राजीव गांधींनी टॅक्सीप्रमाणे INS विराटचा वापर केला होता का..?

31 जानेवारी 1997 या वर्षी INS विक्रांत भारतीय नौदलातून रिटायर झाले होते. आज विक्रांतचा पुर्नजन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS विक्रांत आज भारतीय नौदलात सामील झाले. 

पण यानिमित्ताने विषय आहे तो INS विराटचा. 2019 च्या लोकसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधीवर आरोप केले होते. 9 मे 2019 रोजी केलेल्या भाषणात त्यांनी राजीव गांधींवर टिका करत राजीव गांधींनी INS विराटचा वापर एखाद्या टॅक्सीप्रमाणे केल्याचा दावा केला होता. शिवाय राजीव गांधी यांच्यासोबत त्यांचे सासू सासरे देखील INS विक्रांतवरून लक्षद्विपच्या बंगाराम बेटावर फिरायला गेले होते असा वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आरोपानंतर कायमस्वरूपी हेच समजण्यात आलं की, राजीव गांधींनी INS विराटचा वापर टॅक्सीप्रमाणे केला होता. 

पण हे सत्य होतं का? 

तर नाही. मोदींच्या आरोपानंतर वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांना उत्तर देण्यात आलं पण दोन व्यक्तींनी सांगितलेली घटना महत्वपूर्ण संदर्भ म्हणून गणली गेली. त्यातील एक व्यक्ती होते लक्षद्विपमध्ये प्रमुख अधिकारी असणारे आणि भारताचे माजी संयुक्त सचिव वजाहत हजीबुल्लाह.. 

वजाहत हजीबुल्लाह यांनी सांगितलं होतं की राजीव गांधींनी अशा प्रकारे विराटचा वापर केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुर्णपणे चुकीचं बोलत आहेत. त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की, 

राजीव गांधी लक्षद्विपला कोणत्याही खाजगी सुट्टीसाठी आले नव्हते तर आयलेंड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीच्या बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासोबत संपूर्ण मंत्रीमंडळ होतं. कवरत्ती येथे ही बैठक पार पडली होती. राजीव गांधी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सोनिया गांधी होत्या. त्यानंतर सोनिया गांधी यांचे आई-वडिल, राहूल प्रियांका सोबतच अमिताभ बच्चन व त्यांची मुले देखील आले होते. ते बगाराम येथे गेले होते पण ते INS विराटमधून आले नव्हते.

दूसरी महत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे,

रिटायर व्हाईस ॲडमिरल विनोद पसरिचा. विनोद पसरिचा तेव्हा INS विराटचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं होतं की, 

आम्ही पंतप्रधान राजीव गांधींना त्रिवेंद्रम येथून घेवून गेलो होतो. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या व आयलेंड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीच्या बैठकीसाठी ते जाणार होते. हा पुर्णपणे शासकीय दौरा होता.. 

पण या दोन्ही उपस्थित अधिकाऱ्यांच्या दाखल्यानंतर देखील राजीव गांधींवर INS विराटचा टॅक्सी म्हणून वापर केल्याचे आरोप होत राहिले.

9 मे 2019 रोजी झालेल्या आरोपानंतर इंडिया टुडे मार्फत माहितीच्या अधिकारात भारतीय नौदलाला प्रश्न विचारण्यात आले. 

इंडिया टुडे मार्फत माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं होतं की, नौसेनेच्या युद्धनौकांचा वापर कधी व्यक्तिगत सुट्ट्यांसाठी करण्यात आला आहे का? या प्रश्नावर नौसेनेकडून उत्तर देण्यात आलं की, अनधिकृतपणे अथवा खाजगी वापरासाठी आजतागायत युद्धनौकांचा वापर झालेला नाही. अशा प्रकारच्या यात्रांना परवानगी नाही. पुढे 1987 मध्ये पंतप्रधान राजीव गांधींना INS विराटचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना नौदलामार्फत सांगण्यात आलं. 

28 डिसेंबर 1987 रोजी तत्कालीन पंतप्रधान त्रिवेंद्रम येथून INS विराटवरून रवाना झाले होते त्यांना 29 डिसेंबर रोजी लक्ष्यद्विप येथे सोडण्यात आलं. ते भारताचे पंतप्रधान म्हणून शासकीय दौऱ्यावर होते. 

नौदलास माहितीच्या अधिकारात पुढचा प्रश्न विचारण्यात आला INS विराट वर राजीव गांधी यांच्यासोबत कोण होतं, परदेशी व्यक्ती सोबत होत्या का? या प्रश्नावर नौदलाकडून उत्तर देण्यात आलं. त्यांच्यासोबत सोनिया गांधी होत्या ज्या पंतप्रधानांच्या पत्नी म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय INS विराटवर इतर कोणीही उपस्थित नव्हतं.. 

नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान म्हणजेच 9 मे 2019 रोजी राजीव गांधींवर आरोप केला होता. त्यानंतर 19 मे रोजी लोकसभा निवडणूकांचा अखेरचा टप्पा पार पडला व 23 मे रोजी नरेंद्र मोदी बहुमताने निवडून आले. मात्र माहितीच्या अधिकारात मागवण्यात आलेली माहिती 24 जून रोजी आली. तेव्हा अधिकृतरित्या स्पष्ट झालं की राजीव गांधी यांनी अशा प्रकारे टॅक्सी म्हणून नौदलाच्या कोणत्याही युद्धनौकेचा वापर केला नव्हता. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.