अचानक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले गणपती दूध पिवू लागले…

राज्यात युतीचं शासन होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. त्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या घरातील गणपती अचानकपणे दूध पिवू लागला होता. तो दिवस होता २१ सप्टेंबर १९९५. हा सोहळा मनोहर जोशी यांच्या शासकिय निवासस्थानी अर्थात “वर्षा” बंगल्यावर देखील पार पडला. वर्षावर असणाऱ्या गणपतीने देखील दूध पिलं आणि गणपती दूध पितोय यावर शिकामोर्तब झालं.

तर काय झालेलं त्या दिवशी ? 

तेव्हा ना मोबाईल होता ना व्हाटसएप. ना इंटरनेट ना प्रत्येक घरात टेलिफोन. अशा काळात देखील सकाळ सकाळ एका अफवेने जोर पकडला. अफवा होती गणपती दुध पितोय याची. जो तो येवून सांगू लागला की आत्ताच आमच्या घरातल्या गणपतीने दूध पिलं. त्यांच्या घरातला गणपती चमत्कार दाखवतोय तर माझ्या घरचा का नाही. एकामागोमाग एका घरातले गणपती जोर जोरात दूध पिवू लागले. मुंबईतल्या चाळीत राहणारे लोक गोळा होवू लागले.

गणपतीच्या सोंडेच्या जवळ वाटीतून दुध धरू लागले. बघता बघता वाटीतलं दूध कमी होवू लागलं. बरं मातीची मुर्ती दूध शोषून घेते म्हणावं तर माणसांनी चांदीच्या मुर्ती देखील सोडल्या नाहीत. वेगवेगळ्या धातूंच्या मुर्तीवर प्रयोग करण्यात आले. १०० टक्के प्रयोग यशस्वी होतं असल्याचं प्रमाण मिळू लागलं. एखाद्याला संशय आलाच, त्यानं बारकाईनं नेमकं दूध खाली सांडलं की पिलं ते तपासलंच तरी त्याला सांगण्याच धाडस झालं नाही. तो वेळच अशी होती का नाही म्हणून कुठं देवाचा प्रकोप ओढावून घ्या. 

मला आठवतं तेव्हा आम्ही डहाणूमध्ये रहात होतो. चाळीच्या बाहेर एक दगडी गणपती होता. रात्रीच्या दहाच्या सुमारास ती बातमी चाळीत येवून धडकली होती. लागलीच लोक गोळा झाले आणि काळ्या पाषाणातल्या त्या मुर्तीला दूध पाजू लागले. चमत्कार म्हणजे तेव्हा तेही दूध गणपतीनं पिलं होतं. फक्त ते वाटीभर दूध गणपतीच्या पायांखाली साचलं होतं. सगळ्या चाळीला ते दिसलं होतं पण कबुल कोण करणार. शेजारच्या चाळीतला गणपती तर दूध पित होता मग आपल्या चाळीतल्या गणपतीनं ते पिलं नसतं तर त्यांचा उद्या “लालबागचा राजा” होण्याची अनामिक भिती होतीच की? झालं एकमुखाने तो ठराव पास झालेला. 

या घटनेच्या मागे नेमकं कोण होतं ? 

हा प्रकार महाराष्ट्राच्या गावागावातून देशभर पसरला ते देखील विदाऊट इंटरनेट. पण या घटनेच्या पाठीमागे नेमकं कोण होतं हे गुलदस्त्यातचं राहिलं. जशी अफवा पसरली त्या वेगाने अफवेचा सोर्स पसरला नाही पण त्याचा आधार घेवून कुणीही काहीही सांगु लागलं.

स्वत: चंद्रास्वामींनी,

“ माझ्या आज्ञेवरुन गणपतीने दूध पिल्याचा दावा केला होता.”

पण चंद्रास्वामी कोण होते हे माहित असणाऱ्यांना या दाव्यातील शक्यता किती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

या अफवेमुळे घडलेली एकमेव चांगली गोष्ट. 

या अफवेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात जावून प्रबोधन करण्याच काम अनिसने हाती घेतलं. याबद्दल नरेंद्र दाभोळकरांनी साधनामध्ये लेख लिहला होता त्यामध्ये ते म्हणतात, “२१ सप्टेंबर १९९५ ला महाराष्ट्रात व जगात अनेक ठिकाणी गणरायाने दुग्धप्राशन केले. ज्या पद्धतीने अफवा पसरवण्यात आली. त्यावर लोकांनी विश्वास ठेवला. भल्याभल्यांनी त्याला मान्यता दिली. ते सर्वसामान्य माणसाला चक्रावून टाकणारे होते.त्यावेळी समितीच्या सर्व शाखांनी या अफवेचा प्रतिकार करुन लोकांच्या समोर सत्य मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

यासाठी दरर्षी २१ सप्टेंबर हा चमत्कार सत्यशोधन दिन म्हणून साजरा करण्याचे समितीने ठरवले. यासाठी पहिल्याच वर्षी म्हणजे १९९६ साली “दुग्धप्राशन करणाऱ्या गणरायाला विद्यार्थांचे पत्र” अशी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतरच आजतागायत आजता दिवस समितीमार्फत चमत्कार सत्यशोधन दिन म्हणूनच साजरा करण्यात येतो. 

असो पुलाखालून बरच पाणी गेलं लोकांनी उशीरा का होईना गणपती दुध पित नाही यावर विश्वास बसला. मात्र नागपंचमीला नागाला दूध पाजणारे अजूनही आहेतच. लोकांना त्यावर देखील लवकर विश्वास बसेल हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना करुया ! 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.