त्यादिवशी दिग्विजय सिंगांना कळालं, राजकारणात कोणीच कोणाचा गुरु नसतो…

दिग्विजय सिंग यांची गणना गांधी घराण्याचे जे काही जवळचे सदस्य त्या यादीत हमखास केली जाते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध मानले जातात, तसेच ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या देखील खूप जवळचे होते. सोबतचं मध्यप्रदेश सारख्या मोठ्या राज्याचे जवळपास १० वर्ष मुख्यमंत्री पद भुषवल्यानं त्यांचं राजकारणात वजन देखील दिसून येते.

मात्र याच दिग्विजय सिंग यांना राजीव गांधी यांनी कायमस्वरुपी लक्षात राहिल असा एक धडा किंवा कानमंत्र दिला होता. या प्रसंगाचा सविस्तर उल्लेख दीपक तिवारी यांच्या ‘राजनितीनामा’ या पुस्तकात आहे.

त्याचं घटनेनंतर दिग्विजय सिंह यांना कळलं की राजकारणात कोणीही कोणाचा गुरु नसतो.

या पुस्तकाच्या मते,

१९८७ सालातील ही गोष्ट. मध्यप्रदेशमध्ये राजीव गांधी यांनी पक्षात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला, आणि प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आश्चर्यकारक रित्या दिग्विजय सिंग यांच्या गळ्यात पडली. मात्र याच सगळ्या घडामोडी दरम्यान दिग्वीजय सिंग यांना हा धडा मिळाला होता.

एका दिवस राजीव गांधींनी दिग्विजय सिंह यांना बोलावून घेतलं आणि सांगितले की ते त्यांना मध्यप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवू इच्छितात. त्यावेळी दिग्विजय सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांना आपले गुरु मानत होते. त्यामुळे राजीव गांधी यांच्या या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ते तात्काळ अर्जुन सिंग यांच्याकडे पोहचले. त्यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांना सगळी गोष्ट सांगितली.

त्यावर अर्जुन सिंह यांनी त्यांना काय सल्ला दिला या बाबतचा उल्लेख पुस्तकात नाही. पण दिग्विजय सिंगांच्या भेटीनंतर अर्जुन सिंग तात्काळ राजीव गांधींजवळ पोहचले.

या पुस्तकानुसार अर्जुनसिंग यांनी राजीव गांधींची भेट घेत स्वतः प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा असल्याचे निवेदन दिलं. ही गोष्ट राजीव गांधी यांना बरीच आश्चर्यचकित करणारी होती. त्यांनी पुन्हा एकदा दिग्विजय सिंग यांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले की,

मी तुम्हाला जो प्रस्ताव दिला होता त्याबाबत अर्जुनसिंह यांना माहिती कशी मिळाली.

अर्जुन सिंग यांचे निवेदन बघितल्यानंतर दिग्विजय सिंग यांना संपूर्ण प्रकरण लक्षात आलं. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की राजकारणात कधीच कोणी कोणाचा गुरू नसतो. जे काही डावपेच असतात ते आपल्या आपल्याला खेळायचे असतात. ही गोष्ट त्यांनी सार्वजनिकरित्या देखील मान्य केली होती की मला माझा राजकारणात एक खूप मोठा धडा मिळाला आहे.

पुढे राजीव गांधी यांच्या निधनानंतर दिग्विजय सिंह यांनी सोनिया गांधी यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी मदत केली. सोनिया गांधी देखील दिग्विजय सिंह यांचा सल्ला घेऊनच पावलं टाकत असत. याच पुस्तकात सांगितले आहे की फेब्रुवारी २००२ मध्ये दिग्विजय सिंह यांच्या सल्ल्यानुसारच सोनिया गांधी यांनी काँग्रेससाठी सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.