मोदीजी, एक पंतप्रधान असाही होता जो लोकांना भेटायचा, बोलायचा…

बोललं पाहीजे, जगातलं एक बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणजे आपण ट्रम्प तात्यांना कितीही शिव्या घालत असला तरी एक गोष्ट लक्षात घ्या ते उत्तर कोरियाचा हुकूमशहा किंग जॉंग उन सोबत देखील बोलले होते. भेटले होते.

बोललच नाही तर पुढच्याच समजणार कसं, एवढा साधा विषय आहे.

आत्ता २६ जानेवारी रोजीच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. शेतकरी हे खलिस्तानी असल्याच्या बातम्या छापण्यात आल्या. आंदोलनाला हिंसक वळण कसं मिळालं, झेंडा कोणी फडकवला, झंडा कोणता होता यावरही बरच छापून आल.

पण या सगळ्याचं मुख्य कारण काय ; आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी नेत्यांना एकदातरी भेटले का? भेटण्याचं सौजन्य दाखवलं का? त्यांच्या मागण्या काय आहेत त्या त्यांच्या तोंडून समजून घेण्याचा प्रयत्न केला का?

शेतकऱ्यांच हे आंदोलन सुरू झालं ती तारिख होती २६ नोव्हेंबर. त्यानंतर आंदोलन हळुहळु उग्र स्वरूप धारण करत गेलं. संयम सुटत गेला. यादरम्यान सरकार अन् शेतकरी यांच्या एकूण ११ बैठका झाल्या. शेवटची बैठक ही २२ जानेवारी रोजी झाली.

सर्व बैठका या अयशस्वीच ठरल्या..

पण सरकारकडून या बैठकांमध्ये कधी कृषीमंत्री नरेंद्र तोमर असायचे तर कधी अमित शहा, पियुष गोयल किंवा इतर मंत्री असायचे. पण पंतप्रधान मोदींनी मात्र शेतकऱ्यांसोबत एकही बैठक घेतली नाही. दिल्लीच्या सिमेवर बसलेल्या शेतकऱ्यांना भेटायला बोलवावं त्यांच्या समस्या एकदा बंद खोलीत का होईल समजून घ्याव्यात हे सौजन्या आपल्या पंतप्रधानांनी दाखवलं नाही..

अशा वेळी एका माजी पंतप्रधानांचा किस्सा सांगू वाटतो…

भारताच्या या माजी पंतप्रधानांच नाव होतं लाल बहादूर शास्त्री. झालेलं अस की लाल बहादूर शास्त्री जेव्हा या पदावर होते तेव्हा बिहारचं एक शिष्ठमंडळ त्यांना भेटण्यासाठी येणार होतं. शास्त्रीजींनी त्यांना आपल्या निवासस्थानी भेटण्याची वेळ देखील दिली होती.

ठरलेल्या दिवशी मात्र अचानक परदेशी पाहूणे आले. त्यांच्यामार्फत एका समारंभाच आयोजन करण्यात आलं होतं. शास्त्रीजींना परदेश नितीचा विचार करता या बैठकीला जाण देखील आवश्यक होतं.

त्या काळात आगावू सुचना देण्यासारखी माध्यमे नसल्याने ठरल्याप्रमाणे बिहारचे लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांना निरोप मिळाला की शास्त्रीची एका परदेशी पाहूण्यांच्या समारंभासाठी गेले आहेत. ते काही वेळानंतर येतील. तेव्हा आपली भेट होईल. बिहारचे लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांची वाट पहात राहिले.

मात्र इकडे शास्त्रीजींचा पत्ता नव्हता. ठरलेल्या वेळेपेक्षा बराच उशीर झाला. आत्ता शास्त्रीजी येणार नाहीत असा विचार करुन बिहारचे लोक उठून पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आणि बसस्टॉपच्या दिशेने जावू लागले.

ते बाहेर पडल्यानंतरच्या काही काळात शास्त्रीजी घरी पोहचले. आल्या आल्या त्यांनी आपल्या सचिवाला विचारलं,

ते लोक आले होते का?

त्यावर सचिव म्हणाले, ते खूप वेळ वाट पहात होते. पण उशीर झाल्याने ते गेले. किती वेळ झाला जावून या प्रश्नावर आत्ताच काही वेळापूर्वी ते बाहेर पडल्याचं सचिवांनी सांगितलं. शास्त्रींनी ते कुठे गेले असतील याचा अंदाज तुम्हाला आहे का अस विचारताच सचिव म्हणाले ते बसस्टॉपला जाण्याबाबत बोलत होते….

हे ऐकताच पंतप्रधान असणारे लाल बहादूर शास्त्री आपल्या निवासस्थानातून बाहेर पडून रस्त्याने चालू लागले. त्यांचा सचिव शास्त्रींना विनंती करु लागला की मी त्या लोकांना घेवून येतो मात्र आपण जावू नये. अशा वेळी शास्त्री म्हणाले,

चूक माझी आहे त्यामुळे मीच त्यांना बोलावून आणायला हवं…

शास्त्रीजी जेव्हा बसस्टॉपवर गेले तेव्हा बिहारचे ते लोक बसस्टॉपवरच होते. शास्त्रींनी त्यांची भेटायला उशीर झाल्याबद्दल माफी मागितली व घरी येण्याची विनंती केली. पुढे पंतप्रधान व मागे बिहारचं शिष्टमंडळ असा ताफा चालतच पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहचला…

एक पंतप्रधान असाही होता, इतकच….

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.