढोलकीया यांच्या कंपनीचा टर्नओव्हर हा 400 करोडच्या आसपास होता. आजही या कंपनीत जवळपास 6 हजार कर्मचारी काम करतात. कंपनीत तयार होणारी ज्वेलरी ही अमेरिका, चीन, हॉंगकॉंगसोबतच 50 देशांमध्ये एक्स्पोर्ट केली जाते.

सगळ्यात अगोदर सावजी ढोलकिया फेमस कसे झाले तर 2011 मध्ये जेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांना फ्लॅट आणि कार दिल्या होत्या. 2015 साली परत एकदा हा भीम पराक्रम त्यांनी केला आणि 419 कार आणि 200 फ्लॅट त्यांनी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले होते. 2018 साली 600 कर्मचाऱ्यांना फ्लॅट बोनस म्हणून त्यांनी दिला होता ज्याच्या चाव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. सोबतच 3 कर्मचाऱ्यांना मर्सिडीज कार सावजी ढोलकिया यांनी गिफ्ट दिल्या होत्या.

ढोलकिया कंपनी ही भारतातल्या व्यावसायिक टॉप 5 कंपन्यांपैकी एक आहे. पण या वेळी कर्मचाऱ्यांना गिफ्ट न देण्याचा निर्णय ढोलकिया यांनी घेतला आहे. हिरे उद्योग डबघाईस आल्यामुळे ढोलकिया यांचा नाइलाज झाला आहे. 2008 पेक्षाही भीषण मंदी आल्याचं सांगत ढोलकियांनी बोनस देण्यास असमर्थता दर्शवली. मंदीचा फटका बऱ्याच उद्योगांना बसलेला असताना भेटवस्तू देण्याचा खर्च मलाही परवडणार नाही, असं ढोलकिया म्हणाले.

पण आपल्या काकांकडे काम करणारा पोरगा आपला व्यवसाय वाढवतो आणि कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट देऊन चर्चेत येतो हीसुद्धा मोठी गोष्ट होती.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.