खरच चंद्राबाबूंनी NTR यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता का…?

पाठीत खंजीर खुपसला, अस कानावर आलं तरी महाराष्ट्रातील प्रत्येकजण पुलोदकाळात जातो. शरद पवारांसह पाच आमदार विरोधी बाकावर जावून बसले व वसंतदादांचे सरकार कोसळले. या घटनेचा उल्लेख पाठीत खंजीर खुपसला असा करण्यात आला. स्वत: वसंतदादांनी मात्र सांगलीच्या सभेत शरद पवारांचा कौतुक केल्याचा दाखला दिला जातो. घडलेल्या घडामोडीच अशा होत्या की नक्की विश्वासघात झाला की सर्व काही ठरवल्याप्रमाणे झालं याबाबत मतमतांतरे आहे, बोल भिडू हा विषय देखील आपणासमोर नक्कीच घेवून येतील. 

पण तुर्तास आजचा विषय देशपातळीवर चर्चेत आलेल्या खंजीराचा.

तर हा खंजीर आहे खुद्द चंद्राबाबू नायडू यांचा. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू हे अपवित्र असल्याची जाणीव नव्याने भाजपला झाली. कालपर्यन्त एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पक्ष आज एकमेकांचे विरोधक झाले.

झालं अस की मोदी आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये रॅली करत असताना म्हणाले की,

“चंद्राबाबू नायडू यांनी आपले सासरे एनटी रामाराव यांच्या पाठीत खंजीर घुपसला.”

मोदींच्या इतर भाषणाप्रमाणे हे भाषण देखील व्हायरल झालं. ट्विटर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ राम गोपाल वर्मा यांनी रिट्विट मारला. बर रिट्विट मारताना ते काय म्हणाले,

“बघा मोदी माझ्या आगामी फिल्मच प्रमोशन करत आहेत.”

झालं अस की राम गोपाल वर्मा यांची नविन फिल्म येतेय. त्या फिल्मच नाव लक्ष्मीज् एनटीआर. लक्ष्मी आणि एनटीआर यांच्या जीवनावर, त्यांच्या प्रेमावर राम गोपाल वर्मा यांनी फिल्म बनवली असून ही फिल्म ते १४ फेब्रुवारी अर्थात व्हेलेंन्टाईन डे ला रिलीज करणार आहेत. राम गोपाल वर्मां करत असलेल्या फिल्मच्या प्रमोशन वरुन लोकांनी पुन्हा चंद्राबाबू नायडू यांच्याकडे बोटे दाखवण्यास सुरवात केली आहे.

अशा वेळी आपल्या कार्यकर्त्यांना माहित असावं हि हे महाराष्ट्राच्या बाहेरच खंजीर प्रकरण काय आहे. 

NTR पिक्चरमधून राजकारणात येण्याचा प्रवास. 

कॉंग्रेसी नेत्यांचा होत असणारा अपमान, दक्षिणेतील लोकांना उत्तरेतल्या राजकारण्यांकडून होणारा त्रास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तेलगु अस्मिता या मुद्यावर NTR यांनी तेलगु देसम पक्षाची स्थापना केली. NTR हे तेलगु फिल्म इंडस्ट्रीतले सर्वात नावाजलेले अभिनेते होते, पण जेव्हा त्यांनी पक्षाची स्थापना केली तेव्हा मात्र त्यांच फिल्मी करियर संपुष्टात आलं होतं अस सांगितलं जातं. तरिही एखादा जादूई करिष्मा व्हावा तशी आंध्रामध्ये NTR नावाचं वादळ निर्माण झालं. आपल्या पहिल्याच प्रयत्नात NTR आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

२९ मार्च १९८२ साली स्थापन झालेला पक्ष १९८३ साली आंध्रप्रदेशच्या फक्त मुख्य राजकिय प्रवाहातच नव्हता तर तो एकट्याच्या हिंमत्तीवर सत्तेत जावून बसला होता. त्यानंतरच्या काळात NTR तीन वेळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झाले. 

याच काळात म्हणजे १९८५ साली त्यांच्या पहिल्या पत्नीचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आली ती अम्मा लक्ष्मी पार्वती. लक्ष्मी पार्वती हि लेखक होती. NTR यांच्यावर पुस्तक लिहण्याच्या निमित्ताने त्यांची आणि NTR यांची ओळख झाली. 

ओळखीच प्रेमात रुपांतर होण्यास वेळ लागला नाही. NTR हे लपवून ठेवणाऱ्यापैकी नेते नव्हते. प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा NTR यांच वय होतं ७० वर्ष आणि लक्ष्मी यांच वय होतं ३८ वर्ष. मात्र या प्रेमात त्यांच वय कधीच आडवं आलं नाही. १९९३ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, NTR यांच्या या निर्णयाचा राग येण्यासारख्या इतर व्यक्तींही त्यांच्या आयुष्यात होत्या. 

NTR यांना एकूण ७ मुले आणि ३ मुली होत्या. घरातील या सर्वांनाच ७० वर्षांच्या वयात NTR यांनी लग्न करण्याचा निर्णय रुचला नाही. अशात १९९४ सालच्या निवडणुका लागल्या NTR यांच्यासोबत लक्ष्मी यांनी या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला. लक्ष्मी यांच्या योगदानामुळेच तेलगु देसम २९४ पैकी २१४ जागा घेवून विजयी झाल्याचं सांगितलं जात. 

त्यानंतरच्या काळात NTR यांना अर्धांगवायूचा झटका आला. NTR जागेवर बसून राहू लागेल. पक्षाची संपुर्ण जबाबदारी लक्ष्मी पाहू लागल्या. लोक त्यांना अम्मा म्हणू लागल्या व याचा सर्वात मोठ्ठा त्रास NTR यांची ७ मुले व ३ मुली यांना होवू लागला. NTR यांची पारंपारिक जागा समजल्या जाणाऱ्या तेकाली विधानसभेच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला. या जागेवरुन कोण उमेदवारी घेणार हा प्रश्न चर्चेत आला. NTR यांच्या जागेवरुन लक्ष्मीच जागा लढवतील अशी शक्यता असताना त्याविरोधात NTR यांचा मुलगा हरिकृष्ण यांनी दावा ठोकला. कौटुबिंक वाद नको म्हणून हि जागा NTR यांनी तिसऱ्याच उमेदवाराला दिली. 

या प्रकरणातनंतर मात्र कुटूंबाचा वाद चार भिंतीत राहिला नाही. 

लक्ष्मी यांची ताकद पक्षाच्या पातळीवर वाढू लागली. NTR यांच्या उतरत्या काळात त्या चोवीस तास त्यांच्यासोबत राहून पक्षासाठी वेळ देत होत्या. आमदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा उल्लेख अम्मा असा केला जावू लागला. NTR यांचा लक्ष्मी यांना असणारा पाठिंबा पाहून शेवटी त्यांच्या मुलांनी व मुलींनी त्यांच्या विरोधात बंड करण्याच ठरवलं, व या बंडाचा चेहरा होते NTR यांचे जावई चंद्राबाबू नायडू. 

चंद्राबाबू नायडू तेव्हा पक्षात सक्रिय होते, ते तेलगु देसम पक्षाचे आमदार होते सोबतच आंध्रप्रदेशच्या सरकारमध्ये सहकार मंत्री देखील होते. या बंडात NTR यांच्या जवळचे लोकच फक्त त्यांच्यासोबत थांबून राहिले. २१४ आमदारांपैकी २०-२५ आमदारच NTR यांच्यासोबत राहील अस सांगितलं जातं. बाकीच्या सर्व आमदारांनी नव्या राजकारणाची दिशा ओळखून निर्णय घेतला. 

या घटनेनंतर पक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या हाती आला, ज्या पक्षाला NTR यांनी उभे केले त्याच पक्षातून त्यांना बाहेर काढण्यात आले. NTR यांनी खचून शेवटचा निर्णय घेतला तो म्हणजे त्यांनी सार्वजनिक पातळीवर आपल्या तीन मुलींचा आणि सात मुलांच्या कुटूंबाचा त्याग केला. त्यांच्याबरोबरचे संबध संपुष्टात आल्याच जाहिर केलं. 

अशाच काळात NTR यांच १८ जानेवारी १९९६ रोजी निधन झाले. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.