क्रांतिसिंह नाना पाटील यांनी चालत्या रेल्वेतून उडी मारली होती काय?

ज्यादिवशी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी,’माफी मागायला मी सावरकर नाही,गांधी नाही.”असे विधान केल्यानंतर वि दा सावरकर यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सावरकर यांचे विरोधक आणि समर्थक समोरासमोर आले.याच काळात सावरकर यांनी समुद्रात मारलेली उडी खरी की खोटी इथपासून ते त्या उडीचे अंतर किती? यावर सोशल मीडियावर वाद झाले.

हे सगळं सुरू असतानाच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. त्यामध्ये सावरकर यांच्या उडीपेक्षा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी टाकलेली उडी श्रेष्ठ आहे.

त्यांच्या हातापायात बेड्या घालून त्याना रेल्वेतून इंग्रजांचे पोलीस घेऊन निघाले होते. तेव्हा त्यांनी गाडी कृष्णा नदीच्या पुलावर आल्यावर चालत्या रेल्वेतून कृष्णा नदीत उडी टाकली आणि भूमिगत झाले. अशी पोस्ट व्हायरल झाली होती.

क्रांतीसिंह नाना पाटील यांचा इतिहास जेवढा समोर यायला हवा होता तेवढा आला नाही. त्यांची उपेक्षा झालेली आहे. त्यांचे कार्य जितके लोकांच्यापर्यंत पोहोचायला हवे होते तेवढे पोहोचलेले नाही. काहींच्या मते ते पोहोचवलेले नाही.एक गोष्ट खरी आहे की क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांनी उभा केलेली चळवळ लोकांच्यापर्यत पोहोचली नाही. ती ठराविक परिसराच्या पलीकडे गेलेली नाही.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कथा ऐकलेल्या असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत थेट कामगिरी केलेल्या क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड, कॅप्टन रामभाऊ लाड या क्रांतिकारक मंडळींना अनेकदा भेटल्यामुळे आणि या लोकांकडून प्रतिसरकारबद्दल ऐकल्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांची उपेक्षा मला खूप अस्वस्थ करत होती.

म्हणूनच 2014 पासून मी सातत्याने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर सोशल मीडियावर लिखाण केले. त्याचे प्रमाण एवढे होते की आमच्याच क्षेत्रातील काही सिनियर लोक ‘मला फक्त क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दलच माहिती आहे.’असं म्हणत होती. तर महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत कवी कुणाल गायकवाड यांच्यासारखे मित्र कौतुक करत होते, या विषय लिहावा म्हणून बळ देत होते.

मुद्दा असा आहे की क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्यांच्या आयुष्यात जो लढा दिला. देशासाठी स्वतःच्या कुटूंबाची वाताहत करून घेतली. निरा नदी ते वारणा नदीच्या काठावरच्या 650 गावात प्रतिसरकार स्थापन केले. या गावांनी ब्रिटिशांची राजवट नाकारली. स्वतःचे राज्य स्थापन केले.

इंग्रजांनी देशभर राज्य केले पण सातारा जिल्ह्यात मात्र क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारने इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडले होते.

समग्र जनता या लढाईत उतरली होती.गडी बाया आणि लहान मुलेही या लढ्यात जसं जमेल तसं योगदान देत होती.जागतिक पातळीवर नोंद घ्यावी असा हा लढा होता. पण या लढ्याची नोंद जेवढी घ्यायला हवी होती तेवढी घेतली नाही. घोर उपेक्षा झाली.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी चालत्या रेल्वेतून उडी टाकली ही पोस्ट वाचल्यानंतर अस वाटायला लागलं की एखादी व्यक्ती थोर ठरवण्याचा निकष एक भली मोठी उडी टाकणे हाच आहे अस आहे का? सावरकरांनी उडी टाकली तशी नाना पाटील यांनी टाकली. असं सांगून आपण नेमके काय साध्य करत आहोत.

महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ‘क्रांतिसिंह नाना पाटील एक अखंड क्रांतिकारक’या पुस्तकाचे लेखक आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास लाभलेले, त्यांच्याच विचाराने वाटचाल करणारे डॉ भारत पाटणकर यांनी,

“क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या आयुष्यात अशी कोणतीही घटना घडली नव्हती.ती घटना घडली नव्हती तर ती घडली असं आपण का म्हणतोय? असा त्यांचा सवाल आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील यांचे समकालीन चरित्रकार आपासाहेब लाड,रा तू पाटील यांच्या पुस्तकातही रेल्वेतून उडी मारल्याचा उल्लेख नाही.

हे दोन चरित्रकार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत लढ्यात होते. त्यांनी हा प्रसंग लिहायला हवा होता. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख मालेवाडीकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पोवाडा रचला आहे. त्यातही हा प्रसंग नाही. मग हा प्रसंग नेमका कोठून आला आणि का आला? हे समजत नाही.

डॉ. भारत पाटणकर म्हणतात,

“क्रांतिसिंह नाना पाटील आणि सावरकर ही तुलनाच होऊ शकत नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रतिसरकार उभारले होते. आयुष्यभर त्यांनी समतेची मूल्ये जोपासली. विषमतेला जोरदार विरोध केला.”

क्रांतिसिंह नाना पाटील आणि सावरकर यांची तुलना करणाऱ्यांना एक गोष्ट माहिती नसेल. सावरकर यांनी चार वेळा माफी मागितली. पण क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वप्नातही माफी मागितली नाही. त्यापुढेही जाऊन त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले होते,

“तुम्हाला जेव्हा पोलीस पकडतील. ते विचारतील डाक बंगला कोणी जाळला?पोलीस चौकी कोणी जाळली?सरकारी खजिना कोणी लुटला तर बिनधास्तपणे नाना पाटलांचे नाव सांगा.”

न केलेल्या गुन्ह्यांची जबाबदारी हा माणूस स्वतःच्या नावावर घ्यायला तयार होता. तो ब्रिटिशांना घाबरणारा नव्हता. तो मोठा माणूस होता.

सातारची चळवळ त्यांच्या नावाने सुरू होती,तिने जोर पकडला होता.नाना पाटील की जय या घोषणा महात्मा गांधी की जय ला जोडून दिल्या जात होत्या. एवढे लोकप्रियतेचे शिखर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी गाठले होते. एक दिवस त्यांनी सहकाऱ्यांना बोलावून घेतले. ते म्हणाले,

“या काळात जर माझ्या जीवाचे बरेवाईट झाले तर शोक करू नका.लोकांना कळून देऊ नका.मला पुरून टाका.आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले की लोकांना सांगा.”

वरील प्रसंगातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच चळवळीवर असलेलं प्रेम, त्यांच्या मनाचा  मोठेपणा, स्वतःपेक्षा चळवळीला दिलेलं महत्व, फकिरी वृत्ती दिसून येते. अशा माणसाची आपण कोणासोबत तुलना करताय? आणि ‘त्यांच्या’साठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना का उडी मारायला लावताय?

संपत मोरे यांच्या फेसबुकवरून साभार

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.