हिटलरच्या हल्ल्यात बेघर झालेल्या ६०० पोलिश मुलांना एका भारतीय महाराजाने सांभाळलं होतं…

भारतासाठी प्रजासत्ताक दिन नेहमीच खास असतो.  ज्याची चर्चा जगभरात असते,  मात्र यंदा २०२१ चा प्रजासत्ताक दिन आणखी एका गोष्टीमूळ चर्चेत आला होता.  तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या पगडी मूळ.  आता तुम्ही म्हणालं त्यात काय  खास? तर या एका पगडीमागे दोन देशांचे जुने  संबंध आहे.

तर ही फेमस पगडी होती गुजरातच्या जामनगरमधली. जी तिथल्या शाही परिवारानं खास नरेंद्र मोदींना भेट दिली होती. त्याचं जामनगरच्या शाही परिवाराच्या महाराजानं  दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पोलंडच्या शेकडो मुलांना नवीन आयुष्य दिल होत.

त्याचं नाव होत महाराजा दिग्विजय सिंग जडेजा, जे जामनगर (त्या काळचं नवानगर)चे महाराज होते.   ज्यांना पोलंडमध्ये ‘गुड महाराजा’ म्हणून ओळखलं जात. महाराज दिग्विजय सिंगांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या  ६०० पोलिश मुलांना आसराच दिला नाही तर आपल्या मुलांसारखा सांभाळही केला.

महाराजा दिग्विजय सिंग १९३३ ते १९४८ नवानगरचे शासक होते. ब्रिटीश इंडियन आर्मी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी अनेक सैन्य तुकड्यांत काम केलं. त्यांचे काका म्हणजे नवानगरचे महाराजा रणजितसिंह यांचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा २ एप्रिल १९३३ साली त्यांनी नवानगरची सूत्र हाती घेतली.

त्यानंतर १९३५ मध्ये दिग्विजय सिंगांना ‘सर’ पदवी मिळाली. १९३७ ते १९३८ या दरम्यान ते भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे अध्यक्षही होऊन गेलेत. ते आपलं साम्राज्य सांभाळतचं होते, अशातच त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट आला.

दुसरे महायुद्ध पेटले होते. एडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वात जर्मनीने दोस्त राष्ट्रांच्या विरोधात लढाई पेटवली होती. हिटलर हा वरचंद वर्णद्वेषी होता. त्याने संपूर्ण जगातून ज्यूंचा समूळ नाश करायची प्रतिज्ञाच घेतली होती. शेजारच्या पोलंडमध्ये ज्यू लोकांचं प्रमाण मोठं होतं. हिटलरने तिथे छळछावण्या उभ्या केल्या व लाखोंची हत्या केली. अनेकजण तिथून जीव वाचवून रशियाकडे गेले होते. पण पुढे हिटलरने रशियावर देखील आक्रमण केलं.

 जर्मनीच्या हल्ल्यानंतर सोव्हीयत रशियाकडे त्या आश्रयितांना देशातून बाहेर काढण्याशिवाय किवा त्यांना सैन्यात सामील करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. जर्मनीवरचा राग म्हणून काही जण सैन्यात भरती झाले तर काही पुन्हा आश्रय शोधण्यासाठी वणवण भटकू लागले.

या सगळ्यात पोलिश मुलं त्यांच्या घराच्यापासून दुरावली. याच पार्श्वभूमीवर पोलिश सरकारचे पंतप्रधान व्लादिस्लाव सिकोरस्की यांनी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना पत्र लिहून त्या रशियामध्ये अडकलेल्या पोलिश मुलांना वाचविण्यासाठी आग्रह केला.

भारतावर तेव्हा इंग्रजांचं राज्य होत. त्यांनी मुंबईमधल्या पोलिश राजदूतांशीही संपर्क साधला. या राजदूताची बायको त्याकाळात पोलिश मुलांना भारतात आश्रय मिळावा यासाठी प्रयत्न करत होती.

पण हे महायुद्ध इतकं भयंकर होत कि, कोणताही देश त्या मुलांना आश्रय देण्यासाठी घाबरत होता. त्यात ब्रिटेनला जास्त आर्थिक फटका बसल्यान त्यांन ह्या प्रकरणातून हात मागे घेतले.

त्यावेळी जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंग शाही युद्ध मंत्रिमंडळाचे सदस्य होते, ज्याची स्थापना या युद्धादरम्यानचं करण्यात आली होती.

याकाळात एकदा त्यांचे एक जवळचे एक मित्र म्हणजे प्रसिद्ध पोलिश पियानोवादक इग्नेसीजा पेद्रवस्की यांनी या पोलिश शरणार्थी मुलांची दुर्दशा त्यांच्या कानावर घातली. या मुलांची हृदयद्रावक माहिती कळल्यावर जामनगरच्या महाराजांनी त्यांना आपल्या राज्यात आश्रय देण्याचं ठरवलं.  त्यांच्या या कामात पटियाला आणि बडौदा घराण सुद्धा मदतीला आलं.

फेब्रुवारी १९४२ पर्यंत जवळपास एक हजार पोलीश मुलं जे ८ ते १४ वयातलेचं होते ते रशियामधून भारतासाठी रवाना झाले.

त्यांना अशकाकाबाद (तुर्केमीनिस्थान), मशाद( इराण), आणि क्वेटा (पाकिस्तान) मार्गान भारतात आणलं गेलं आणि  बॉम्बेला ठेवलं गेल, नंतर देशातल्या वेगवेगळ्या भागात त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली. त्यानंतर १६ जुलै १९४२ ला जवळपास ६०० पोलिश मुल रेल्वेनं नवानगरला पोहोचली. उरलेली ५००० मुले पुढे कोल्हापूरला करवीर संस्थानात पाठवण्यात आली.

महाराजा दिग्विजय सिहांनी या मुलांचा सांभाळ करण्याबरोबरच त्यांना  दत्तक घेण्याचं ठरवल. एकदा मुल शिवारात खेळत असताना महाराज तिथं आले आणि म्हंटले कि,

‘भलेही तुमच्या घरची नसतील, पण मी तुमचा बाप आहे. तुम्ही नवानगरचेचं आहात.’

महाराजांनी नंतर बलाचडी या गावात पोलिश मुलांच्या सुविधेसाठी ६० भवन बनवले आणि पोलिश भाषेच्या पुस्तकांची एक लायब्ररी देखील बनवली. त्यांनी त्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. या मुलाचं असं एकही नाटक नसेल जे महाराजा दिग्विजय सिगांनी पाहिलं नसेल. ते खिश्यात चॉकलेट घेऊन जायची, आणि बक्षीस म्हणून त्या मुलांना द्यायची.

ख्रिसमसला तर ते त्या पोलिश मुलांसाठी सांताक्लोज बनायचे.

त्यांनतर १९४५ मध्ये दुसरं महायुद्ध संपल आणि १९४६ मध्ये त्या पोलिश शरणार्थीना त्यांच्या देशात पाठवण्यात आलं. मुंबई मधून जहाजातनं या मुलांना पाठवण्याची सोय करण्यात आली. मुलांना घेण्यासाठी मुंबईला आलेल्या  पोलिश  अधिकाऱ्यांनी जेव्हा या मदतीच्या बदल्यात काही देण्याविषयी विचारलं. तेव्हा महाराज म्हणाले कि, त्यांच्या देशातल्या एखाद्या गल्ली किंवा रोडच नाव त्यांच्या नावावर ठेवू शकतात.

दरम्यान, ३ फेब्रुवारी १९६६ मध्ये दिग्विजय सिहांनी अखेरचा श्वास घेतला.  यांच्या मृत्युनंतर पोलंडची राजधानी वारसाॅमध्ये एका चौकाला “स्क्वेयर दबर्गो महारादजी”  म्हणजे गुड महाराजा चौक ठेवण्यात आलं. त्यांना पोलिश सरकारच्या कमांडरच्या ‘क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द मेरीट’ या मरणोत्तर  पुरस्कारान सन्मानित करण्यात आलं. जो पोलंड आणि त्यांच्या देशांत संबंध बनविण्यात योगदान देणाऱ्यांना दिला जातो.

महाराज दिग्विजय सिंग यांच्या जीवनावर नुकताच चित्रपटही तयार करण्यात आलाय. ‘द गुड महाराजा’ या नावानं हा चित्रपट यावर्षी १७ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. हितेश देसाई निर्मित या चित्रपटात अभिनेता ध्रुव वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.