MCA निवडणूक सोप्पी करण्यासाठी “शरद पवारांनी” अर्ज माघारीचं आवाहन केलं का..?

अंधेरी पुर्वमधून भाजपने माघार घेतली. स्वत:हून हा निर्णय भाजपने घेतला असता तर भाजप व पर्यायाने शिंदे गटावर टिका करण्यात आली असते. निवडणूकीच्या पराभवाला घाबरले म्हणून माघार हे चित्र ठाकरे गटाला रंगवता आलं असतं..

पण हा डॅमेज कंट्रोल साध्य झाला तो राज ठाकरे आणि शरद पवारांच्या भूमिकेमुळे. सर्वात पहिल्यांदा राज ठाकरेंनी लटकेंच्या विरोधातला उमेदवार मागे घ्यावा म्हणून आवाहन केलं. तोच शरद पवारांनी देखील पत्रकार परिषद घेतं भाजपला हेच आवाहन केलं..

भाजपने देखील मोठ्या मनाने निवडणूकीतून माघार घेतली.

एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट वाटावी अशा राजकीय घडामोडी घडण्याचा गेल्या अडीच वर्षातला हा अडीच हजारावां प्रयोग. पण झालं अस की यामुळे दोन्ही नेत्यांवर टिका होवू लागली. निवडणूक झाली असती आणि ठाकरे गटाचा विजय झाला असता तर ही पोटनिवडणूक उद्धव यांना महानगरपालिकेसाठी बुस्टर डोस ठरली असती.

साहजिक शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या अजेंड्यावर शरद पवार आणि राज ठाकरे दोघेही आले. त्यातही सर्वात महत्वाचा प्रश्न पडला तो म्हणजे, पवारांनी अशी भूमिका का घेतली. यावर टिका करताना सांगण्यात आलेलं कारण म्हणजे,

MCA अर्थात मुंबई क्रिकेट बोर्डाची होणारी निवडणूक..

या निवडणूकीसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले आहेत.  त्यात या दोघांच्या गटात असलेली इतर नावं आहेत, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिंदे गटातले आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक.

आत्ता MCA ची निवडणूक खरच इतकी महत्वाची असते का ज्यामुळे शरद पवार अंधेरी पूर्व निवडणूक टाळण्याचं आवाहन करू शकतात. या प्रश्नासाठी MCA समजून घ्यायला हवं.

शेषराव वानखेडे, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पृथ्वीराज चव्हाण या बड्या नेत्यांनी याआधीही एमसीएच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आहे. मनोहर जोशींनी माधव मंत्रींचा, शरद पवारांनी अजित वाडेकरांचा आणि विलासराव देशमुखांनी दिलीप वेंगसरकरांचा पराभव करुन एमसीएचं अध्यक्षपदही मिळवलं आहे. थोडक्यात इथं राजकारणी क्रिकेटर्सवर भारी पडतात.

सध्याच्या निवडणुकीतही हीच स्थिती आहे, आधी शरद पवार विरुद्ध आशिष शेलार असा सामना होईल अशी शक्यता होती. मात्र आशिष शेलारांनी विकत घेतलेल्या पारसी पायोनियर क्लबकडून मतदान करणाऱ्या शरद पवारांनी आशिष शेलारांच्या गटाला पाठिंबा दिला. त्यामुळं शेलार-पवार गटाकडून आशिष शेलार अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, तर मुंबई क्रिकेट ग्रुपकडून माजी क्रिकेटर संदीप पाटील हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.

त्यांचा गटात मुख्यत्वे माजी क्रिकेटर्सचा समावेश आहे. त्यात संदीप पाटील यांच्याविरोधात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अंतर्गत आरोप करण्यात आल्यानं त्यांचा अर्ज वैध ठरणार का हे पाहावं लागणार आहे. या निवडणुकांसाठी ५० माजी खेळाडू आणि ३२९ क्लब सदस्य असे ३७९ जण मतदान करणार आहेत.

हे झालं सध्याचं राजकारण, आता बघू एमसीएचं महत्त्व. मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापन झाली १९३० मध्ये. पारशी नागरिक, ब्रिटीश अधिकारी यांनीही एमसीएचं अध्यक्षपद भूषवलं. मुंबईमधले पारशी, हिंदू जिमखाने, १८५० मध्ये स्थापन झालेला यंग झोराष्ट्रियन्स क्लब यांच्यामुळे प्रचंड मोठी परंपरा एमसीएला लाभलेली आहे.

त्यात १९३५ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचंच वर्चस्व दिसून आलं आहे. आतापर्यंत मुंबईनं सर्वाधिक ४१ रणजी ट्रॉफी जिंकल्या आहेत, तर १९५८-५९ ते १९७२-७३ अशी सलग १५ वर्ष मुंबईनंच रणजी ट्रॉफी मारली आहे. यावरुनच मुंबईची डोमेस्टिक क्रिकेटमधली ताकद लक्षात येते.

पण एवढंच नाही, तर मुंबईचं इंटरनॅशनल क्रिकेटमधलं महत्त्वही लक्षात घेण्यासारखं आहे. भारतात पहिली इंटरनॅशनल टेस्ट मॅच मुंबईतच झाली होती. मुंबईत इंटरनॅशनल मॅचेस खेळवता येतील अशी २ स्टेडियम्स आहेत. २०११ मध्ये भारतानं वर्ल्डकप जिंकणं, सचिननं आपला शेवटचा इंटरनॅशनल सामना खेळणं या अविस्मरणीय क्षणांचं साक्षीदार वानखेडे स्टेडियम आणि पर्यायानं मुंबईच राहिलं आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर असलेले क्रिकेट क्लब, खेळायच्या संधी यामुळं अनेक क्रिकेटर्सचा ओढा मुंबईकडंच आहे.

या झाल्या वरवरच्या गोष्टी, थोडं खोलात जाऊन पाहिलं तर भारतीय क्रिकेटमधले आजी-माजी मुंबईकर खेळाडू पाहिले की, मुंबई लॉबीचं अस्तित्व ठळकपणे दिसून येतं. त्यामुळं एमसीएतल्या पदाधिकाऱ्यांचं महत्त्वही वाढतंच. २०२३ मध्ये आयसीसी वनडे वर्ल्डकप भारतात होतोय, तेव्हा अर्थातच दोन इंटरनॅशनल स्टेडियम्स आणि वानखेडेसारखं मोठं ग्राऊंड असल्यानं मुंबई केंद्रस्थानी राहील. फक्त खेळाडू आणि चाहतेच नाही, तर बिझनेसमन, राजकीय नेते आणि बडे सरकारी अधिकारी या निमित्तानं मुंबईत येत असतात अशावेळी मुंबईतलं क्रिकेट ज्या छत्रछायेखाली येतं त्या एमसीएवर अंमल असणं कुणाच्याही फायद्याचंच ठरणार आहे.

एमसीए एवढी महत्त्वाची संघटना असण्याचं आणखी एक कारण म्हणजे पैसा. मुंबईमध्ये इंटरनॅशनल आणि आयपीएल मॅचेस मोठ्या प्रमाणावर होतात. साहजिकच त्यामुळं बीसीसीआयकडून येणारा नफ्यातला हिस्सा मोठा असतो. आयपीएलच्या धर्तीवर एमसीएची स्वतःची मुंबई प्रीमियर लीग आहे, कांगा लीग आणि इतर स्पर्धा आहेत, त्यामुळं एमसीएकडे येणारा महसूल मोठा आहे.

फक्त महाराष्ट्र आणि विदर्भाचं बघायचं गेलं, तर या दोन्ही क्रिकेट बोर्डांच्या अधिपत्याखाली बरेच जिल्हे येतात, तर मुंबईचा अंमल मात्र ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई ग्रामीण एवढाच मर्यादित आहे. त्यामुळं क्रिकेटच्या डेव्हलपमेंटसाठी होणारा खर्चही तुलनेनं जास्त नसतो. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटवरुन घेतलेल्या मार्च २०१७ च्या आकडेवारीनुसार एमसीएकडे ३०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे ऍसेट्स आहेत. भारतातला सगळ्यात श्रीमंत स्टेट क्रिकेट बोर्ड म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचंच नाव घेतलं जातं.

आत्ता एवढं सगळं राजकारण ऐकल्यानंतर तुम्हीच ठरवू शकता, अंधेरी पोटनिवडणूक पवारांसाठी महत्वाची असू शकते की MCA च्या निवडणूकीतचं राजकारण..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.