अलकायदा, इसिस-के आणि तालिबान यांच्यात नेमका फरक काय आहे?

आठ दिवस जात नाही तर तालिबान, अलकायदा, आयस-के या पैकी एका तरी दहशतवादी संघटनांचे नाव आपल्या कानावर पडत नाही असे होत नाही. या तीनही दहशतवादी संघटनांनी जगभर उच्छाद मांडला आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबान सत्ता हस्तगत केली आहे.

अशातच आता परवा काबुल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटात आयएस-के या दहशतवादी संघटनेचे नाव घेण्यात येत आहे. अमेरिकेने या संघटनेच्या ठिकाणावर ड्रोन हल्ले सुद्धा केले आहेत. तर दुसरीकडे तालिबान्यांना अफगाणिस्तान हस्तगत करण्यासाठी अल-कायदाने मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे एक प्रश्न पडणं साहजिक आहे की, तालिबान, आयएस-के आणि अलकायदा या दहशतवादी संघटनांमध्ये नेमका काय फरक आहे. त्यांची विचारधारा काय आहे? त्यांची स्थापना कधी आणि कोणी केली.

या यादीत तसे पाहायला गेले पहिला नंबर लागतो तो अल कायदाचा.

अल-कायदा ‘इस्लामसाठी जिहाद करणारी संघटना’

अरेबिकमध्ये अल-कायदाचा अर्थ पाया असा होतो. त्यांचे असा विश्वास आहे की, त्यांनी इस्लामच्या भिन्नतेला एकत्र करण्यासाठी जिहादचा वापर केला पाहिजे. इस्लामला विरोध करणाऱ्या प्रत्येकाशी लढायला हवे आणि ते प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य असल्याचे अल-कायदा सांगते.

पश्चिमी देश आणि त्यांची संस्कृती इस्लामसाठी धोका आहे. आणि अल- कायदाचे मुख्य ध्येय आहे ते म्हणजे शरिया कायद्यावर आधारित इस्लामिक राज्य स्थापन करणे होय. अल-कायदा सुन्नी पंथातील वहाबी विचारसरणीचे अनुसरण करते. इस्लाम विरोधात असणाऱ्या शक्तीच्या विरोधात एकत्र येणे हे प्रत्येक मुस्लीम धर्मियाची जबाबदारी आहे.

स्थापना

ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तान मधील रशियाच्या पाडावापूर्वीचं म्हणजेच १९८८ मध्ये पाकिस्तान येथे स्थापन झाली होती. या दहशतवादी संघटनेची स्थापना ओसामा बिन लादेन आणि मोहम्मद आतिफ यांनी केली.

२००१ मध्ये अमेरिकेने अल-कायदा या संघटनेला संपविण्यासाठी अफगाणिस्तानमधील तालिबानींना सत्तेतून हटविले होते. याच अल- कायदाने अमेरिकेवर ९/११ चा हल्ला घडवून आला होता. त्यात २ हजार ९७७ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

२०११ मध्ये अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनची हत्या अमेरिकन सैन्याने केली. त्यानंतर काही प्रमाणात अल-कायदा धोका कमी झाला होता. तसेच यातील काही दहशतवाद्यांनी इराक, सिरीया मध्ये जाऊन इस्लामिक स्टेट मध्ये सहभागी झाले आहेत.

 तालिबान्यांच्याच्या कमजोरीवर नाराज होऊन तयार झालेली कडवट दहशतवाद्यांची संघटना म्हणजे,

‘इस्लामिक स्टेट’

अबू बकर बगदादी हा इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. जगात खलिफा शासन आणण्याचे ध्येय बगदादीचे आहे. तसेच त्याने स्वतःला खलिफा (महान नेता) म्हणून घोषित केले होते.

या संघटनेचा जन्म झाला तो इराक आणि सिरीया मध्ये २०१४ साली. इराकच्या मोसुलचा ताबा घेतल्या नंतर या संघटनेने मोठा दंगा केला होता. २०१४ नंतर बेल्जियम पासून ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फ्रांस आदि देशांमध्ये झालेल्या हल्ल्यात या संघटनेचा हात होता.

त्यामुळे सुरुवातीला या संघटनेचे नाव इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया असे ठेवण्यात आले होते. अमेरिका पासून ते भारत, श्रीलंकेपर्यंत दहशतवादी घटना घडविल्या आहते.

ही संघटना सोशल मिडीयावर देखील खूप सक्रीय आहे. यामुळे जगभरातील कट्टरपंथीय लोकं या संघटनेत सामील झाले आहेत. यात भारतातील काही जणांचा समावेश आहे. अनेक देशात आत्मघातकी बॉम्बर्सद्वारे स्फोट घडून इसिसने धोकादायक संघटना असल्याचे जगाला दाखवून दिले आहे.

इसिस खोरासनला इसिस- के म्हणून ओळखले जाते.  हा गट अफगाणिस्तानच्या नांगरहर या प्रदेशातील आहे. या प्रदेशाला खोरासन प्रदेश असंही ओळखलं जातं. या प्रदेशात २०१२ साली काही जिहादींनी एका गटाची निर्मिती केली होती. खोरासनचा गट २०१४ स्थापन झालेल्या इसिस मध्ये हा गट सामील झाला.

इसिसचे एकूण २० मॉडेल आहेत. त्यामध्ये सर्वात घातक मॉडेल म्हणून इसिस-के  म्हणजे खोरासन गट ओळखला जातो.

 आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय. 

खोरासन गटामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युवकांची भरती केली जाते. ज्या युवकांनी तालिबानचा गट सोडलाय त्यांना या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जातं. सध्या या गटामध्ये ३ हजार कडव्या युवकांचा समावेश असून तालिबानसोबत त्यांचा कायम हिंसाचार सुरु असतो.

तालिबान- अफगाणिस्तान मध्ये कट्टरपंथीय शासन

तालिबान हे अल-कायदा आणि इसिस पेक्षा वेगळी आहे. कारण तालिबानची अनेक तत्वे ही अफगाणिस्तान मधील पश्तून या आदिवासी जीवनशैलीवर आधारावर आहेत.

तालिबानचा अरब मधील अर्थ होतो विद्यार्थी. असं सांगण्यात येते की, तालिबानची सुरुवात ही पाकिस्तान मधील धार्मिक शाळांमधून झाली आहे. इथे त्यांना सुन्नी इस्लाम बद्दल शिक्षण देण्यात आले.

अफगाणिस्तानमधील सत्ता स्थापन करतांना तालिबानने आश्वासन दिले होते की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील पश्तून भागाचे शरिया कायद्यानुसार संरक्षण करण्यात येईल. मात्र शरियामुळे अफगाणिस्तान मधील नागरिकांवर कडक नियम लावण्यात आले.

जसे की १० वर्षांवरून मुलीच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली. तसेच टीव्ही पाहण्यापासून आणि सोशल मिडिया वापरा पासून लांब ठेवण्यात आले.

तसेच तालिबानचा मुख्य उद्देश हा आहे की, अफगाणिस्तानला अमिरातमध्ये बदलून टाकणे. अमिरात हा शब्द अमीर पासून तयार झाला आहे. इस्लाम मध्ये अमीरचा अर्थ प्रमुख असा होतो. या अमीर अंतर्गत येणारे कोणतेही ठिकाण किंवा शहर याला अमिरात म्हणतात. त्याप्रमाणे इस्लमिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान अर्थ होतो एक इस्लामिक देश.

ज्यात तालिबानचा सध्याचा प्रमुख हैबतूल्लाह अखुंदजादा याला प्रमुख म्हणून ओळखले जाते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.